Friday, November 17, 2017

गेट टू गेदर

सकाळीच ऑफिसमध्ये बंड्याचा फोन. हरिभाऊना ऍडमिट केलेय संध्याकाळी जाऊ बघायला.पण बोलताना हसत होता.त्याच्या स्वरात चिंता जाणवलीच नाही.मीही हसून बोललो ",ठीक आहे  जाऊ ". मग सहज विक्रमला फोन करून विचारले तसा तो भडकला", म्हाताऱ्याला काही कामधंदा नाही काय...??  की आम्ही रिकामे बसलोय.? यावर्षात चौथ्यांदा हॉस्पिटलमध्ये गेलाय म्हातारा , मी नाही येत आणि तुही जाऊ नकोस.गेलास तरी काही घेऊन जाऊ नकोस उलट त्याच्याकडून ज्यूस बिस्कीट खाऊन ये". मी इथूनच हात जोडले त्याला.
हरिभाऊ आमच्या सोसायटीमधील एक . सध्या निवृत्तीचे जीवन जगतायत . तब्बेतीची  खूप काळजी घेतात असे आमचे मत . काही झाले की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात मग सारे त्यांना भेटायला जातात .यावेळीही काहीतरी वाटले असेल म्हणून झाले असतील ऍडमिट . मी बंड्याला घेऊन संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेलो. नारळाचे पाणी सोबत घेतले.
हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बेडजवळ खूप गर्दी दिसली .क्षणभर माझा काळजाचा ठोकाच चुकला... पण जवळ जाताच हास्यविनोद चालू असलेले दिसले . बरेसचे  नातेवाईक उभे राहून,बाजूला बसून त्यांच्याशी गप्पा मारीत होते . तर दोन तीन लहान मुले त्यांच्या कुशीत शिरून खेळत होती . मध्येच कोणतरी विनोद करीत होता त्यामुळे हास्याचे फवारे फुटत होते . विक्रम बोलला तेच खरे आहे .म्हाताऱ्याला काहीच झाले नाही . मी आणलेले नारळ पाणी बंड्याच्या सॅकमध्ये टाकले .  बंड्या माझ्याकडे पाहून सहेतुक हसला.
आम्हाला पाहिल्यावर क्षणभर शांतता पसरली . मग काही लोक त्यांचा निरोप घेऊन निघाली . जाता जाता म्हणाली", हरिभाऊ खूप मजा आली हो आज .....
"मज्जा ...? मी चकितच झालो.
मी चिंतीत चेहरा करून विचारले", हरिभाऊ कसे आहात ...??
"मस्त ..... !! एकदम फिट...!!आणि हसले . बाजूच्यानीही हसून दुजोरा दिला.
मग त्यांनी सांगितले" बरे वाटते आता ..नाहीतर तो कोपऱ्यातला पेशंट बघ ..खूप सिरीयस आहे . तरी कोणी येत नाही . मरेल दोन तीन दिवसात .आणि काल रात्री त्या बेडवरचा झोपेतच गेला . आम्हाला माहीतच नाही . असे म्हणत त्यांनी वॉर्डमधील प्रत्येक पेशंटची माहिती मला दिली .इतकेच नव्हे तर चहाची ऑर्डर देऊन बाजूच्या कपाटातून बिस्किटंचा पूडा काढला.
मी आश्चर्याने विचारले ",हरिभाऊ मी तुमची चौकशी करायला आलो आणि तुम्ही तर दुसऱ्यांबद्दल सांगताय आणि उलट आमचाच पाहुणचार करताय".
तसे ते हसले पण त्या हास्यात वेदना होती . "भाऊ.. तुला आश्चर्य वाटत असेल ना ?? जरा काही झाले की मी ऍडमिट होतो.हो खरेच आहे . कारण आम्हा म्हाताऱ्यांकडे बाहेर कोणीच लक्ष देत नाही रे . सर्दी खोकला झाला तरी कोण फार लक्ष देत नाही . कोणालाही वेळ नाही आमच्यासाठी . मग आम्ही दोघे एक गेटटूगेडदर करायचे ठरवितो . सरळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो . आमच्यापैकी कोणी ऍडमिट आहे असे कळताच सगळे धावून येतात .यावेळी मात्र वेळात वेळ काढून येतात.पहिल्याच वेळी जाणवले अरे कोणीच कोणाला भेटत नाहीत . हाकेच्या अंतरावर  भाऊ राहत असला तरी त्याची चौकशी फोनवरून होते .माझे चुलतभाऊ तर दोन वर्षे एकमेकांना भेटले नव्हते . त्यादिवशी मला पाहण्याच्या निमित्ताने एकत्र आले .जाताना मला धन्यवाद देऊन गेले. मी ऍडमिट झालो की माझ्या मुलाला बरोबर सुट्टी मिळते . मग तोही पूर्ण वेळ कुटुंबाला देतो . नाहीतर तो कधी घरी सापडतो का ???  सर्वजण इथे येतात एकमेकांना भेटतात छान गप्पा मारतात . एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवितात . खरे सांगू आम्हा म्हातारा म्हातारीला ही खूप वेळ मिळतो इथे एकमेकांशी बोलायला आणि मुलाला ,सुनेलाही घरी वेळ मिळतो . खूप काही कमावतो मी या दिवसात .हा थोडे पैसे खर्च होतात पण आपल्यावर प्रेम करणारी माणसे ओळखता येतात . आज त्यांना एकत्र यायला .बोलायला वेळ नाही पण असे काही झाले तर हातातील कामे टाकून धावत येतात. ही जाणीवही उरलेले आयुष्य काढायला पुरेशी असते ".असे म्हणत त्यांनी अलगद डोळे पुसले.
मी काही न बोलता प्रेमाने त्यांचे हात हाती घेतले आणि मुकाट्याने बंड्याच्या सॅकमधील नारळ पाण्याची पिशवी काढुन त्यांच्या हाती दिली .
© श्री . किरण बोरकर

No comments:

Post a Comment