Sunday, December 24, 2017

वडिलांचे कष्ट

आज बऱ्याच  दिवसांनी आदेशला भेटायचे ठरविले होते . आदेश माझा आणि विक्रमचा गुंतवणूक सल्लागार . ऑफिसखाली असलेल्या कॉफीशॉपमध्ये तो मला घेऊन आला . अतिशय स्वछ आणि पॉश असे कॉफीशॉप होते ते. शेजारच्या कॉलेजमधील मुलामुलींनी शॉप गजबजलेले होते . मेनुकार्ड वरील कॉफीच्या किमती बघून मी हडबडलोच . तिथून उठून जाण्याचा विचार मनात आलासुद्धा इतक्यात आदेशने दोन कॉफी आणि केकची ऑर्डर दिलीसुद्धा .बिल ही क्रेडिट कार्डने भरून मोकळा झाला.सहज विचारले तेव्हा साडेचारशे झाले असे म्हणाला.बापरे .....!! इथली साधी कॉफीच शंभर रुपये होती.त्याच्याशी बोलत असतानाच मागून काही मुलांचा गोंधळ ऐकू आला त्यात एक आवाज ओळखीचा वाटलं म्हणून मागे वळून पाहिले तर आमच्या हर्षलचा मुलगा आर्यन . नेमक्या त्याच वेळी त्याची आणि माझी नजरानजर झाली त्याने हसून हात हलविला मीही प्रत्युत्तर केले.
काही वेळाने तो सर्व ग्रुप निघाला जाता जाता आर्यनने सर्व बिल क्रेडिट कार्डद्वारे भरल्याचे मी पाहिले . त्याने मलाही विचारले तुमचे बिल भरू का ...?? मी नकार दिला . आर्यन कॉलेजला जात होता . नोकरीही करीत नव्हता तरी त्याच्याकडे क्रेडिट कार्ड पाहून मी चक्रावून गेलो .
संध्याकाळी नेमका आर्यन खालीच भेटला." भाऊ.. आज तिथे कोणाकडे आलेलात..?? आणि तेही चक्क कॉफीशॉपमध्ये.??
मी सर्व सांगून त्याला विचारले" तू नेहमी तिथे असतोस का ...?? तर तो सहजपणे होय... म्हणाला .
"ते ठीक आहे रे ..पण किती महाग आहे ?? कोण पैसे भरतो रोज.. ??
"आम्हीच मित्र आलटूनपालटून भरतो.बाबानी क्रेडिट कार्ड दिले आहे अडीअडचणीला त्याचा उपयोग करतो..
"अरे वा ....!!. मग अजून कशा कशासाठी उपयोग करतोस क्रेडिट कार्ड चा ..?? मी हसून विचारले .
"काय भाऊ ..?? हल्ली काय कमी खर्च आहेत होय. कुठे बाहेर पडलो तर चहा नाश्ता खर्च असतोच . शिवाय ग्रुपमधील मित्रांचे वाढदिवस आहेतच .सतत खर्च होत असतात" आर्यनचे स्पष्टीकरण तयार होतेच .
"पण हे खर्च करायची गरज पडतेच का. ?? एक विचारू हा खर्च तुझ्या खिशातून नाही तर तुझ्या वडिलांच्या खिशातून जातो ना ..?? तुला माहितीय तुझ्या वडिलांनी हे पैसे कमवायला किती कष्ट केलेत ?? मी थोड्या कडक आवाजात विचारले तसा आर्यन गंभीर झाला.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले "मला माहितीय हर्षा तुला  या गोष्टी कधीच कळू देणार नाही. पण त्याने दिवसभर नोकरी केली आणि रात्र रात्र गार्डनमध्ये बसून अभ्यास केला .सकाळी सहा वाजता त्याचा दिवस सुरू व्हायचा . पेपर टाकून झाले की तो ऑफिसला जायचा . मग संध्याकाळी डायरेक्ट गार्डन मध्ये अभ्यासाला यायचा . रात्री एक वाजता घरी जाऊन जेवायचा . कोणाला त्रास होऊ नये म्हणून लाईटही न लावता मेणबत्तीच्या उजेडात जेवायचा . दुसर्यांना त्रास देणे त्याच्या स्वभावातच नव्हते . अरे पुस्तकेही शक्यतो विकत घ्यायचा नाही .अगदी गळ्याशी आले की खरेदी असायची त्याची ".बोलता बोलता जुने दिवस आठवून माझा कंठ दाटून आला.
आर्यनही  भावनाविवश झाला", पप्पा मला हे कधीच बोलले नाहीत.उलट त्यांनीच हे क्रेडिट कार्ड मला दिले आणि लागेल तसे खर्च कर म्हणाले.
"हो ..कारण त्यांना जे मिळाले नाही ते तुला मिळावे म्हणून . पण तुलाच काय माझ्या मते प्रत्येक मुलाला/ मुलीला कळले पाहिजे त्यांच्या पालकांनी आज ह्या स्थानावर येण्यासाठी किती कष्ट केलेत .आज आम्हाला पैश्याचे महत्व कळतेय कारण तो आम्ही कष्टाने कमावलाय. तुम्हाला आयत मिळतोय म्हणून तुम्ही कसाही उडवू शकत नाही . वाढदिवस मित्रांच्या घरी जाऊन साजरे करा त्यानिमित्त घरच्यांशी ओळख होईल. आपल्या मुलांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत तेही पालकांना कळेल . सार्वजनिक ठिकाणी एकत्र भेटून गप्पा मारा .एक सांगतो आर्यन ..जेव्हा स्वतः कष्ट करून पैसे कमावशील तेव्हा तू नक्कीच पैसे उडवणार नाहीस याची खात्री आहे मला.
माझे बोलणे ऐकून आर्यन खजील झाला . मान खाली घालून म्हणाला" सॉरी भाऊ.. मी आतापर्यंत पप्पाना वेगळाच समजत होतो. पण तुम्ही माझे डोळे उघडलेत . यापुढे खर्च करताना नक्कीच विचार करेन.
© श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment