Wednesday, November 1, 2017

प्रायव्हसी

वनीताचा निरोप आला तसा मी तडक निघालो . काहीतरी घडल्याशिवाय ती मला बोलवणार नाही याची खात्री होती. नक्कीच विक्रमचा नवा घोळ असेल.
घरी गेलो तेव्हा साहेब घरी आले नव्हते . पण आशु घरी होता.आशुतोष उर्फ आशु विक्रमचा मुलगा . इंजिनियरिंगला आहे .अतिशय शांत . मी सवयीप्रमाणे आशुची चौकशी केलीं.
वनिता काळजीने बोलली "आहे बेडरूममध्ये".
"मी भेटून येतो ",असे म्हणतात ती म्हणाली ",जा.. पण दरवाजा वाजवून परवानगी घ्या आणि आत जा".
मला काहीच कळले नाही तरीही मी दरवाजा वाजवला .तोच आतून त्याचा चिडका आवाज आला "कोण आहे आता "???
अरे बापरे मी थोडा दचकलोच पण स्वतःची ओळख करून दिली तेव्हा त्याने दरवाजा उघडला ."काका तुम्ही"... ?? तो नाखुषीनेच बोलला.
"हो....!! कसा आहेस"?? असे विचारत त्याच्या हातात मिठाईचा बॉक्स दिला. इतरवेळी हौसेने खाऊ घेणार आशु यावेळी नाराजच दिसला.नाखुषीनेच त्याने तो बॉक्स हातात घेतला.
"काका सॉरी हा...!! पण बिझी आहे मी" असे म्हणत दरवाजा बंद केला.
मी चमकून वनिताकडे पाहिले .तिने रडवेला चेहरा करून माझ्याकडे पाहिले.
"काय सांगू तुला भाऊ ..,हल्ली काही दिवस हेच चालू आहे . एकटा एकटा राहतो . रूम बंद करून आत काय करतो ते कळत नाही .विचारले तर म्हणतो माझ्या प्रायव्हसीत येऊ नका.त्यादिवशी मी रागात बोलले. तर टीव्हीवरची ती नूडल्सची जाहिरात दाखवून म्हणतो बघ सर्वाना प्रायव्हसी हवी असते ती मुलगी बघ आईलाही बाहेर पाठवते रूम मधून.म्हणजे आता आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी जाहिरातींचाही आधार घेतायत.अरे..! माझे ठीक पण याच्या बापाला कळले तर हैदोस घालेल तो... तुला माहीत आहे विक्रम कसा आहे . सर्व काही करेल तो पण असले काही खपवून घेणार नाही".
" हम्म ....मी मान डोलावली . थोडे दिवस बघू आणि बोलू त्याच्याशी.अरे हे वय असेच असते"असे तिला समजावले आणि चहा पीत बसलो.
इतक्यात विक्रम आत शिरला आणि मला पाहताच खुश झाला .मोठ्याने हाक मारून वनिताला बोलावले आणि बॅग तिच्या हाती दिली" आशु कुठेय "?? आजूबाजूला पाहत त्याने वनिताला विचारले . काही न बोलता तिने त्याच्या बेडरूमकडे बोट दाखविले.
विक्रमने सरळ दरवाजा लोटला तेव्हा आशु चिडूनच बाहेर आला "काय हो 'पपा ..?? दरवाजा वाजवून येता येत नाही का".. ?? एका क्षणात विक्रमचा चेहरा बदलला . काही कळायच्या आतच त्याचा हात वर गेला आणि विजेसारखा आशूच्या गालावर आदळला. आम्ही हादरलो.... आशूच्या डोळ्यासमोर काजवे चमकले.
"बापाला शिकवतोस काय "?? विक्रम कडाडला."कोण आहेस तू ?? साधा बापाच्या पैशावर शिकणारा मुलगा . नशीब तुझे म्हणून सर्व काही जाग्यावर मिळतेय . स्वतःची बेडरूम आहे तर तुला हे थेर सुचतात .प्रायव्हसी पाहिजे तुला...  ?? का ….?? कशाला... ?? इतके काय करतोस तू..??? विक्रम सुरू झाला.
मी त्याला थांबविले ",अरे तो मोठा झालाय . ताण असतो अभ्यासाचा . प्रायव्हसी हवी असते त्यांना.
"कसली घंटा प्रायव्हसी... ?? आणि अभ्यास काय हाच करतो... ?? आम्ही नाही केला.. ?? अरे आपणही इंजिनियर आहोत .बेसिक नाही बदलले ना ?? न्यूटनचे नियम तेच आहेत. याला तर स्वतंत्र बेडरूम आहे . क्लास आहे. ढुंगणाखाली गाडी आहे.तरी याना प्रायव्हसी पाहिजे. लहानपणी घरात जागा नाही म्हणून गार्डनमध्ये बसून रात्र रात्रभर अभ्यास केला . बापाकडे पैसे नाहीत म्हणून क्लास केला नाही . याना काय कळणार आमची मेहनत". बोलता बोलता विक्रमचा कंठ दाटून आला .
माझ्यासमोर येऊन हात हाती घेऊन म्हणाला" तुझे बरोबर आहे भाऊ .मुलांशी कधी या गोष्टी बोललोच नाही .आपण जे हाल काढले ते त्यांना काढावे लागू नये म्हणून त्यांना पाहिजे ते दिले.पण त्याची  कदर नाही त्यांना. आजच्यासारखी कानाखाली आधीच वाजवली असती तर आजचा दिवस बघावा लागला नसता".
ते ऐकून आशु  विक्रमच्या जवळ आला आणि मिठी मारून हमसाहमशी रडू लागला.
मी विक्रमला म्हटले ",बघ ....! इतकीही आपली मुले वाया गेली नाहीत.त्यांनाही कळते आपण कुठे चुकतोय आणि ते मान्य करायची तयारीही आहे त्यांची .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment