Monday, November 27, 2017

अंत्ययात्रा

कोणाचा मृत्यू झाला तर घरातील व्यक्ती  सोडून बाकी कोणालाच त्याचे फार वाईट वाटत नाही.त्यात कोणी वृद्ध वारले असतील तर घरच्यांसकट सर्वाना सुटलो......!! अशी भावना होते आणि अंत्ययात्रेचे स्वरूप एखाद्या संमेलनासारखे होते.काहीजण त्या निमित्ताने नातेवाईक भेटतील म्हणून जातात.तर काही जुने मित्र.तर काही खरोखरच अंत्यदर्शनाला जातात. पण सर्वांचा हेतू प्रामाणिक असतो . त्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला आपण हजर राहावे किंवा दिवसाला तरी हजर असावे असे मनापासून वाटते . नशीब अजून ऑनलाइन अंत्ययात्रा किंवा दिवसाला हजर राहण्याची योजना कोणी शोधून काढली नाही.
हे सगळे आठवायचे कारण म्हणजे त्या दिवशी जनाआजी गेली .वय वर्षे 93 ...त्यामुळे तिच्या जाण्याचे दुःख कोणालाच नाही... प्रत्येकाने किती वाजता नेणार म्हणून वेळ विचारली आणि आपापली सोय केली . पहाटेच गेलीम्हणजे सगळ्यांना सुट्टी काढावी लागली. विक्रम ही माझ्याकडे आला तेही वडापाव घेऊन विचारले तर म्हणतो म्हातारीचे होईपर्यंत दोन वाजतील ....तो पर्यंत काय उपाशी राहायचे ??? मलाही पटले आणि दोन वडापाव खाऊन घेतले.मी म्हटले ऑफिसचे काय ?? काळजी नको आजीसाठी एक दिवस ठेवलेला.
मग तयारी करताना सगळे कसे आरामात करत होते ."इतके दिवस काढले...अजून काही तास काढले असते तर सर्व दिवस भरूनच आले असते ना ....??? कोणतरी पुटपुटला.
"म्हणजे म्हातारीने आता तुमची वेळ पाहूनच वर जायचे का.... ??? विक्रम थंडपणे म्हणाला.
कोण म्हणतो तिरडी नीट बांधा रे म्हातारी जड आहे.रस्त्यातच खाली यायची . एकाने  राहुलला विचारले "अरे इलेक्ट्रिक की लाकडावर...." राहुल म्हणाला "घरी विचारतो."
इतक्यात बंड्या म्हणाला ",इलेक्ट्रिकवर घे आजीला दोन माणसांची लाकडे लागतील.पर्यावरणाची काळजी घेऊ ". कोणीतरी मागून त्याच्या टपली मारली.
अश्यातऱ्हेने  शेवटी जनाआजीला स्मशानात घेऊन गेले . तिथेही काही लुडबुड करणारे होतेच .पण एकदा इथे आलो की आता सर्व लवकर संपेल या खात्रीनेच कोणी जास्त लक्ष देत नाही . पण जसा अग्नी दिला तेव्हा माझ्यासकट कित्येकांचे डोळे ओलावलेले पाहिले मी.निघताना मुद्दाम विक्रमला विचारले "तूच म्हणालास ना.. सुटलो..!! सर्व मग हळूच डोळे का पुसत होतास".
" माहीत नाही भाऊ.. पण इतके वर्ष समोर असणारी वेळोवेळी पाठीशी उभी राहणारी कधी हक्काने मदत मागणारी व्यक्ती यापुढे कधीच दिसणार नाही .ती आपल्यासमोर अनंतात विलीन होतेय हे पाहूनच डोळे भरून आले रे .पण मला हे अश्रू माणूस असल्याची आठवण करून देतात . दिवसभर गुरासारखे राबताना मन अजून मेले नाही आपले ,याची खात्री हे अश्रू करून देतात यातच आनंद मानू".मी हसून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सोसायटीत शिरलो .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment