Friday, June 30, 2017

अस्वस्थ

"भाऊ गेले बरेच दिवस मी अस्वस्थ आहे" . विक्रम चहाचा घोट घेऊन बोलला आणि माझ्या पोटात भीतीने गोळा आला.  सौ.ही किचनमधून शेवटचा बिस्किटंचा पुडा घेऊन बाहेर आली .
" आता काय झाले विकी "? मी काळजीने विचारले .अर्थात ती माझी काळजी होती.
"अरे काय चालले आहे या देशात ?? कुठे चाललाय आपला देश ?? आपल्याला आता याविषयावर चर्चा करायला हवी "विकीने घोषणा केली.
"अजिबात नाही"!!!! मी जोरात बोललो . त्याच्या चर्चेमुळे माझे महिन्याचे बजेट कोसळणार होते याची खात्री झाली . सौ.ने देखील पटकन सर्व डिशेस आत नेऊन ठेवल्या . अशी स्त्री माझी बायको असण्याचा अभिमान परत एकदा मला झाला .
"तुला कधीपासून देशाची काळजी ?? मुलगी दहावी कशी पास झाली हे तुला माहीत नव्हते . तिचा रिझल्ट मी तुला सांगितला . आधी स्वतःचे बघ मग देशाची काळजी कर", मी वैतागून बोललो.
"हेच ते भाऊ!! हेच तुझे मला पटत नाही.अरे किती घाणेरडे राजकारण चालू आहे हल्ली.आपण त्यात लक्ष द्यायला नको ?? पुन्हा एकदा चहाच्या अपेक्षेने सौ कडे पाहत म्हणाला .
"राजकारणाच्या गोष्टी तू मला शिकवू नकोस" मी हसत म्हणालो . कॉलेज सेक्रेटरीच्या निवडणुकीत तुझ्या विरोधात उभी राहिलेली वसुधा नुसती माघार घेऊन थांबली नाही तर भरलेला फॉर्म फाडून टाकला आणि मतदानाच्या वेळी दोन दिवस गायब होती .अजूनपर्यंत मला देखील कळले नाही काय केलेस तू ?? मी मात्र दोन दिवस बापाच्या शिव्या खात होतो", .सौ च्या फिदीफिदी हसण्याकडे लक्ष न देता मी म्हणालो .
"उगाच जुन्या आठवणी नको.गेले दोन दिवस मी व्हाट्स अँप वर सतत जाती,धर्माच्या पोस्ट वाचतोय फार अस्वस्थ व्हायला होते."विक्रम संतापून म्हणाला.
"म्हणजे तू व्हाट्स अँप पाहतोस तर . मेसेजला उत्तर तीन दिवसांनी देतोस मग जगात काय चालू आहे हे तुला उशिराच कळणार ना ?? मी उपहासाने म्हणालो .
"पण खरेच सध्या फार वेगळ्या पद्धतीने राजकारण चालू आहे असे वाटते .मी गंभीर होत म्हणालो "आजपर्यंत राष्ट्रपतींच्या निवडीत सामान्य जनतेला इंटरेस्ट नव्हता. पण आता तो कोणत्या जातीचा आहे .निवडणूक कशी होणार ? .हे सर्वसामान्य जनतेला माहीत झालेत . कोणता नेता कोणत्या जातीचा आहे आणि तो काय करतो हेही कळू लागले . कोणीही उठतो आणि अभ्यास न करता स्वतःचा इतिहास मांडतो .त्याला पुरावा काहीच नसतो .सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींना जातीधर्माचा सहारा घेतला जातोय .आज आपण शेजाऱ्यांकडेही संशयाने पाहू लागलो आहे ".
"खरे आहे भाऊ ",विक्रम उत्तराला", हल्ली ऑफिसमध्ये ही आरक्षणावर खूप वादविवाद होतात .मी त्या भानगडीत पडत नाही . पण त्यामुळे गटबाजी खूप वाढली आहे . पूर्वी एकत्र जेवायचो ,पिकनिकला जायचो . ट्रेनमध्ये जागा पकडायचो एकमेकांसाठी. पण हल्ली ते कमी झाले आहे . प्रत्येकाने आपापल्या जाती धर्माचे ग्रुप बनविले आहेत .चर्चा होते ती फक्त याच विषयावर आणि अगदी हमरीतुमरीवर येतात .मला वाटते आपण पुढे जाण्याऐवजी मागे चाललो आहोत.
" खरे आहे विकी "मी उत्तरलो.
",मग या गोष्टीवर उपाय काय ??
" उपाय एक आहे. आपण या गोष्टीवर आपली मते मांडू नये . सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करू नये . असले मेसेज पुढे फॉरवर्ड करू नये किंवा शेअर ही करू नये .उलट डिलीट करून टाकावे म्हणजे आपल्याकडून बाद होतील अश्या गोष्टी . मी तर म्हणतो ज्या ज्या ग्रुपवर अश्या गोष्टींची चर्चा होत असेल तर त्या ग्रुपमधून बाहेर पडावे .
"बरोबर !! विक्रम टाळी वाजवून म्हणाला.
"पण विकी तू ह्या गोष्टीत कधीच नसतोच मग आज का अस्वस्थ ??? मी जरा कुतुहलानेच विचारले .
"अरे भाऊ,तोआमच्या ऑफिसचा अभिराम माहीत आहे ना "?? मी मान डोलावली "तो दर महिन्यातून दोनवेळा तरी माझ्याबरोबर बसतो.पण गेले काही दिवस मला टाळतोय.परवा तर दुसऱ्या लोकांबरोबर तो बसलेला दिसला . नंतर चौकशी केली तर कळले हल्ली अचानक त्याला जातीचा धर्माचा अभिमान वाटू लागला आहे आणि त्याच लोकांबरोबर त्याची उठबस आहे . मध्येच एका मोर्चातही सहभागी झाला होता म्हणे .अरे अश्या गोष्टींमुळे माझा पार्टनर दूर गेला यार आता दुसरा शोधावा लागेल !!! . ते ऐकून मी विक्रमला हात जोडले .
(C) श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment