Sunday, July 23, 2017

डिप्रेशन

"डिप्रेशन म्हणजे काय"??? तोंडात शेंगदाणे टाकत अजयने विचारले तसा विक्रम वैतागला.
"गप्प पी ना?कशाला नको ते विषय काढतो.गटारीची वाट लावू नको".असे म्हणत मोठा घोट घेतला.
अजयने माझ्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिले तर मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो.अजयने काही न बोलता परत शेंगदाणे तोंडात टाकले .आज गटारी साजरी करायला आम्ही एकत्र आलो होतो .अजय ही आमच्यात येऊन बसला होता.
"माझी एक मैत्रीण सांगत होती तिला डिप्रेशन आलय",.तसा विक्रम सावरून बसला .मीही ताबडतोब नजर वळवून अजयकडे पाहिले.
"कोण रे कोण ?? काय झाले तिला ?? मदत हवीय का"?? ताबडतोब विक्रमचा मारा सुरू झाला. ते पाहून नेहमीप्रमाणे मी माघार घेतली.
"अरे आहे एक, हल्ली खूप एकटे एकटे वाटते तिला.नकारात्मक विचार येतात मनात .आयुष्यात काय घडणार आपल्या याची चिंता.त्या दिवशी मला फोन करून म्हणते खूप अस्वस्थ आहे मी .डिप्रेशन आलंय .च्यायला मला काही कळले नाही म्हणून तुम्हाला विचारतोय"
"अरे असे होय !!..असे बोलून विक्रमने परत ऑर्डर रिपीट केली .
"झाले ......!!आता हा सुरू होणार" मी मनातच बोललो आणि अजयला मनोमन शिव्या दिल्या.
"अरे तिला सांग ना मला भेटायला.मी बोलेन तिच्याशी",.विक्रमचा आवाजही बदलला.
"तुला माहितीय का डिप्रेशन म्हणजे काय ?? तुला आयुष्यात कधीच येणार नाही ते . उगाच त्या बाईला अजून डिप्रेशन मध्ये घालवू नकोस".अजय हसून म्हणाला.मीही जोरात हसून त्याला साथ दिली.
"ओके मग तुम्ही सांगा"?? विक्रमही चिडला.
"अरे मला काय माहित.तेव्हडा विचार करायला वेळ तरी आहे का ??सकाळी साडेपाचला दिवस चालू होतो माझा .पहिली माझी तयारी ,मग निहारची तयारी .मग दोघेही बाहेर पडतो.निहार कॉलेजला जातो तरीही अर्ध्यावाटेपर्यंत मी बरोबर हवा असतो त्याला .त्याच्याबरोबर गप्पा मारता मारता रस्ता कसा पार होतो ते कळत नाही .त्या नंतर ऑफिसची कामे . साला वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही . येताना ट्रेनच्या गर्दीत स्वतःला ऍडजस्ट करता करता स्टेशन येते .घरी आल्यावर चहा पाणी करण्यात वेळ जातो .मग बायकोशी गप्पा ,टीव्ही पाहणे ,निहारचे प्रॉब्लेम सोडविणे यातच दिवस निघून जातो .तसे  आर्थिक अडचण असतेच म्हणा तोच काय प्रॉब्लेम .पण त्यावरही विचार करता करता वेळ निघून जातो".अजय ने आपली बाजू क्लिअर केलीआणि माझ्याकडे पाहिले.
मी हसलो ",आपला प्रत्येक दिवस लढण्यातच जातो तर मनात दुसरा विचार येईल कसा .सकाळी उठतो तेव्हाच रात्रीपर्यंतच्या कामाचे प्लॅनिंग डोक्यात तयार असते.त्यामुळे डोके रिकामे नसतेच .जातानाही ट्रेनमध्ये छान पुस्तक वाचत जायचे तेव्हा कुठे फ्रेश मूडमध्ये फॅक्टरीत शिरतो . एकदा कामाला सुरवात केली की दुसरा विचारच नसतो कारण आजूबाजूची मंडळी ही त्याच विचारात असतात .परत घरी येताना विंडो सीट जवळ बसून पुस्तक वाचायची हौस पूर्ण करायची .घरी आल्यावर सौ आहेचसोबतीला .काहींना काही कामे काढतेच ती .आणि भविष्याचा विचार करायचा किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तिच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतो त्यामुळे मानसिक आधार आणि पाठिंबा असतोच .माझेही मन कुठे रिकामे असते ",असे बोलून मी ग्लास रिकामा केला .
"च्यायला मी तर कधीच कोणताच विचार केला नाही. ना आजचा ना उद्याचा .पहिल्यापासून माझे छानच चालू आहे . मनासारखे शिक्षण ,मनासारखी नोकरी आणि मनासारखा संसार त्यामुळे कसलेच टेन्शन नाहीय मला . जे प्रॉब्लेम पैश्यानी सुटत नाही ते तुमच्याशी चर्चा करून सुटतात याचा अनुभव आहे मला.मुलंही हुशार निघाली त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर लक्ष देण्याची वेळ आली नाही .बाप सर्व काही देईल पण चुकीला फटकावेल हे माहीत आहे त्यांना .मला काम असले की ते संपेपर्यंत कुठेच लक्ष देत नाही.घरी असलो की नातेवाईकांकडे जा. नाटक सिनेमाला जा .पाहिजे ते खा. हे कुटुंबाबरोबर चालूच असते .मला गप्प बसणेआवडत नाही .बायकोशी भांडण जरी  झाले तरी मी मित्रांना सांगतो .च्यायला मनात काही राहतच नाही आपल्या .काय भाऊ ?? खरे ना ??विक्रम माझ्याकडे पाहत म्हणाला. मी हसून मान डोलावली.
" थोडक्यात डिप्रेशन म्हणजे काय?? हे आपल्याला माहीत नाही आणि त्यावर विचार करायलाही आपल्याला वेळ नाही ",असे बोलून मोठ्याने हसत अजयने आम्हाला टाळी दिली .मीही वेटरला बिल बनवण्याची खूण केली.
@ किरण बोरकर

No comments:

Post a Comment