Thursday, July 13, 2017

बजेट

चपलेचा अंगठा तुटताच अजयने खच्चून शिवी दिली .एका क्षणात त्याला बँकेतील बॅलन्स ,खिशातील पैसे ,घरातील कपाटातील पैसे डोळ्यासमोर आले.
"च्यायला!!...या महिन्याच्या बजेटमध्येही नवीन चपला बसत नाहीत". हेच वाक्य तो चार महिन्यांपूर्वी दुसऱ्या पायातील चपलेचा अंगठा तुटला तेव्हाही बोलला होता.त्या पाच रुपयाचे फेव्हीक्विक फक्त स्वतःसाठी निर्माण केले आहे असेच त्याला वाटत होते.
"हा पण तुटला का"?? निहार हसत म्हणाला."आतातरी नवीन घ्या पपा.किती दिवस ती वापरणार??कंपनीवाल्यानीही हे प्रॉडक्ट बंद केले असेल . तुमच्याकडे आहे असे कळले तर सत्कार करतील तुमचा".
"राहू दे रे .कोण बघतेय मला आणि पावसाळा संपला की तुला नवीन शूज घ्यायचे आहेत तेव्हा घेईन मी . त्यामहिन्याच्या बजेटमध्ये बसवू" असे बोलुन अजय हसला.
"ओके!! तुम्ही ऐकणार नाहीत .चला मला प्रोजेक्टसाठी सामान घेऊन द्या . तुमच्या महिन्याच्या शैक्षणिक बजेटमधले पैसे काढा."निहारने ऑर्डर सोडली.
"हो !! हो ! ते घेऊ चल काय पाहिजे ते घे त्यात हयगय नको."
थोड्यावेळाने दोघेही सामान घेऊन घरी निघाले .रस्त्यात विक्रम समोर आला."अज्या !!!..नेहमीप्रमाणे जोरात आरोळी ठोकत त्याने मिठीच मारली आणि निहारला टपल्या.
"बरे सापडलास ,चल बसूया."ते ऐकून अजयने चेहरा वाकडा केला ",नाही जमणार रे..बजेट कोसळलय .ही बघ चप्पल तुटलीय त्याला पैसे नाहीत "चेहरा पडून अजय बोलला.
"हॅट...!! च्यायला ,नेहमी रड तू "विक्रम हसून म्हणाला ..
"बाबारे.जा तू "असे बोलून अय ने हाथ जोडले .
पुढे आल्यावर निहार हळूच म्हणाला", जायचे ना पप्पा तेव्हढाच विरंगुळा.नाहीतरी कुठे जातच नाही हल्ली .
"अरे नको रे .या महिन्यात सोनाली आतेच्या नातीचे बारसे आहे. तिलाही काहीतरी द्यायला पाहिजे ना ?? हे असे अनपेक्षित येते त्यासाठीही आपत्कालीन बजेट ठेवावे लागते .
ते घरी आले तेव्हा जया जणू त्याची वाट बघत असल्यासारखीच बसली होती . "आहो उद्या  बाबू सवंतांच्या मुलीचे लग्न आहे काहीतरी आहेर द्यायला पाहिजे" तिनेऑर्डर सोडली
"अरे त्याच्या मुलीच्या लग्नाला तर विरोध होता ना बाबुचा??मग हे अचानक कसे ???? त्याने आश्चर्याने विचारले .
"तिने पळून जाऊन लग्न केलेय.मग ह्यांना आता स्वीकारावेच लागेल . उद्या हजार रुपये तरी द्या आहेर आणि इतर गोष्टींना"असे बोलून ती आत गेली.
अजय निहारकडे बघून ओशाळवाने हसला .निहारने काही न बोलता मान डोलावली .बाहेर जाऊन त्याने पप्पांची चप्पल आत आणली . प्रोजेक्टच्या सामानातून पाच रुपयाचे फेव्हीक्विक काढून चप्पल चिकटवून अजयच्या हाती दिली.
"अरे!!. हे तू इथे का वापरले आता तुला काय आहे ?? अजय चिडून बोलला.
"हे तुमच्यासाठीच घेतले पप्पा.शैक्षणिक बजेटमध्ये तुम्ही कधीच कपात करीत नाही म्हणून त्यातून मी हे घेतले" आणि बॅगेमधून  हजार रुपये काढून अजयच्या हाती दिले", हे घ्या सोनाली आतेच्या नातीसाठी आपल्याकडून गिफ्ट .मे महिन्यात मी एका चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेतला होता त्याचे तिसरे बक्षीस मला मिळाले .तुम्हाला सांगणार नव्हतो पण तुमचे बजेट कसे कोसळते हे आज मी बघितले .आणि आतेची नात म्हणजे माझी भाचीच की .तिच्यासाठी मलाही काहीतरी करू दे की."
डोळ्यातील पाणी थोपवत अजय एक हातात चप्पल आणि दुसऱ्या हातातील हजार रुपायांकडे पाहत बसला .

@ किरण बोरकर

No comments:

Post a Comment