Thursday, July 27, 2017

पाऊस आणि रक्षाबंधन

आज काही पाऊस थांबण्याचे नावही घेत नव्हता .रात्रीपासून धो धो कोसळत होता . तिची नेहमीप्रमाणे ऑफीसची तयारी चालू होती .स्वतःची तयारी करता करता सोनूलीचीही शाळेची तयारी चालू होती.
"आई.. किती जोरात पाऊस आहे .संध्याकाळी लवकर ये" .तिने ऑर्डर सोडली.
"नाही बाळा आज रक्षाबंधन आहे ना!!मामाकडे जायला हवे.त्याला राखी नको का बांधायला"तिने समजावले.
"पण मामा तर कधीच आपल्याकडे येत नाही आणि तू तर फक्त रक्षाबंधनला जातेस.मी तर कधीच पाहिले नाही त्याला".सोनूली थोड्या रागानेच म्हणाली.
ती गंभीर झाली. काय उत्तर द्यावे कळले नाही .तरीही थोड्या वेळाने बोलली", येईल ग तो.त्याला जमेल तेव्हा नक्की येईल".
पण तो येणार नाही हे तिला पक्के माहीत होते .पण ही मात्र न चुकता रक्षाबंधनला  त्याच्याकडे जात होती.दरवर्षी जुलै महिन्यात जोरात पाऊस पडला की तिला त्याची आठवण यायची आणि तिचा थरकाप उडायचा.
त्यावेळी दुपारी जोरात पाऊस सुरू झाला .ही सात महिन्याची गरोदर .दोन दिवसांनी सुट्टीवर जाणार होती .ऑफिसने सर्वाना घरी जाण्याची परवानगी दिली .सर्वांसोबत ही पण बाहेर पडली.ट्रेन,बसेस बंद म्हणून पायीच निघाली .मिस्टरही फॅक्टरीत अडकून पडलेले .जिथे पाणी नाही असे रस्ते गल्ल्या शोधता शोधता कधी इतरांपासून वेगळी पडली ते तिलाच कळले नाही .वाढलेल्या पोटामुळे तिच्या हालचाली हळू होत होत्या.अजून एक शॉर्टकट मिळेल म्हणून ती एका गुढगाभार पाणी असलेल्या गल्लीत शिरली .पण आत शिरताच तिच्या लक्षात आले पाण्याची पातळी वाढते आहे .पाणी गुढग्याच्या वर शिरताच तिला भीतीने कापरे भरले .आजूबाजूला मदतीसाठी कोणीच नव्हते . तिच्या तोंडातून भीतीने किंकाळी कधी बाहेर पडली ते तिला कळलेच नाही.इतक्यात कुठूनतरी तो धावून आला.स्वतःची पर्वा न करता पाण्यात उतरला आणि तिचा हात पकडला.
"घाबरू नका ताई ,काही होणार नाही .मी आह".असे बोलून आश्वासक हसला. त्याच्या स्पर्शात एक आधार आणि आपलेपणा होता .हळू हळू तो तिला बाहेर घेऊन आला .ती भीतीने थरथर कापत होती . भानावर येऊन तिने त्याच्याकडे पाहिले .तो 25/26 वर्षाचा उमदा तरुण होता . हसतमुख आणि प्रसन्न चेहरा "बरे वाटते ना ताई ?? त्याने हळुवारपणे विचारले."पूर्ण भिजला आहात तुम्ही .माझ्या घरी बसा थोडावेळ मग निघा". तिची अवघडलेली स्थिती पाहून त्याने सांगितले.
काही न बोलता ती त्याच्या मागून निघाली .कोण??कुठला??कुठे राहतो?? याची चौकशी न करता ती त्याच्या मागून निघाली .एक विश्वास त्याच्या हलचालीतून जाणवत होता.त्याच्या घरात शिरताच ती अवघडून गेली.एक छोटीशी खोली त्यात कोपऱ्यात बसलेली ती वृद्ध बाई .बहुतेक त्याची आई असणार .टीव्ही समोर बसलेली तरुणी त्याची बहीण असणार .ती आत शिरताच दोघींच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले .तेव्हा त्याने दोघींना सर्व कल्पना दिली .ते ऐकून त्यांचा चेहरा खुलला.आईने स्वतःकडची  साडी नेसायला दिली तर बहिणीने गरम चहा आणि बिस्किट्स समोर ठेवली .आणि मग तिघीही छान गप्पा मारीत बसल्या.
थोड्यावेळाने तो आत आला आणि म्हणाला "ताई तुम्हाला घरी सोडायची सोय केली आहे निघुया"? 
सर्वांचा निरोप घेऊन ती डोळे पुशीत बाहेर पडली .तो अर्ध्या रस्त्यात तिच्या बरोबर आला आणि एक ग्रुपमध्ये तिला सोडले .त्या ग्रुपने मग सर्वाना सुखरूप घरापर्यंत सोडले .घरात शिरताच अति थकाव्याने सरळ झोपून गेली .दुसऱ्यादिवशी माहेरी निघून गेली.तेव्हापासून दर रक्षाबंधनला ती त्याच्या घरी जात होती.सोनूलीच्या हाकेने ती भानावर आली आणि तिचा पापा घेऊन ऑफिसला गेली .
संध्याकाळी राखी घेऊनच ती त्याच्या घरी गेली .दार घडून आईने हसतमुखाने तिचे स्वागत केले.
"दरवर्षी न चुकता येतेस.नाहीतर याची सख्खी बहीण बघ.परदेशात गेली आणि  तिथलीच झाली .आता फक्त पोस्टाने राखी पाठवते."
ती हसून आत गेली आरतीचे तबक सवयीने तयार केले आणि पर्समधून राखी आणि ताज्या फुलांचा हार काढुन त्याच्या फोटोसमोर उभी राहिली .फोटोमधील हसरा चेहरा पाहून तिला डोळ्यातून अश्रू टपकले.तिला त्या ग्रुपमध्ये सोडून गेल्यावर तो इतरांना मदत करायला गेला आणि एका बेसावध क्षणी स्वतः वाहून गेला .त्यादिवशी ती घरी पोचली पण तो काही जिवंत पोचला नाही. न जाणे किती जणांचे प्राण वाचवले असतील त्याने.पण स्वतःला वाचवू शकला नाही .तिने त्याच्या फोटोला नवीन हार घातला ,राखी जवळ ठेवली ओवाळणी करून निघाली ती परत पुढच्यावर्षी येण्यासाठी .

@किरण बोरकर

No comments:

Post a Comment