Friday, November 3, 2017

शोध राजीव हत्येचा ...डी. आर. कार्तिकेयन

शोध राजीव हत्येचा ...डी. आर. कार्तिकेयन
                                राधाविनोद राजू
अनुवाद.......... सारंग दर्शन
राजहंस प्रकाशन
21 मे 1991च्या रात्री आपल्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात श्रीपेरुम्बुदूरला सभा घ्यायची राजीव गांधींनी नक्की केले होते .अतिशय कडेकोट बंदोबस्तात सभेची तयारी झाली होती.लता आणि तिची तरुण मुलगी  कोकिळाही राजीव गांधींना भेटायला उत्सुक होती .तिच्या मागेमागेच नारिंगी हिरवा सलवार कमीज घातलेली मुलगी येत होती . तिच्या हाती चंदनाचा हार होता .स्थानिक पत्रकार आणि छायाचित्रकार हरिबाबू तिथे फोटो काढत होता .कुर्ता आणि पायजमा घातलेला तरुण काही अंतरावर शांतपणे उभा होता.
राजीव गांधी पोचले अशी बातमी थडकली आणि एकच गोंधळ उडाला .इंदिरा गांधींच्या पुतळ्याला हार घालून राजीव गांधी सभास्थानी निघाले . महिलांच्या ठिकाणी येताच कोकिळाने आपली कविता त्यांना ऐकवली आणि ती सलवार कमीजमधली चष्मीस तरुणी हार घेऊन पुढे सरकली .उपनिरीक्षक अनुसयाने तिला अडवायचा प्रयत्न केला पण राजीव गांधींनी तिला येऊ दे अशी खूण केली .तिने तो हार त्यांच्या गळ्यात घातला आणि पायाला हात लावण्यासाठी वाकली आणि अचानक कान बधिर करणारा आवाज झाला .राजीव गांधी जिथे उभे होते तिथे वीस फुटाचा आगीचा लोळ उसळला. ते जिथे उभे होते तिथे त्यांची निशाणी ही शिल्लक नव्हती .राजीव गांधीसाहित पंधरा जणांचा जागीच मृत्यू झाला .पायातील लोटो च्या शूजवरून राजीव गांधींची ओळख पटली .एक राजकीय हत्येचा कट अतिशय सुनियोजित पद्धतीने रचला गेला आणि यशस्वीपणे पार पडला गेला .
दुसऱ्या दिवशीच कार्तिकेयन याना या हत्येचा तपास करण्यासाठी प्रमुख अधिकारी म्हणून नेमले गेले .दुसऱ्या दिवसापासूनच हातात काहीही धागेदोरे नसताना दिवसाचे वीस तास सलग तपास सुरू झाला .१०४४ जणांना साक्षीदार म्हणून नोंदण्यात आले .१४७७ कागदपत्र ,११८० पुरावे नोंदले गेले .पहिली अटक झाल्यापासून एका वर्षाच्या आत हत्येचा छडा लावून आरोपींवर आरोपपत्र दाखल केले गेले .अतिशय योजनाबद्ध आणि अथक परिश्रमानी कार्तिकेयन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या हत्येचा तपास लावून एक आदर्श सर्वांपुढे ठेवला.
एक मन गोठविणारी ,उदास करणारी अतिशय वेगवान सत्य तपासकथा .खरे तर हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असायला हवे कारण राजकीय हत्येचा सहसा तपास लागत नाही ही समजूत भारताने खोटी ठरवली
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment