Tuesday, June 13, 2017

सुट्टी

  तो सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जायला बाहेर पडला . बाहेरचे धुंद वातावरण पाहून त्याचे मन मोहरले .काहीतरी विचार करून तो गल्लीच्या कोपरावर उभा राहिला .टाईमपासला मोबाइल होताच .
बरोबर तासाभराने ती बाहेर पडली . आज कसलीही घाई नसल्यामुळे काहीतरी गुणगुणतच चालली होती . तो अचानक समोर येताच तिला धक्का बसला . तशीही त्याची हीच सवय होती .
" तुम्ही ,?? ती आनंदाने चित्कारली .", अजून गेला नाहीत . उशिरा जायचे तर आधी सांगायचे तेवढेच थोडे आरामात आवरले असते ".
"हो !हो! जर शांत हो ".त्याने तिला शांत केले ." चल आज दांडी मारू दोघेही . जाऊ कुठेतरी .तुला आवडेल तिथे ".
ती त्याच्याकडे पाहत बसली .एक सुखद धक्का तिच्या चेहऱ्यावर दिसून आला .
" चल ग, काय  रोज रोज तेच तेच ..गेली भोक्सक्सक्सक्स कंपनी", त्याचा निर्धार पाहून तिलाही राहवेना .
"चल दांडी आज ". तीही उत्तरली .
दोघेही रस्त्यावर आले .समोर येणारी डबलडेकर बस पकडली .वरच्या मजल्यावर गेले. पहिली सीट पकडून बसले . त्याने दोन चाळीस रुपयाच्या तिकीट काढल्या . ती आनंदाने फुलून गेली .
"कुठे जायचे" ?? त्याने विचारले.
तशी ती लाडात म्हणाली ",जहाँ आप ले जायेंगे जनाब" .
"आज नुसते फिरू आपण आणि गप्पा मारू ", तो तिच्याकडे पाहत म्हणाला .
"ओके सर ," शेजारच्या सीटवर बसलेल्या छोट्या मुलाकडे कौतुकाने पाहत ती बोलली .
अचानक तो गंभीर झाला ." आपल्याला ही आता विचार केला पाहिजे बाळाचा",त्याने हळूच तिच्या कानात म्हटले . तिने झटकन मान वळवून त्याच्याकडे पाहिले .तिच्या डोळ्यात अविश्वास दिसत होता.
" खरच !! ती आनंदाने उद्गारली ." आई काही बोलल्या का ?? गेले दोन तीन दिवस त्या आडून आडून हा विषय काढायला बघताय . आणि आता तुझ्या मनात . म्हणजे सगळेच सिरीयस झालेत म्हणायचे या विषयावर ".तीने हसत विचारले .
"हो ग, पाच वर्षे झाली ,थोडे थांबू असे बोलत .मीच तुला अडवत होतो . दोघेही नोकरी करणारे . घरात आईबाबा .मुलाला त्यांच्याकडे सोडून जावे असे मला पटत नव्हते .आणि पुरेसा पैसे ही नव्हते . बाळाचे करावे म्हणजे चार पैसेही गाठीशी हवेत .वाटले दोन तीन वर्षात होईल व्यवस्थित पण काहींना काही घडत गेले .साठविलेले पैसे त्यात गेले .तुझी मुलाबद्दल असलेली तळमळ कळते मला. पण मी खूपच व्यावहारिक वागत होतो . आणि तुलाही गृहीत धरत होतो ".त्याचा बांध फुटला.
"जाऊदे हो !! तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवीत म्हटले ."अजून वेळ गेली नाही . मीही तुमची तडफड समजत होते . आपण कसे घर चालवतो ते कळत नाही का ? पण एक सांगू मूल  झाले की आपोआप सगळे जुळून येते . आपल्या मुलांसाठी आपली मेहनत डबल होते . पण त्यातही सुख असते नाही का ?? आणि आई बाबा आहेत तोपर्यंत झालेले चांगले . शेवटी चांगले संस्कार तेच देतील त्याला .आपले खरे सुख तर आपले मूल आहे . ते आल्याशिवाय काही पुढचे घडणार नाही . कोणास ठाऊक येणारे बाळ नवी स्वप्न ,चांगले भविष्य घेऊन येईल आपल्या घरी .असाच फक्त भविष्याचा विचार करीत बसलो तर हा सुंदर वर्तमान आपल्या हातून निघून जाईल .तिने त्याला समजवल.
"तसे नाही ग ,पण तुझे कष्ट पाहतोय मी .माहेरीही फार कष्ट काढलेस तू . इथे आल्यावर तरी ते कमी होतील अशी अपेक्षा होती माझी. फक्त काही काळ जाऊ दे असे ठरविले होते . मग राजा राणी सारखे फिरलो असतो गाडीतून ".तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला .
"ओ !! महाशय भानावर या . सध्या बसमध्ये बसायला सीट मिळाली ते भरपूर आहे . आणि इथे आल्यावर कष्ट कमी झालेच ना .दोन वेळा चांगले जेवण . आई वडिलांची माया देणारे सासू सासरे . लहान भावाची माया लावणारा दीर  आणि मुख्य म्हणजे काळजी करणारा पण बोलून न दाखवणारा प्रेमळ पती .अजून काय हवे असते स्त्रीला ??.पैसे  कसेही कमावता येतील पण हा आनंद विकत घेता येतो का ?? आज एक चांगला निर्णय घेतला आपण . आता तयारीला लागू" .असे म्हणत तिने चेहरा त्याच्या छातीत लपविला .
तिचा तो लाजरा चेहरा पाहून त्याला सुट्टीचा दिवस सार्थकी लागल्याचा आनंद झाला .
(C) श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment