Sunday, July 2, 2017

सहवास

घड्याळात पहाटे पाचचा गजर होताच शिल्पा खडबडून जागी झाली .नंतरच्या तिच्या हालचाली सवयीनुसार घडत गेल्या.स्वतःचे आटपून ती सासूबाईंच्या खोलीत शिरली आणि रिकामे अंथरूण पाहून थरारली . कालच तर त्या गेल्या .सगळे आटपेपर्यंत रात्रीचे बारा वाजले मग ती झोपून गेली आणि सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली.
गेली तीन वर्षे सासूबाई अंथरुणावरच खिळून होत्या.त्यांच्ये सगळे करताकरता ती सवयच अंगात भिनून गेली होती.आता त्या नाहीत. त्यांची रिकामी जागा पाहूनच एक मोठी पोकळी तिला जाणवली.आता काय करायचे ??? खरेच आपण सुटलो का?? कुठेतरी एक मनाचा कोपरा हलल्यासारखा झाले.मान्य!!...की त्यांचा काही उपयोग नव्हता तिला.पण त्यांचे अस्तित्व तिला घरभर जाणवायचे.सकाळी सहा वाजल्यापासून तिची तयारी सुरू व्हायची . तिला पुसून काढा . डायपर बदला .कपडे बदला.मग चहा नाश्ता ,औषध त्या नंतर पेपरमधील ठळक घडामोडी वाचून दाखवा.मग घरातील इतर कामे.परत तिला वेगळे जेवण .ह्या धावपळीत दिवस कसा संपायचा  ते कळतच नव्हते .गेल्या तीन वर्षात सासू आणि ती जणू एकरूप झाल्या होत्या.बरे इतके करूनही म्हातारीचा मूळ स्वभाव बदलत नव्हताच .अंग हलत नव्हते पण तोंडाचा पट्टा चालूच होता.अजूनही तिला भवाने म्हणून जोरात हाक मारायची ताकद होती .डोळ्यातली जरब अजूनही कमी झाली नव्हती .रागाच्या भरात फेकून मारलेल्या तांब्याची खूण अजूनही शिल्पा आपल्या कपाळावर मिरवत होती .त्यावेळी ती नेहमी स्वप्न बघायची की एक दिवस तरी आपल्या तालावर नाचवेन मी .आणि आज गेली तीन वर्षे ती शिल्पावर अवलंबून होती. तरीही शिल्पाच्या मनात हे विचार येत नव्हते .
अर्धांगवायूचा पहिल्या झटक्यातच ती अंथरुणावर खिळली. सर्वाना वाटले आता शिल्पा वचपा काढणार.काही काळ शिल्पा ही खुश झाली पण तिच्या चेहऱ्यावरील हतबलता आणि डोळ्यातील असहाय भाव पाहून ती भानावर आली .
सुरवातीला खूप त्रास व्हायचा तिला .अंथरुणात खिळूनही सासूने तिला सहजासहजी सोडले नाही .हिलाही त्रास झालाच... सगळेच विधी अंथरुणावर ,नवरा तर फिरकायचा नाही ,मुले चेहरा वाकडा करून बाहेर पळायची .मग तिचे करता करता हिचे तोंड सुटायचे .एकदा तर बोलून गेली, पटकन देवा घेऊन जा हिला ,नाहीतर मला तरी. ....सोडव मला यातून.पण त्याचवेळी तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून ती मनोमन कळवळली .दोघींच्याही नजरेतल्या भावाने त्यांचे सासू सुनेचे नाते संपून गेले .आणि सुनेची आई आणि सासूचे मूल असे नाते तयार झाले .त्या एका क्षणाने शिल्पाने आई बनून अंथरुणावर खिळलेल्या सासूला जवळ घेतले .दोघीना स्पर्शाची भाषा आपोआप कळली .मग दोघीही एकमेकांना साथ देऊ लागल्या .एक वेगळीच अनुभुती शिल्पा अनुभवत होती .
आणि अचानक काल तो क्षण आला . नंतर मात्र सर्व काही घाईघाईत झाले .कधी एकदा हिला बाहेर काढून मोकळे होतो असे सर्वाना झाले .या घाईत शिल्पाला कोणीच विचारले नाही .सर्वांच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव .
आता तिच्या रिकाम्या अंथरूणाकडे बघून हे सर्व शिल्पाला आठवले .आता पुढे काय ...?? आयुष्य जणू रिकामेच झाल्यासारखे वाटत होते .जरी त्या अंथरुणात होत्या तरी एक आधार होता तिचा . दुपारी तिला जेवण भरवून झाले की छान गप्पा मारायच्या दोघी .मनातील सर्व गोष्टी शेअर व्हायच्य.सासूचे उपदेशाचे बोल तिला हवेहवेसे वाटायचे .कधी कधी सासू ही अल्लड तरुणीसारखी आपल्या तरुणपणीच्या गोष्टी सांगायची .हे सर्व तिला आठवले आणि खऱ्या अर्थाने तिला आयुष्यातील रिकमेपणा जाणवला .त्या रिकाम्या झालेल्या अंथरुणावर झोकून देऊन रडू लागली .

(C) श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment