Sunday, November 19, 2017

हुशार ड्रायव्हर

स्थळ ... धावती रेल्वे जनरल डब्बा कणकवली ते रत्नागिरी
वेळ .... रात्री आठ
माझ्या शेजारी बसलेला इतका विद्वान असेल असे त्याच्या चेहऱ्यावरून मुळीच वाटत नव्हते. ते सर्व सहप्रवासी एकमेकांशी गप्पा मारीत होते आणि मी रसिक श्रोता बनून त्यांचे विचार ऐकत होतो.
"साधारण नॉर्मल माणसाचे  बीपी किती असावे? नव्वद ते एकशेवीसना... ??? मला साठ ते नव्वद आहे ...".असे बोलून तो थांबला आणि सर्वांच्या चेहर्यावरून नजर फिरवली.सर्वांच्या चेहऱ्यावरील भाव त्याच्या अपेक्षेप्रमाणे झाले तेव्हा तो पुढे म्हणाला . "पंचावन्न झाले की तू मेलास... असे डॉक्टर म्हणतात पण मला काही होत नाही. कारण मी तंबाखू खातो .त्याने माझे प्रेशर आटोक्यात राहते.बघा जी वस्तू जीवघेणी आहे ती मला आयुष्य देतेय".असे बोलून त्याने खिडकीशेजारी बसलेल्या मुलाला थोडे बाजूला करून बाहेर पिचकारी मारली.मुलाच्या कपड्यावर किती डाग पडले याची त्याला फिकीर नव्हती.
"अरे कसल्या नोटबंदी...." ?? बापरे म्हणजे आता भारतीय अर्थव्यवस्था ऐकू  मी मनात म्हटले .
"सर्व आधीच प्लॅन ह्यांचा . सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांशी आधीच सेटिंग होते.माहितीय ना मला ?? आणि त्या विषयावर चर्चा रंगली.
मग विषय झाला मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याचा. ते तीन अधिकारी म्हणे हल्ल्यात मेले ??? कसले हो ....??यांनीच संपविले त्याला . नाहीतर इतके मोठे अधिकारी एकाच गाडीतून का प्रवास करतील . ह्यांना वाटते पब्लिक मूर्ख आहे" .
इतक्यात डब्यात जेवण आले . त्याने ताबडतोब बिर्याणी घेतली ."किती .....????
' 80 रु ......वेटर ने किंमत सांगितली .
" रेंट कार्ड दाखव.... 70 रु आहे माहितीय मला.छापील किंमत कुठे ???  ह्याने आवाज चढविला .
"जाऊद्या हो" .....शेजारील त्याचा श्रोता म्हणाला . "आहो किमती प्रमाणे जेवण असते का... ?? त्या दिवशी मी तेजसने गेलो.किती फालतू जेवण.
" आयला तेजसने जाणारा माणूस आज जनरल डब्ब्यात "....?? बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या.
" त्यावेळी बर्यापैकी वेळ होता  म्हणून गेलो" त्याने बेफिकीर होऊन उत्तर दिले.त्यानंतर बिर्याणी खात बऱ्याच विषयांची खमंग चर्चा झाली.
मनात विचार आला इतके विचार करणारे नागरिक या डब्यात असतील तर देशात किती असतील ?? तरीही आपला देश मागे का.. ?? सचिनने निवृत्त कधी व्हावे हे बॅट हाती न धरलेले ठरवितात .तर अमिताभ बच्चनला आता अभिनय जमत नाही हेही हीच लोक ठरवितात .थोडक्यात ह्या लोकांकडे सगळी उत्तरे असतात पण तुम्ही त्यांना संधी देत नाही .असा त्यांचा मुद्दा .
माझे ठिकाण आले तसामी उठलो न बोलता निघणार होतो पण राहवले नाही म्हणून विचारले", दादा काय करता हो तुम्ही  ...???
"मी ट्रक ड्राइव्हर आहे .मुंबई ते सातारा फेऱ्या मारतो".माझ्या डोळ्यात उमटलेली आदराची भावना पाहून तो सुखावला .
© श्री .किरण बोरकर

No comments:

Post a Comment