Tuesday, November 7, 2017

मित्र

"भाऊ ..... !! सध्या तुमची मैत्रीण चर्चेत आहे आपल्या विभागात".चहाचा ग्लास माझ्या हातात देऊन बंड्या मिस्कीलपणे उद्गारला आणि मी भुवया उंचावल्या.
"कोण...? मी उत्सुकतेने विचारले.
"विभावरी ...." बंड्याने उत्तर दिले. ",हल्ली सारखी एकाशी गप्पा मारताना दिसते.तिची समाजसेवा ,लिखाण  थंड पडले का" ??
विभावरी उर्फ विभा आमची जुनी मैत्रीण . ती उच्चशिक्षित ,चांगले लिहिणारी शिवाय समाजसेवेची आवड असणारी तर विनीत तिचा नवरा. हाही मोठ्या कंपनीत उच्चपदावर होता . घरात सर्व सुखसोयी होत्या . माझे त्यांचे घरी येणे जाणे होते तर तेही कधी  आमच्याकडे यायचे.ती स्वभावाने मोकळीच होती.
पण बंड्याचे हे बोलणे ऐकून मला राहवेना . तिच्याबद्दल कोणी असे बोलावे हे  मला पटत नव्हते.
मी संध्याकाळी तिच्या घरी गेलो तेव्हा ती बाहेर जाण्याच्या तयारीत होती .मला पाहताच तिला आनंद झाला .ताबडतोब तिने कोणालातरी फोन करून आजची अपॉइंटमेंट रद्द झाल्याचे कळविले.
मी म्हणालो", अग....तू जा तुझ्या कामाला .मी नंतर येतो .
तशी ती म्हणाली", गप रे ....किती दिवसांनी आलायस . तुझ्यापुढे ते काम महत्वाचे नाही."असे बोलून बसली . हळू हळू आमच्या गप्पा रंगू लागल्या . तिच्या बोलण्यातून कुठेही जाणवले नाही की काही वेगळे घडतेय आयुष्यात .शेवटी न राहवून मी विषय काढलाच.
" विभा.... हल्ली काही वेगळेच ऐकू येते तुझ्याबद्दल ....जे मला आवडले नाही.तूच तुझ्या तोंडाने सांग.
तशी विभा हसली", मला वाटलेच.. तू हेच विचारायला आला असशील.एक सांग ..मी तुझ्याशी बोलते .विक्रमशी गप्पा मारते तेव्हा कोणाच्या मनात हा प्रश्न  नाही आला ..? मग आताच का ??
"तसे नाही ...पण आपल्याला ओळखतात सर्व . आपला स्वभाव माहीत आहे सर्वाना.मी बाजू मांडली .
" हो ...पण तुम्ही पुरुष आणि मी स्त्री .माझ्याबद्दल पहिले बोलतील ".तिचा आवाज थोडा चढला.
मी विचारले", मग लोक बोलतात ते खरे आहे का "??
" तुला काय वाटते ...?? तिने उलट प्रश्न केला.
" मला नाही वाटत खरे ...म्हणून तुलाच विचारायला आलो.
तशी ती हसली " तुझ्याबद्दल हीच खात्री होती .तो माझा एक नवीन मित्र आहे . हो थोडी जास्त बोलते मी त्याच्याशी. कारण त्याचे आणि माझे काही विचार जुळतात .खरे तर तुला माहितीय मला कशाचीच कमी नाही .विनीत परिपूर्ण नवरा आहे .तो सर्व बाबतीत मला सुख देतो . शारीरिक ,आर्थिक सगळे . आमचे सेक्सलाईफ ही छान आहे . एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करीत नाही .पण हल्ली खूप बिझी झालो आम्ही . मला लिखाणाची आवड ,तशीच थोडीफार समाजसेवाही करते मी आणि त्याला या गोष्टीची अजिबात आवड नाही . त्याला शेयर बाजार ,गुंतवणूक यात इंटरेस्ट तर मला त्या गोष्टींचा तिटकारा . त्यामुळे या गोष्टी कुठे बोलणार .काही गोष्टी मैत्रिणीला सांगायला गेले तर त्या गोष्टींचा फायदा उचलतील ही भीती . एकदा एका मीटिंगमध्ये हा भेटला . त्याचा चेहरा खास नसला तरी बोलणे छान होते .  मुद्देसूद बोलणे हा त्याचा प्रमुख गुण होता . वाचनाची आवड आणि समाजाबद्दल कळकळ आवडली मला . मी त्याच्याशी या मुद्द्यावर बोलू लागले आणि त्याची याविषयी असणारी माहिती पाहून चक्रावून गेले . मग त्याच्याशी बोलणे आवडू लागले मला.खूप काही होते माझ्या मनात आणि तो सर्व ऐकून घ्यायला तयार होत . म्हणून आमचे ट्युनिंग जुळले".
" बरे मग पुढे काय "..? मी विचारले .
"काही नाही ..असेच चालेल .त्याला अजून काही अपेक्षा असतील माझ्याबद्दल तर त्याणे विसरून जावे" . असे बोलून ती हसू लागली.
मी म्हटले ",जरा जपून हो ....
"अरे कसले काय भाऊ..? ज्या गोष्टी मला माझ्या कुटुंबाकडून मिळतात त्या गोष्टीसाठी मी दुसरीकडे का जाऊ . तू काळजी करू नकोस . तो फक्त माझा मित्र आहे . आताही त्यालाच भेटायला चालले होते पण तू आलास म्हणून कॅन्सल केले . शेवटी तुझी माझी दोस्ती फार जुनी.आता आला आहेस तर मस्तपैकी जेऊनच जा ",असे बोलून ती गोड हसली.
ते हास्य पाहून माझ्या मनातली भीती कुठच्याकुठे पळून गेली .
© श्री . किरण बोरकर

No comments:

Post a Comment