Thursday, June 8, 2017

वटपौर्णिमा

",निखिल मी कालपासून खूप विचार करून एक निर्णय घेतलाय "चहाचा कप हाती देऊन निकता म्हणाली तसा निखिलच्या हाताला कंप सुटला .अरे देवा आता ही आपली बायको नवीन काय घोळ घालणार या विचाराने तो हबकला .मागच्या वेळी भटकत्या कुत्रांवर दया येऊन तिने सर्व कुत्री सोसायटीमध्ये गोळा करून आणली आणि नंतर सोसायटीतील सर्व मोर्चा घेऊन घरी आले तेव्हा त्यांना समजावताना नाकी नऊ आले त्याच्या .
"ए बाई ,पाया पडतो तुझ्या काही निर्णय घेऊ नको. पाहिजे तर बाहेर जेवायला नेतो .तो हात जोडून म्हणाला
"अरे हा निर्णय माझा एकटीच आहे . ऐक तर, मी यापुढे वट पौर्णिमेची पूजा करणार नाही ".ती ठसक्यात बोलली .
"आयला काय बोलतेस निकी !!,ग्रेट !! खरेच मी सुटलो बघ" . निखिल हसू दाबीत म्हणाला .
"वाटलेच तु असेच बोलणार .पण मी म्हटले कशासाठी करायचे हे व्रत ?? पूर्वी ठीक होते सर्व सुखी ,आणि आर्थिकदृष्टया श्रीमंत होते .बाईला पैश्याची चणचण नव्हती . नवरा बायको एकमेकांना वेळ देता येत होता .त्यामुळे सर्वाना वाटायचे हाच पती हाच संसार सातोजन्मी लाभावा .पण आता ?? एकतर झाडे कमी . वड शोधावा लागतो . ऑफिस ला सुट्टी नसते . सकाळी लवकर उठून साजशृंगार करा मग पूजा करून आल्यावर घाईघाईने चेंज करून लोकलसाठी धावा .किती कंटाळा येतो रे  . आणि सध्या वडाची पाने ही कुठे मिळतात .आणि  हो ! पर्यावरणाचा विचार करायला नको का ?? किती पाने आणि छोट्या छोट्या फांद्या फुकट जातात .
निखिल म्हणाला," पर्यावरणाचा विचार करत असशील चांगली गोष्ट आहे . करू नकोस तू व्रत .छान कारण आहे", .
"तसे नाही रे ,मलाही आता कंटाळा आलाय हे सर्व करण्याचा . आम्हीच का सर्व करायची व्रतवैकल्ये ?? चांगला नवरा  आणि चांगला संसार मिळावा म्हणून . पण तुम्ही पुरुष तर काहीच करत नाहीत तरी आमच्यासारखी छान  हुशार बायको मिळतेच ना ??
",देवा!!  हा विचार तर मी कधीच केला नव्हता". निखिल हाथ जोडून म्हणाला.
" राहूदे राहूदे ,तसही तुम्हाला सात जन्म सहन करने फारच होतेय . सात जन्म लोकल चा प्रवास तर चुकणार नाहीच आणि दरवर्षी कोकणातच जावे लागेल होळी आणि गणपतीला .निकिता हसू दाबीत म्हणाली .
"हे बघ तू आतामाझ्या गावावर जाऊ नकोस .व्रत न करायची काही ठोस करणे दे ?? निखिल चिडून म्हणाला .
" तेच तर म्हणतेय मी याजन्मी मजेत आणि आनंदात संसार करतोय आपण  पुढच्यावेळी अजून काही वेगळे बघूया ना दोघे . एखाद्या सुपरस्टारची पत्नी असावी अशी इच्छा आहे ,तर त्याच्या पुढच्या जन्मी नेत्याची . काय हरकत आहे लाल दिव्याच्या गाडीतून फिरायला .
" अजिबात हरकत नाही .मलाही भारत सुंदरशी लग्न करायची इच्छा आहे. पुढच्या जन्मी कमीतकमी श्रवण सुंदरी तरी मिळेल ".निखिल हसत बोलला .
संध्याकाळी निखिल घरात शिरतात निकिता बशीतून गरे ,आंबा ,जांभूळ घेऊन समोर आली . तिने ते निखिलच्या हाती दिले व पाया पडली . अरे हे काय?? तू करणार नव्हतीस व्रत ??
"अरे ऑफिस मध्ये कोणी करत नाही पण मीच करते  म्हणून वेगळेपण असतो  तो का मी सोडू ? आणि त्यांच्या पंक्तीत जाऊन बसू ?? पण यावर्षी मी ऑफिसच्या ड्रेसवरच गेले. फांदी तोडायची नाही असे ठरवले मग स्टेशनबाहेरच्या वडाची पूजा केली .पानात वाण न ठेवता कागदाच्या बशीत ठेवले .आणि कामावर गेले.भावना आणि मनापासून करणे महत्वाचे नाही का ?? ती हसून बोलली .
निखिल खुश होऊन म्हणाला ",म्हणजे तुझा पुढच्या जन्मी वेगवेगळे पती मागायचा चान्स गेला .
"जाऊदे रे ,पुढच्या अनेक जन्मी ही तूच पती असशील पण वेगवेगळ्या रुपात ,कधी सुपरस्टार तर कधी नेता,तर कधी खेळाडू .मग काय हरकत आहे तुझी ?? ती लटक्या रागाने त्याच्या छातीवर गुद्दे मारीत म्हणाली.
"माझी काही हरकत नाही. मीही यावर्षी थोडे ऍडजस्ट केले .बरेच दिवस स्टेशनला जाताना एका दुकानात ड्रेस पाहत होतो त्या ड्रेसमुळे तो पुतळा छान दिसत होता म्हणून तो ड्रेस विकत घेऊन आलो तुझ्यासाठी .दरवर्षी साडी काय द्यायची तुला ?? हा घे असे म्हणून अंगावर आलेली उशी चुकवत आत पळाला.
(C) श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment