Tuesday, December 5, 2017

मी मुंबईकर

च्यायला ......आज परत उशीर !!. आता नेहमीची माझी सवय ह्यांना माहीत नाही का... ???? तरीही नेमक्या त्याच वेळेस हा पोरगा आत घुसला ..बरे पटकन बाहेर पडावे, ते नाही... नेहमीसारखी दहा मिनिटे घेतलीच . ऍडजस्ट करायला कधी शिकणार देव जाणे.हिला बोललो तर त्याचीच बाजू घेईल आणि पुढच्या वेळी फ्लॅट घेताना दोन बेडरूमच्या नाही तर निदान दोन टॉयलेटचा तरी घ्याअसे  बोलेल. अर्थात आता ते पुढच्या जन्मात शक्य आहे म्हणा.
तर महत्वाचा मुद्दा म्हणजे नेहमीची ट्रेन गेली ...म्हणजे जागा गेली ...मित्र गेले ....नाश्ता गेला. आणि हो... ती हसून गुड मॉर्निंग म्हणणारी दीक्षितही गेली.जाऊदे.. कामावर जाणे महत्वाचे . कालच परदेशी माणसे आलीत त्यांच्या मीटिंग ची तयारी करायची आहे . मिळेल ती ट्रेन पकडून निघू तिकडून टॅक्सी मारू . त्याचे वाउचर लावू .असे मनात विचार करीतच तो स्टेशनला निघाला.
स्टेशन जवळ येताच एक वृद्ध त्याच्या समोर उभा राहिला . उभ्या रेषांचा हाफ शर्ट बाहेर असलेला ..सैलसर पॅन्ट ..आणि एकदम ओरडला "बोक्या ..... पाचवी ,सहावी ,सातवी  अ वर्ग .डोळ्यात ओळ्खल्याची खूण आणि आनंद .एक क्षणात वैद्य मास्तरांचा तो तरुण चेहरा डोळ्यासमोर आला . त्यांनी मारलेला धपाटा अजून आठवतोय .ज्यांनी  आम्हाला घडविले त्यात सर्वात मोठा वाटा असलेले वैद्य सर . "अरे सर ...तुम्ही  ,किती दिवसांनी ?? आज उशीर झाला म्हणून तुम्ही भेटलात .पण सॉरी.... खरेच उशीर झालाय आपण पुन्हा भेटू.. बाय निघतो . त्यांना सावरायचा अवकाश न देता तो निघाला . नेहमीसारखा घाई घाईत . ब्रिजवर चढल्यावर सहज खाली पाहिले ते अजून तिथेच उभे राहून त्याच्याकडे बघत होते .चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव येथूनही दिसत होते . काय साल लाईफ झालय ....!! इतके खाली उतरलो आपण.. की ज्यांनी घडविले त्यांच्याशी ही बोलायला वेळ नाही. वाह.... रे... मुंबई ..वाह ..!
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment