Saturday, November 11, 2017

कमलाकर अकॅडमी

मागून गाडीचा हॉर्न ऐकू आला आणि मी दचकून फुटपाथवर उडी मारली.
"कोण आहे "......? म्हणून रागाने पाहिले. तर कारमधील व्यक्ती माझ्याकडे पाहून मिश्किलपणे हसत होती.
"केके ....तू ??? मी आनंदाने ओरडलो . केके उर्फ कमलाकर कदम माझा वर्गमित्र . पण शिक्षण संपल्यावर गायब झाला . मध्ये मध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला करून घ्यायचा . पण तसा संबंध नव्हताच . मध्येच अचानक गायब झाला तो आता असा समोर आला.
"अबे भाऊ ... आहेस का जिवंत... ?? चल बस.." असे बोलून बाजूला बसविले.
इतकी नवीन गाडी .छान कपडे पाहून मी हैराण झालो. हळू आवाजात विचारले", केके.. ही गाडी तुझीच का" ? मोठ्याने हसत त्याने माझ्या खांद्यावर थाप मारली.
गाडी एका दोन मजली इमारतीसमोर थांबली आणि समोरच्या ऑफिसकडे बोट दाखवून म्हणाला ",ते माझे ऑफिस".
मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले . तो समजला . "चल सांगतो".असे म्हणून आत नेले.
समोर मूठ वळवलेल्या हाताचे चित्र होते आणि खाली लिहिले होते आम्ही तुम्हाला उपाशी ठेवणार नाही कमलाकर अकॅडमी.
"हे काय.... ?? मी आश्चर्याने विचारले
"बस भाऊ..,आणि चहाची ऑर्डर देऊन तो बसला . त्याच्या टेबलवर फक्त लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन होते.
"मी कार्यशाळा किंवा तुझ्या भाषेत क्लास घेतो मुलांचे."तो शांतपणे म्हणाला.
" अरे वा ...! चांगला धंदा आहे हा"..मी हसून म्हणालो.
"तसे नाही भाऊ ..माझ्याक्लासमध्ये फक्त दहावीत पस्तीस ते चाळीस टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच  प्रवेश आहे .  त्या मुलांना इतर ठिकाणी प्रवेश मिळत नाही . जरी मिळाला तरी कॉलेजमध्ये शिकविलेले कळत नाही आणि मुळात आपल्याकडे शिकला की नोकरी मिळते ,पैसा मिळतो हा समज आहे . आयटीआयमध्ये शिकले तरी मोठ्या कंपनीत नोकरी पाहिजे ही अपेक्षा.
"मग तू काय करतोस"...?? मी उत्सुकतेने विचारले .
"एक साधा प्रश्न भाऊ ..,तुझ्या घरी ट्यूबलाईट गेली तर तू काय करतोस ..??
मी नसलो तर बायको वायरमनला बोलावते आणि काम झाले की त्याला 100 रु देते". मी उत्तरलो
"बघ साधे ज्ञान असेल आणि त्याने अशी रोज दहा कामे केली तर किती कमावेल तो ?? साधारण पंचवीस हजार रु महिना" मी उत्तर दिले.
" बस ...हेच शिकवतो आम्ही त्यांना.आपल्या ओळखीचे आणि कॉलेजचे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत .सर्वांशी माझा सोशल मीडिया आणि प्रत्यक्षातही कॉन्टॅक्ट आहे . मी त्यांना त्यांची अपेक्षा विचारतो आणि त्याप्रमाणे मुले तयार करतो आणि त्यांच्याकडे पाठवून देतो.त्यांनाही आयती मुले मिळतात आणि मुलांना काम".
"अरे पण काही  कामे धोक्याची आहेत. सर्टिफिकेट लागते. त्यासाठी काय करतोस".. ??? मी तांत्रिक प्रश्न विचारला.
"इथेच तर माझे काम आहे भाऊ .मी त्यांना प्रशिक्षण देतो .त्यासाठी ही माझेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्र मदतीला येतात . त्यांना जसे पाहिजे तसे त्यांना घडवितात आणि परीक्षा द्यायला लावतात . तोपर्यंत त्यांना साधी कामे देऊन कामाची माहिती घ्यायला लावतात . काही ठिकाणी गरज नसते सर्टिफिकेटची तिथे आम्ही डायरेक्ट पाठवतो . उदारणार्थ डेटा एन्ट्रीला सात दिवसाचे प्रशिक्षण दिले की आठव्या दिवसापासून कामाला सुरुवात.मला फक्त इथे बसून सर्वांचा डेटा लॅपटॉपमध्ये भरावा लागतो" .केके हसत म्हणाला .
"पण मुले मध्येच सोडून गेली तर .
"जाऊदे ना.. ??? मग त्यांचे नशीब.पण आपल्याकडे दुसरा आहेच. आता आपला सत्यवान भावे माहीत आहे का ?? मोठा इंटिरियर झालाय . त्याला सतत प्लंबर .वायरमन .सुतार लागतात .मी त्याला मुले देतो .प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन ते सहा महिन्यात तयार होतात.
"अरे ...असे कितीतरी छोट्या छोट्या कामात माणसे लागतात .फक्त आपली  तयारी हवी माणसे तयार करायची.जी मी करतो.  दहावीनंतर सगळेच इंजिनियर डॉक्टर ,सीए बनायला गेले तर ही कामे कोण करेल . तुम्ही डॉक्टर व्हाल आणि बाथरूमचा साधा पाईप बदली करायला माणूस शोधाल . तो दहा  मिनिटाच्या कामाचे दोनशे  रु घेणार तुम्ही ते देणार .  ही कामे करून तुम्ही उपाशी मारणार नाही . हेच आमचे बोधवाक्य.
"खरेच केके ..आपल्या लक्षातच येत नाहीत या गोष्टी .चांगल्या मार्गाने पैसे कमविणे हेच सगळ्यांचे ध्येय असते . आपापल्या कुवतीनुसार प्रत्येकाने तो कसा कमवायचा हे ठरविले पाहिजे . खरेच तुला हे कळले आणि तू दुसर्यांना मार्ग दाखवितोस .माझाही नंबर घेऊन ठेव गरज पडल्यास मीही तुझ्याकडूनच मुले घेईन .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment