Tuesday, June 20, 2017

कोकणातील शेतकरी

रविवारी सकाळीच दरवाजाची बेल वाजली. तसा मी वैतागलो. पण दारात रामभाऊना पाहून आश्चर्यचकित झालो .रामभाऊ आमच्या गावातले शेजारी .मुंबईत आले की एक चक्कर आमच्याकडे ठरलेली .
" रामभाऊ असे अचानक "?? मी काळजीने विचारले .
ते आत येऊन बसले . सौ. त्यांना पाणी घेऊन आली "काय वो भाऊ ,गावात सगळा बरा हा ना ?? आपले माणूस आल्यावर तिची भाषा ही बदलली .
"हो सगळे बरे आहेत ", असे बोलून पिशवी तिच्या हातात दिली . नेहमीप्रमाणे त्यात गावाची भेट असणार हे निश्चित .
"तुम्ही तयार व्हा मग आपण बोलू" असे बोलून मी बाहेर पडलो .
काही वेळाने घरी आलो तर रामभाऊ सगळे आवरून बसले होते .सौ.ने त्यांच्यासाठी मोठ्या पेल्यातून चहा खारी, फरसाण आणून ठेवले आणि बाजूला बसली .मीही चहा पित त्यांना विचारले "अचानक का येणे केले ".
"अरे विजयची परीक्षा आहे मुंबईत कसली तरी महिनाभर राहायचे आहे .अभ्यास करावा लागेल . म्हटला तुझ्याशिवाय कोण आहे त्याची काळजी घेणारा ,?? ठेवशील काय पोराक महिनाभर तुझ्याकडे ?? शेवटचा प्रश्न विचारतात त्यांचा स्वर लाजिरवाणे झाला .
"म्हणजे काय रामभाऊ?? हे विचारणे झाले काय ?? हक्काचे घर आहे तुमचे ".मी सरळ म्हणालो .
" ह्या बोलणा तुमका शोभत नाय हो भाऊ . परके करून टाकलाव आमाक एकदम ",सौ ला कंठ फुटला .
"तसा नाय गो बाय पण विचारूक  हवा ना ?? .तुमची पण काम असत .अडचणी असतं .
",असू दे पाठवून द्या त्याला  . तुमचो झिल आमास्नी जड नाय  . सौ.चा मायेचा ओलावा ऐकून रामभाऊ हसले .
"मग काय चालले आहे सध्या रामभाऊ ?. कर्ज माफ होणार तुमची आता" .मी गमतीने विचारले
" छे !!आमची कसली कर्जा. दीड एकरात काय पिकता कोकणात ?. पण हाय कर्ज थोडे ,पैसे मिळाले की हफ्ते भरतय .आमाक नको हो कोणाचा  फुकट .रामभाऊ थोडे रागात बोलले .
"  अरे कर्ज आहे ,शेती आहे मग चालते कसे ? .कर्ज माफीसाठी सगळे भांडतायत .मी विचारले .
" ते मोठे रे बाबा . मी छोटा माणूस .एवढे  पैसे कोणाक लागतंय . दीड एकरात दोन विहिरी ,धा कलम ,दोन काजू ,पाच  माड,धा  केळी ,दोन फणस लावले आहेत . त्यातून थोडेफार मिळतात ,उरलेल्या जागेत भात . सगळं पुरता वर्षभर . कलमाच्या शंभर  पेट्या आंबा निघतो . काजू पण येतात. त्यातले थोडे विकतो ,दिवसभर शेतात राबतो  मग खर्च कसला येतोय .येणाऱ्या पैशात तेल मीठ येते . बायको पोरांक वर्षातून दोन वेळा कापड घेतो .विज्या रिक्षा चालवतो त्याचा तोच खर्च करतो . मग पैसे कशाला लागतात . अगदी काहीच मिळालं नाही तर समुद्रवर जाऊन चिबोर्या पकडायचा. नाहीतर जाळ टाकून मिळतील ते मासे घरी घेऊन यायचे . आता पर्वाचाच बघ ना, रात्री सहज म्हणून समुद्रवर गेलो आणि पन्नास  चिबोर्या पकडल्या .कोण खाईल एव्हड्या मग सकाळी दत्ताअण्णाना देऊन टाकल्या दोनशे  रु ला ".रामभाऊ हसत म्हणाले .
"तसा नाय हो भाऊ, पण बायही आता मोठी झाली .तिचा पण लगीन करूचा असा "आमच्या सौ.ला भारी काळजी .
" हा रत्नाचा होय!! अरे बाजूच्या शिरगावाच्या तोडणकराबरोबर बोलणी चालू हायत. पोरगा बारावी झालाय ,आणि एक कंपनीत कॉन्ट्रॅक्टवर काम करतोय . घरी शेती, कलम आहेत . निर्व्यसनी आहे . जमेल तिचे . पोरगीही जवळच राहील .आणि त्याला शेतात मदत करेल .
"हो पण खर्चाचा काय ?? सौ चा मुख्य प्रश्न .
" कशाला पैसे . लग्न तर आपल्या घरी अंगणात . आणि अर्धा अर्धा खर्च वाटून घेऊ आम्ही . आपल्यात तसाच असता विसरलीस . तुझ्या बापासन काय सगळा खर्च केलान की काय लग्नात ?? असे म्हणून जोरात हसले . ते ऐकून सौ ने नाक मुरडले .
"असो म्हणजे तुम्हाला आता कसली चिंता नाही तर ??मी सहज म्हटले
"तसे नाही भाऊ ,चिंता सगळ्यांना असते . सहा महिन्यांपूर्वी माझ्या पंधरा कोंबड्या रोगाने मेल्या . एका रेडकूला वाघाने उचलला . मागच्या वर्षी पाऊस नाही तर भात ही नाही . आंबे पण लागले नाहीत . पण आपल्याकडे जे आहे त्याचा वापर करीत जगायचे असते . निसर्ग एखादी गोष्ट कमी देतो पण दुसरी भरभरून  देतो . तिचा वापर केला पाहिजे .तेव्हा पोटाला थोडा चिमटा काढून जगले पाहिजे .मेहनत करायला हवी . मी मागच्या वर्षी समुद्राचा वापर केला .मासेमारी केली . स्वतः जाऊन बाजारात विकले .जंगलात जाऊन जांभळं ,करवंद काढली .त्याचा रस बनवला . देवाने पाऊस नाही पण रखरखीत ऊन दिले ना ?? मग त्याचा वापर करून मासे ,करवंदे,वाळवली. कोकम केली ,बाजारात जाऊन विकली . तुला सांगतो घरगुती भेसळमुक्त म्हणून जास्त भाव मिळाला मला . मी कोणालाच दोष देत नाही पण आम्ही शेतकरी आहोत .आमचे पिकवणे हेच काम . मग गप्प बसून कसे चालेल . जगण्यासाठी काहीतरी मार्ग शोधावा लागतो भाऊ" .असे बोलत रामभाऊने हळूच डोळे पुसले .
मीही रामभाऊच्या झुंझार वृत्तीला सलाम केला .

(C) श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment