Tuesday, June 6, 2017

टिपिकल

ऑफिसात लंच अवर संपायला आला होता . मी ,देशपांडे ,शेट्टी ,पावसकर गप्पा मारत बसलो होतो . इतक्यात वैदेही हसत आत आली .
वैदेही आमची ज्युनियर .अर्थात वयानेही आणि अनुभवानेही . पण नवीन पिढीची प्रतिनिधित्व करणारी .आल्याआल्या तिने पावसकरकडे मोर्चा वळवला .
"पावसकर तुमची बायको एकदम टिपिकल आहे हो "!!
झाले !!! आम्ही सर्व स्तब्ध होऊन पावसकरकडे पाहू लागलो.
"टिपिकल म्हणजे नक्की काय ग ?? पावसकर ने शांतपणे तिला विचारले.
"बघा ना आपण त्या दिवशी तुमच्या घरी गेलो तेव्हा आपल्यात येऊन बसली नाही . सारखी आत बाहेर करीत होती . पाणी ,खाणे ,सरबत यातच अडकून बसली होती .इतक्या छान गप्पा चालल्या होत्या आपल्या. पण येऊन सहभाग घेतला नाही "
",हे बघ बाळ " पावसकर हसून म्हणाला. तसे तिने नाक मुरडले." पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदाच आलात. त्यामुळे तुमचे योग्य स्वागत करणे हे गृहिणी या नात्याने तिचे कर्तव्य ठरते .  तुमचे स्वागत करण्यात तिचा वेळ गेला . दुसरे म्हणजे आपल्या चर्चेत तिचा काही संबंध येत नव्हता म्हणून ती आपल्यात बसून कोणाचीही ऑकवर्ड परिस्थिती होऊ नये म्हणून आलीच नाही",.
",आहो पण तिला व्हाट्स अप मेसेज पाठवते तीही खूप उशीरा कधीतरी पहाते ,चुकून कधीतरी रिप्लाय देते ",वैदेही म्हणाली
",म्हणजे ती व्हाट्स अप पाहत नाही. फेसबुक वर नाही म्हणून टिपिकल का", ??   पण ती रोज माहेरी फोन करून म्हातारीची तब्बेत विचारते .तिच्याशी प्रेमाने बोलते . ज्यांचा वाढदिवस असेल त्यांना फोन करून शुभेच्छा देते . आजारी नातेवाईकांना आठवणीने भेटायला जाते .हे सर्व ती घरातील कामे करुन करते",पावसकर हसून म्हणाला
", बरे ती कधी जीन्स ,टॉप ,टी शर्ट घालीत नाही का ??वैदेहीचा मूर्खासारखा प्रश्न .
", घालतेना ,पण बऱ्याच वेळी तिला लग्न ,पूजा ,दिवस अश्या समारंभाला जावे लागते तिथे हे शोभून दिसत नाही म्हणून बहुतेक करून साड्याच नसते . आम्ही कधी फिरायला गेलो की जीन्स घालते . पण मला तिला साडीमध्येच पाहायला आवडते म्हणून ती साडी नसते."पावसकर अतिशय शांतपणे उत्तरे देत होता .
" तिच्या कोणी मैत्रिणीवगैरे नाहीत का ? कधी त्यांच्याबरोबर पिकनिक वगैरे ",आता वैदेहीही पेटली .
", हो ते ही असते ना . पण सर्व आवरून . आपल्या मौजेखतार दुसर्यांना त्रास होऊ नये ही काळजी आणि हो ती घरचे करून ,बाहेर बँकेची कामे ही करते . आई बाबांची औषधे . मुलांचा अभ्यास ह्याही गोष्टी कराते .आणि हो ती पदवीधर आहे बर का !!! पावसकर हसून बोलला
"तसे नाही हो, वैदेही थोडी चिडून म्हणाली", पण त्या ऍक्टिव्ह वाटत नाही . सतत कामाच्या रगाड्यात अडकलेल्या वाटतात",
.म्हणजे तिने  काय करावे अशी तुझी अपेक्षा आहे ? ती कोणाच्या हळदीला ,वाढदिवसाला गेली की आवडत्या गाण्यावर मनमुराद नाचते . आठवड्यातून दोनदा संगीताच्या क्लासला जाते . गावी गेली की समोरच्या समुद्रात झोकून देते स्वतःला . दोन तास तरी पोहते .जंगलात जाऊन रानमेवा गोळा करते . तर रात्री चिम्बोर्या पकडायला जाते .आणि मुंबईत गरज लागेल तेव्हा स्कुटर घेऊन जाते .
आम्ही मजेत वैदेहीच्या चेहऱ्याकडे पाहत होतो .तिचा चेहरा रडवेला झाला होता .शेवटी गप्प बसण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हताच  आम्हीही मनोमन पावसकर वहिनींना हाथ जोडले .
(C) श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment