Thursday, November 23, 2017

करार

मिनाक्षीचे लग्न ठरले आणि आमच्या घरात आनंद पसरला.जरी ती सौ.ची भाची होती तरी आम्हाला मुलीसारखी.परिस्थिती बेताची म्हणून आमचा जास्त जीव तिच्यावर.तीही कशीबशी पदवीधर झाली आणि छोट्या कंपनीत नोकरीला लागली. मुलगी सालस आणि लाघवी. कधी आवाज चढलेला पहिला नव्हता मी .
तिच्या लग्नाची बोलणी करायला आम्ही गेलो . नवऱ्याकडील परिस्थितीही बेताचीच . पण एकूण बरे दिसत होते.प्राथमिक बोलणी तर यशस्वी झाली होती.मुलांकडून फारश्या अपेक्षा दिसत नव्हत्या.लग्न साधेपणाने करायचे ठरले होते . जेवणाचा मेनू ही साधाच होत. हे मात्र मीच आग्रहाने ठरविले होते.जेवण वाया जाऊ नये हीच अपेक्षा होती.
आजही काही बोलणी करावी म्हणून आम्ही मुलाकडे गेलो . चहापाणी झाल्यावर मी थोडा वेगळाच विषय काढला." समजा उद्या मुलांच्यात आणि मुलींच्यात वितुष्ट आले तर"..?  बापरे माझे बोलणे ऐकून सगळेच चमकले . सौ.ने कोपराने ढोसले आणि कुजबुजली "काहीही काय बोलता.. ?? म्हटले "का.. ?? काही गोष्टी आताच क्लिअर करू .लग्न जुळवतो आपण...ठरवितो आपण ..पण लग्न झाल्यावर काही वर्षं तरी त्यांची जबाबदारी घ्यायला नको...?? तुम्ही म्हणता एकदा लग्न लावून दिले की मोठया जबाबदारीतुन सुटका झाली . पण आपली पोर कशी संसार करतायत..?? त्यांच्या अडचणी काय आहेत??हे कळायला नको .
तसे मुलाचे वडील म्हणाले "हो भाऊ...!! बरोबर आहे तुमचे. हा मुद्दा माझ्याही लक्षात नाही आला.मान्य लग्न झाल्यावर संसार त्यांनाच करायचा आहे पण आपण त्यांच्या मागे उभे राहिलेच पाहिजे. लग्नाची नवलाई संपली की संसाराचे खरे चटके सुरू होतात मग कुरबुरी चालू होतात . मुलगा तर बायकोला कधीही घराबाहेर काढायची धमकी देतो . आणि बायको बिचारी माहेरच्यांना त्रास नको म्हणून सहन करते . काही वर्षानि दोघांचेही खरे गुण बाहेर येतात आणि चिडचिड  सुरू होते. मुलाचे ठीक आहे पण बिचार्या मुलीने काय करायचे . यावर ही उपाय करायला हवा. बोला तुम्ही.आपण दोघांनी मिळून ठरवू ".
"हरकत नाही "...मी म्हटले ",पहिला कालावधी ठरवू . आपण काय त्यांना जन्मभर बघणार नाही आहोत . पण मुलांचे शिक्षण व्यवस्थित होईपर्यन्त तरी दोन्ही घरातल्यानी मुलीला सपोर्ट करावा .आपण लग्न ठरविताना कागदोपत्री काही ठरवत नाही आणि तशी आपली परंपरा ही नाही . पण लग्नानंतर मुलीची छळवणूक ,काही टोचून बोलणे आणि इतर गोष्टी असतात त्यामुळे मुलीला जीव नकोस होतो आणि त्याचे पुढे मोठे परिणाम भोगावे लागतात .आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी नेहमीच उभे राहू पण माहेरचे खंबीर आहेत म्हणून तिची जबाबदारी झटकून टाकाल तर ते आम्ही मान्य करणार नाही.पाहिजे तर आम्ही हे लिहून द्यायला तयार आहोत".
आमचा हा पवित्रा पाहून तिकडच्या मंडळींनीही होकारार्थी माना डोलावल्या आणि मिनाक्षीचा चेहरा खऱ्या अर्थाने खुलला.
© श्री . किरण बोरकर

No comments:

Post a Comment