Friday, June 23, 2017

क्रिकेट

"काय बंड्या "??" कालची मॅच एन्जॉय केलीस वाटते ?? बंड्याच्या अवतारकडे बघत मी हसून विचारले .
"काय भाऊ तुम्हीपण" ?? आयुष्यात क्रिकेटशिवाय दुसरे काहीच नाही असे वाटते का तुम्हाला . हल्ली जो तो एकाच गोष्टीची चर्चा करतो क्रिकेट!! क्रिकेट!!" . बंड्या वैतागून बोलला .
"अरे, हो! हो! इतके नको रागावायला. काय झाले ?दमलायस पुष्कळ", .मी चुकचुकारले .
"आहो भाऊ ,गेले दोन दिवस ऑफिसमध्ये दिवसभर काम करतोय . ह्या क्रिकेटमुळे कामावर कोण येत नाही . घरी बसून काम करतो असे सांगतात आणि काम होत नाही . मग सगळी जबाबदारी टीम लीडर म्हणून माझ्यावर येते .कोणाकोणाला बोलणार ?? बोललो की मी देशद्रोही असल्यासारखे बघतात .आहो ज्या दिवशी भारताची क्रिकेटची मॅच असते तेव्हा ऑफिस मध्ये पंचवीस टक्के अनुपस्थिती आणि जे आहेत ते मोबाईल लॅपटॉप वर मॅच बघतात.भारत पाकिस्तान असेल तर बघायला नको . भारत बंद असल्यासारखी परिस्थिती .आता मी कंपनीला सुचवणार आहे या दिवशी कोण ड्युटीवर येईल त्याला स्पेशल भत्ता द्या" .बंड्या हसून म्हणाला .
" हो रे ,मलाही तसेच वाटते . हल्ली लोक नको तेवढे गुंतले आहेत या खेळात . खूपच पर्सनल घेतात हा खेळ.पूर्वी खूप कमी क्रिकेट होते .त्यामुळे कधी मॅच असली की लोक खुश असायचे .संथ आणि शांतपणे खेळ चालायचा .जो तो आपली कामे सांभाळून सामने पाहायचा . पण आता घरचे कार्य असल्यासारखे वागतात .ह्यांना कोण मॅच बघायचे पैसे देतात का ?? मी थोड्या नाराजीने बंड्याला विचारले .
" काय माहित !!..पण आपले नुकसान होते . त्यादिवशी मॅच हरलो म्हणून कोणीतरी ऑफिसची खुर्ची मोडली संतापून .तर काहीजण दुःख झाले म्हणून दारू पियाला अर्धा दिवसांनी  गेले .मला एक कळत नाही हे क्रिकेटर फक्त दिवसाला आठ  ते नऊ तास काम करतात. रोज तर नाहीच करत. पण करोडो रुपये घेतात वर्षाला .पूर्वी सगळे म्हणायचे देशासाठी खेळतात पण हल्ली तेच म्हणतात आम्ही प्रोफेशनल झालो आहोत .आमची किंमत मोठी आहे . काहीतर न खेळता ही तितकेच पैसा घेतात आणि आपण दिवसाला कमीत कमी आठ तास राबतो .मग प्रवास.महिन्याला चार सुट्ट्या . वर्षाच्या सुट्ट्या फिक्स .त्याही बॉस च्या मर्जीवर . आणि पगार काय ?? तर 5/6 लाख.काहींना तर त्याहीपेक्षा कमीच .खेळाडूंचा  परफॉर्मन्स वाईट झाला तरी काही फरक पडत नाही . ह्यांना काही नियम नसतात का ?? बंड्या चिडून म्हणाला
अरे  हे राष्ट्रीय संपत्ती मध्ये मोडतात .याना सर्व माफ मी हसून म्हणालो.
"याना आपल्यासारखे अँप्राझल  का लावत नाही ??? बंड्याचे ऐकून मलाही गंमत वाटली .
" तुझ्या मनात काय आहे बंड्या .
"आहो हे खेळाडू मुळात करोडपती .त्यात त्यांना सर्व फुकट .फाईव्ह स्टार ट्रीटमेंट .फक्त खेळायचे इतकेच काम .मग ह्यांना यांच्या परफॉर्मन्सनुसार पैसे का मिळू नये . उदा. फलंदाजांनी कमीत कमी किती धावा कराव्या ,किती धावा नंतर त्यांना बोनस ,गोलंदाजांनी कमीतकमी किती बळी विकेट घ्यावा ,कमीत कमी धाव दयाव्या त्यावर त्यांना बोनस . जिंकले की बोनस तर हरले की दंड . आपण नाही का चुकला की मेमो देतो . दांडी मारली की पगार कापतो.तसे ह्यांच्या बाबतीत करायचे .मग त्यासाठी तरी त्यांना चांगले खेळावे लागेल".बंड्या हसत हसत म्हणाला .
" खरेच बंड्या आयडिया काही वाईट नाही . हल्ली कोणताही खेळाडू देशासाठी खेळतोय असे दिसून येत नाही . मॅच हरलो की हा पराभव विसरून विसरून पुढील मॅचवर लक्ष केंद्रित करू .असे परवलीचे वाक्य बोलून मोकळे होतात .पण डोळ्यात प्राण आणून बघणाऱ्या लोकांचे काय ?? सर्वजण आपापली कामे सोडून ह्यांना बघायला आलेले असतात .मॅच संपल्यावर त्यांना बॉस च्या ,बायकोच्या,प्रेयसीच्या ,बापाच्या शिव्या खायला जायचे असते .मी हसून बोललो .
" या बाबतीत मी सुखी आहे भाऊ .मॅच असली की सोनियाला बाहेर फिरायला घेऊन जातो . थिएटर मोकळे,गार्डन मोकळे,रस्ते मोकळे ,कुठेही गोंधळ गर्दी नाही .ती तर म्हणते आठवड्यातून एकदा मॅच असुदे म्हणजे असा छान दिवस मिळेल तिला .पण माझी अशी हालत होते त्याचे काय, "? असे म्हणून माझ्या हातावर टाळी देऊन मोठ्याने हसला .

(C) श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment