Friday, June 9, 2017

मदत

ते रस्त्याच्या बाजूला उभे होते . येणाऱ्या जाणाऱ्या सिंगल बाईकरवाल्याला,रिकाम्या टॅक्सीला हात करीत होते . साधारण 58 ते 60 वय असेल त्यांचे .हातात काठी होती . एखादा अपघात झाल्याची खूण होती ती .चालायचा त्रास होत हे पाहूनच कळतच  होते . इतरांसारखा मलाही त्यांनी हात दाखविला .मीही इतरांसारखाच वागलो . एकटा असूनही मी  बाईक पुढे नेली .पण मन खात राहिले .एकटा तर चाललो होतो काय हरकत आहे त्याला लिफ्ट द्यायला .  पुढे जाऊन माझे मला राहवेना .मुकाटपणे बाईक मागे वळवली . त्यांच्या पुढे उभी केली.ते हसले .
" इथेच थोडे पुढे बँकेत .सरळ जात असाल तर ".ते हसून म्हणाले
" मी तुम्हाला हवे तिथे सोडतो .बसा आरामात " मीही हसून उत्तरलो.
ते स्वतः ला सावरत मागे बसले.
"जवळ अंतर आहे म्हणून कोणतीही टॅक्सी थांबत नाही .नाईलाजाने बाईकवाल्यांकडे लिफ्ट मागावी लागेल . मिळतो मग कोणतरी तुमच्यासारखा दयाळू कधी पटकन तर कधी बऱ्याच वेळाने.  त्यांनी मागे बसून सांगितले.
मी हसलो आणि त्यांना जवळच असलेल्या बँकेजवळ सोडले .निघताना त्यांनी माझे हात हाती घेतले.
" थँक्स "म्हणाले आणि हाथ जोडले.",फारच कमी भेटतात हो तुमच्यासारखे  अशी मदत करणारे ."
मला खरेच खूप लाजल्यासारखे झाले . मी त्यांना नमस्कार केला आणि निघालो .
आता प्रश्न असा आहे आजही खरेच वरिष्ठ नागरिक अपंग यांची अशी परिस्थिती यावी की  मदत केल्यावर त्यांनी   हात जोडून आपले  आभार मानावे . म्हणजे त्यांना आपल्यापैकी कितीजण मदत करायला धावून जातात .  आपल्यातली माणुसकी फक्त आपण सोशल मीडियावर व्यक्त करायची का ?? प्रत्यक्ष दाखवायची  वेळ आली की पाठ फिरवायची का ??
(C) श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment