Thursday, July 20, 2017

देऊळ

खरे तर रोजचे टपाल बघण्याचा अमितकुमारला कंटाळाच होता.पूर्वी ठीक होते,तो नवोदित कलाकार होता त्यावेळी प्रत्येक पत्र महत्वाचे वाटत होते.पण आज तो मोठा सुपरस्टार होता वर्षातून किमान दोन तरी चित्रपट सुपरहिट होत होते.
पण आजच्या टपालात होती एक निमंत्रण पत्रिका.त्याच्या बालपणीच्या मित्राने गावातून पाठवली होती .गावातील देवळातील उत्सवाचे . पर्यटन मंत्री ही येणार होते .
ते पाहून अमितकुमार जुन्या आठवणीत गेला .साधारण बारा वर्षांपूर्वी अमित एक नवोदित अभिनेता होता . एके दिवशी रात्री शूटिंगवरून परत येताना घाटात गाडी बंद पडली.आजच त्याला सर्वोत्तम अभिनेत्याचे पारितोषिक मिळाल्याची बातमी फोन करून निर्मात्याने सांगितली होती.दोन दिवसात अधिकृतरित्या जाहीर होईल असे म्हणाला आणि त्याच आनंदात तो घरी निघाला होता.पण गाडीने दगा दिला . इतक्यातसमोरून एक माणूस सायकलवरून येताना दिसला . जवळ आल्यावर त्याचा चेहरा पाहून अमित आनंदाने ओरडला "अरे सदा तू" ?? समोरच्यानेही ताबडतोब मिठी मारली .गाडीचे कळताच सदानंद उर्फ सदा त्याला आपल्या घरी घेऊन गेला . घाटाच्या रस्त्यापासून दोन किलोमीटर वर त्याचे गाव . मोजून शंभर वस्तीचे . सदाला पूर्वीपासून अध्यात्माची आवड त्यामुळे तो इथेच स्थायिक होता. रात्रभर मुक्काम केल्यावर अमित सकाळी निघाला. जाता जाता सदाने त्याला गावाच्या मंदिरात येण्याची विनंती केली .सदाच्याविनंतीला मान देऊन अमित देवळात आला .आठवण म्हणून सदाने त्याच्याबरोबर फोटो काढले .नंतर ही गोष्ट तो विसरूनही गेला.
काही महिन्यांनी त्याची मैत्रीण आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री माया मोठ्या आजारातून बरी झाली आणि तिला काही दिवस शांत ठिकाणी विश्रांतीसाठी जायचे होते . अमितने तिला सदाच्या गावी जाण्यास सुचविले . तिथे तिला त्रास देणारे कोणी नव्हते आणि ओळखणारे ही . तिलाही ते गाव आवडले . रोज सकाळी देवळात जाणे ,नदीकिनारी बसणे तिला आवडायचे .आठ दिवस गावात राहून ती घरी परतली .त्यानंतर अमित मोठा सुपरस्टार झाला त्याचे नाव ही अमितकुमार झाले .
काही वर्षांपूर्वी त्याच्या ओळखीने एक चित्रपटाचे शूटिंगही तेथे झाले .आज ते देवूळ इतके फेमस कसे झाले याची अमितकुमारला उत्सुकता होती .ठरल्या वेळी अमितकुमार तिथे गेला त्याला पाहताच सदाने कडकडून मिठी मारली .मंदिरात खूप गर्दी होती काही ठिकाणी त्याचे आणि मायाचे मंदिरातील फोटो बॅनर वर झळकत होते
"सदा खूप मोठे आणि प्रसिद्ध झाले मंदिर .कसे काय घडले हे "??? अमितकुमारने विचारले .
"अरे या मागे तूच आहेस."सदा हसत म्हणाला आणि अमितकुमार ला धक्का बसला."अरे काही वर्षांपूर्वी तू या मंदिराला भेट दिलीस आणि नंतर तुला अवॉर्ड मिळाले.मी त्याची इथे जाहिरात केली .तुझे फोटो लावले सगळीकडे .त्यानंतर माया मॅडम आली तिचा आजार बरा झाला हे सांगत मी तिचेही फोटो सगळ्या गावात प्रसिद्ध केले .त्यानंतर या गावात ,देवळात चित्रपटाचे शुटिंग झाले.मी त्याचीही प्रसिद्धी केली . हळू हळू सगळीकडे या देवळाची कीर्ती पसरली .त्याचवेळी या गावातील एक कार्यकर्ते आमदार म्हणून निवडून आले .मी त्याचाही फायदा घेतला . आज ते पर्यटन मंत्री झालेत त्याचा फायदा घेऊन मी हा उत्सव आयोजित केला .आज तुमच्यामुळे हे देऊळ फार प्रसिद्ध झाले आहे . नवसाला पावणारा देव म्हणून याची ख्याती सर्व दूर पसरली आहे ".ते ऐकून मी सदाला कोपर्यापासून हात जोडून नमस्कार केला.
@किरण बोरकर

No comments:

Post a Comment