Tuesday, July 25, 2017

तरुण आजोबा

त्या पंच्याहत्तर वर्षाच्या तरुण आजोबांनी मला समोर पाहताच जोरदार मिठी मारली .त्या स्पर्शातच जुनी आपुलकीची भावना जाणवली .बऱ्याच दिवसांनी गार्डनमध्ये गेलो होतो तेव्हा नेहमीच्या जागी त्यांची गाठ पडली .अजूनही त्यांचा स्वभाव बदलला नव्हता .
"कसा आहेस ?? आज बऱ्याच वर्षांनी भेटतोस".त्यांनी आपुलकीने सर्वांची चौकशी केली .मीही हसून उत्तरे देत होतो.
आम्ही गार्डनमध्ये अभ्यास करीत असताना आमच्यात येऊन बसायचे . काही हवे नको ते पहायचे जणू आमच्या सेवेसाठी सिद्धिविनायकाने त्यांना नेमले होते असे सर्व विनोदाने म्हणायचे .अजूनही त्यांचे तेच कार्य चालू होते फक्त मुले बदलत होती .
"म्हातारी कशी आहे ? मी नेहमीच्या पद्धतीने विचारले.
"अरे गेली ती .तीन वर्षे झाली.बरे झाले .खूप भांडणे व्हायची आमच्यात .खूप बडबडायची मला .खूप त्रास व्हायचा .मग मी इथे येऊन बसायचो .ती गेली तेव्हा फारसे दुःख नाही झाले .आता कळते की एकमेकांपासुनचा दुरावा सहन करण्यासाठीच ती भांडत होती .उत्तरार्धात जोडीदाराने  साथ सोडून जाणे यासारखे दुःख नाही आणि ते दुःख सहन करण्याची ताकद यावी म्हणून ती भांडत असेल असा मी ग्रह करून घेतो ".ते हसत म्हणाले पण डोळ्यातील वेदना लपवू शकले नाहीत .
"मग आता काय चालू आहे ?? मी विषय बदलला.
" अरे नेहमीचेच ...इथे येऊन या मुलांच्यात बसायचे .त्यांना हवे नको ते पहायचे .मध्येच त्यांच्या चर्चेत भाग घेऊन नवीन काहीतरी कळते ते ऐकून घ्यायचे." ते हसत म्हणाले.
"म्हणजे थोडक्यात आम्ही जे तुमच्यासोबत करत होतो तेच चालू आहे ". मी हसून म्हटले .
"हो !! तसेच समज. पण ही पोर तुमच्यापेक्षाही हुशार आहेत .मी त्यांच्याकडून नवीन नवीन गोष्टी  शिकतो आणि त्यांना माझ्या काळातले शिकवतो .आता बघ ना ते मला अर्जितसिंगची गाणी ऐकवतात तर मी त्यांना हेमांतकुमार ,शमशाद बेगम ऐकवतो .ते माझ्याशी आताच्या राजकारणावर चर्चा करतात मी त्यांना दुसरे महायुद्ध ,1965,1971 चे युद्ध सांगतो .मी त्यांना काही शिकवायला जात नाही तर त्यांच्यातला होऊन त्यांना चूक काय आणि बरोबर काय याची चर्चा करतो .पण एक सांगतो ,घरी माझे ऐकायला माझ्याशी बोलायला कोणाला वेळ नाही पण इथली मुले अभ्यासाचा कंटाळा आला की माझ्याशी गप्पा मारायला येतात .माझ्यासाठी खाण्याचा एक हिस्सा काढून ठेवतात .तर कधी कधी मला टार्गेट बनवून खूप खेचतात .खरेच माझ्या आयुष्याचा पूर्वार्ध खूपच त्रासाचा गेला पण उत्तरार्ध मात्र मजेत चाललाय".असे बोलुन त्यांनी माझा हात हाती घेतला .मीही हसून त्यांना साथ दिली.
@किरण बोरकर

No comments:

Post a Comment