Sunday, June 4, 2017

निर्णय

काल  संध्याकाळी अवि  घरी आला होता .भाईंना जाऊन पंधरा दिवस झाले होते .  कोणालाच त्रास न देता त्यांनी प्राण सोडले होते . त्यांची अंतिम कार्यही सुरळीतपणे पार पडली होती .  अवि पहिल्यांदाच घराबाहेर पडला आणि माझ्याकडे आला .
"भाऊ ,अरे त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारतात, त्यांची चूक असो वा नसो . पण मोठंमोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना का नाही मारत" ?  त्याचा आवाज चढलेला पाहून त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काही तरी घडले हे नक्की
मी जरा काळजीनेच विचारले" काय झाले अवि ?? "काही नाही, पण आमच्या फॅमिली डॉक्टरच्या सांगण्यावरून भाईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले . बरे हॉस्पिटलही आमच्या डॉक्टरांनीच सुचविले होते .आणि भाईंना केवळ अशक्तपणा वाटत होता म्हणून विश्रांतीसाठी ऍडमिट करायचे होते .  पण त्या हॉस्पिटलमध्ये साधी अँबुलन्सची सोय नव्हती . नशीब विक्रम होता घरी . त्याने अँबुलन्सची सोय करून त्यांना ऍडमिट केले . संध्याकाळी ते तीन वाजेपर्यंत ठीक होते . पण नंतर आशूला डॉक्टरांनी सांगितले की त्यांची तब्बेत खूप नाजूक आणि सिरीयस झालीय .त्यांचा इथे इलाज होणार नाही . मोठ्या हॉस्पिटलच्या ICU मध्ये ऍडमिट करावे लागेल त्यासाठी तिथे साठ हजार भरावे लागतील .अरे आशूला काही सुचेच ना . आणि त्यांचा आजार काय आहे ते आम्हाला माहीत होते .त्यातून ते बरे होणार नव्हतेच .तरीही डॉक्टरांनी असा सल्ला का दयावा ? अरे जिथे आम्हाला कळते की भाई आजची रात्र काढू शकत नाहीत तिथे डॉक्टरांना काही कळत नाही का आणि ते ही सर्व रिपोर्ट्स हातात असताना  . त्यांना समोरच्या रुग्णाची परिस्थिती माहीत नसते का ??  तरीही ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला कसा देऊ शकतात ??. त्या दिवशी भावनिक होऊन कदाचित मी त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असते पण तिथे ते किती दिवस राहिले असते ?? आणि शेवटी भरमसाठ बिल माझ्या माथी मारून मृत भाईंना माझ्या ताब्यात दिले असते .म्हणून मी त्यांना तिथे ऍडमिट न करता सरळ घरी घेऊन आलो आणि पाहिलेस ना घरी आताच अर्ध्या तासात सर्वांसमोर प्राण सोडले त्यांनी ".
मी जवळ जाऊन अवीच्या खांद्यावर हात ठेवला. "अवि खरेच त्यादिवशी तू योग्य निर्णय घेतलास . काही वेळा आपल्याला नाजूक परिस्थितीत  मनाविरुद्ध कठोर निर्णय घ्यावेच लागतात .शेवटी भाईंना घरातच आपल्या माणसातच प्राण सोडायचे होते आणि त्यांची ही इच्छा तुम्ही पूर्ण केलीत . खरेच हल्ली डॉक्टरांकडे ही माणुसकी हा प्रकार शिल्लक राहिला नाही . पेशंट मेला  तरी दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून भरमसाठ बिल माथी मारतील .आणि अश्या बड्या हॉस्पिटलविरुद्ध काही कारवाई करायची आपली ऐपत नसते ",
. माझे बोलणे ऐकून अवि हसला .माझा हात हातात घेऊन म्हणाला", खरेच भाऊ मनावरचे मोठे ओझे उतरले . मी घेतलेला निर्णय योग्य होता हे ऐकून फार बरे वाटले मला ".

No comments:

Post a Comment