Sunday, July 30, 2017

बालवाडी

रडणाऱ्या अथर्वला चुकचुकारत शाळेत घेऊन जाणाऱ्या आशुतोषला पाहून मला हसू आले . नेमके त्यानेही माझ्याकडे पाहिले आणि काय करणार या अर्थाने हात हलविले.
"अजून रडतोच का शाळेत जाताना "?? मी जवळ जाऊन विचारले.
"हो किती समजावतो तरी रोज रडतो.पण शाळेत गेला की गप्प बसतो".आशुतोष हसत म्हणाला.
अथर्व बालवर्गात होता .रोज शाळेत जाताना रडायचा आणि आशुतोष त्याला समजावत घेऊन जायचा.
"भाऊ चला येता का शाळेत ?? थोडा वेळ थांबू आणि येऊ परत".आशूने सहज विचारले.
तशी माझी नाईट ड्युटी होती त्यामुळे मी फ्री होतोच.चल असे म्हणून अथर्वला उचलून घेतले आणि सहज त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.त्याबरोबर तो शांत झाला .आम्ही त्याला शाळेत सोडले .शाळेत शिरताच अथर्व  मित्रांना पाहून खुलला.
आम्ही परत फिरलो पण थोडे अंतर जाताच मी आशूला म्हटले ",चल जाऊन बघू मुले काय करतायत"??
आशूला आश्चर्य वाटले आम्ही अथर्वच्या वर्गाच्या खिडकीतून आत पाहिले.आतमध्ये सर्व मुले छान रमली होती .कोणी एकमेकांना खाऊ देत होते तर कोणी खेळत होते .सर्वांच्या चेहऱ्यावर निरागस भाव ,कसलीही चिंता नाही .बरेच पालक मुलांना खिडकीतून पाहत होते .आशूने डोळे भरून आले.मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले",अण्णाही असेच पहायचे तुला खिडकीतून आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आज तुझ्या चेहऱ्यावर बघतोय मी".डोळे पुसत आशु माझ्याबरोबर बाजूच्या हॉटेलमध्ये शिरला.
"किती गोड मुले आहेत .किती सुंदर आहे त्यांचे विश्व .मी खूप मोठा बनवणार अथर्वला . त्यासाठी वाटेल ते करेन.आता जे काही करणार ते मुलासाठीच." भावनाविवश होऊन आशु म्हणाला.
"खरे आहे तुझे.पण ही आजची निरागस मुले मोठी होतील तेव्हा त्यांना याच आईवडिलांची अडचण होईल .त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल.मग ते तुम्हाला वृद्धाश्रमात टाकतील किंवा दुसरे घर देऊन तुमच्यासाठी चोवीस तास नोकर ठेवतील".माझे हे बोलणे ऐकून आशु हादरला.
"असे का बोलता भाऊ ?? ही मुले अशी कशी वागू शकतात??.आज त्यांच्याकडे बघून कल्पना ही करवत नाही ते असे वागतील".दुखावलेल्या स्वरात आशु म्हणाला.
"जर तुम्ही तुमच्या आईवडीलांशी त्यांच्या समोर नीट वागला नाहीत तर तेही तुमच्याशी तसेच वागणार .लक्षात ठेव आशु .मुले आपल्या आई वडिलांना आदर्श मानत असतात .त्यांच्यासाठी ते सुपरहिरो असतात .त्यामुळे ते जे करतायत ते योग्यच असा त्यांचा विश्वास असतो .आपण जर आपल्या आईवडीलशी योग्य रीतीने वागलो नाही तर उद्या आपली मुले ही आपल्याशी तशीच वागणार. कारण त्यांना तेच योग्य वाटत असते .म्हणून हीच वेळ आहे मुलांना घडविण्याची त्यांच्यात चांगुलपणा निर्माण करायची .बघितलेस ना कसा एकमेकांना खाऊ देतायत ती.नक्कीच त्यांना कोणीतरी हे शिकवले असणारच .तेव्हा तुही अथर्वला पहिला माणूस बनव मग व्यक्तिमत्व घडव".
"खरे आहे भाऊ त्याला डॉक्टर ,इंजिनियर बनवायचा विचार करण्यापेक्षा एक माणूस बनविणे आवडेल मला"आशुतोष मनापासून म्हणाला .हॉटेलचे बिल भरून मी समाधानाने बाहेर पडलो.
@ श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment