Monday, July 17, 2017

वधू पाहिजे

आज सौ.चा मूड काही चांगला दिसत नव्हता . माझ्या लक्षात येईल अशा पद्धतीने दोनवेळा भांडी पडली . सकाळी नुसता चहाच आला तेव्हा समजून जायला पाहिजे होते . पण मी लक्ष दिले नाही . शेवटी नाइलाजाने पुढ्यात येऊन उभी राहिली .
"आहो...त्या राहुलला समजवा तुमच्या भाषेत.अजून किती दिवस मुलींना नकार देत राहणार ?? लग्न करायचे की नाही त्याला" ??
राहुल म्हणजे हीचा भाचा. एका अमेरिकन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.यंदा लग्न करावे म्हणून घरचे मागे लागलेत पण हा पठ्ठा मुली बघतो त्यांना भेटतो आणि नकार देतो.
"अच्छा!! म्हणजे हे कारण तर !!" ठीक आहे बोलतो त्याच्याशी",मी सहज बोलून गेलो.
"आज संध्याकाळी बोलवले आहे त्याला घरी. बोलून घ्या.सौ ने बॉम्ब टाकला.
मी नाइलाजाने मान डोलावली. संध्याकाळी राहुल बरोबर दिलेल्यावेळी दारात उभा राहिला.वातावरण पाहूनच समजला काय विषय असेल .चहा पाणी झाल्यावर मी हळूच विषय काढला ",मग लग्नाचे काय चालू आहे ??
"करायचे ना ,मुलगी नको का ?? त्याने उलट प्रश्न केला.तसा सौ चा पारा चढला", अरे किती चांगल्या मुली सांगून आल्या पण तू प्रत्येकीला नकार देतो. सगळ्या मुली छान शिकलेल्या ,उत्तम नोकरी तुझ्या तोलामोलाच्या. पण तू सरळ  नकार देतोस .आणि नकाराचे कारण ही सांगत नाहीस .
"ह्या गोष्टीशी मी सहमत आहे राहुल . तुझी कारणे कळू दे"मी सौ ची बाजू घेताच तिचा चेहरा खुलला.राहुल हसला "भाऊ तुमचे पटते मला म्हणून मी तुम्हाला माझ्या मनातले सांगतो .आज मी एका मोठ्या कंपनीत कामाला आहे .अर्धे जग फिरून झाले आहे .80 हजार पगार आहे. शिवाय इतर सुविधा .मला इतके काम आहे की मिळालेला पैसे खर्च करायलाही मला वेळ नाही .वेळ मिळाला की कुठेतरी शांतपणे बसवेसे वाटते .गरजेच्या सर्व वस्तू माझ्याकडे आहेत . पण त्याही वापरायला मला वेळ नाही .अश्यावेळी मी अजून उत्तम नोकरी करणारी मुलगी बायको म्हणून का घरी आणू ? म्हणजे फक्त पैसे घरात येतील . तिला किंवा मला एकत्र येऊन बोलायला वेळ मिळेल का? मी घरी वेळीअवेळी येतो तेव्हा ती घरी असेल का ?? माझ्या मनात खूप काही चालू असते ,ऑफिस च्या कटकटी ,कामात येणारे प्रॉब्लेम ,शिवाय घरात काय चालू असेल?अश्या अनेक गोष्टी . या गोष्टी मला तिच्याशी शेअर करता येतील का ?? नोकरी करणारी असेल तर तिचेही माझ्यासारखे प्रॉब्लेम असणार मग आम्ही घरी भेटल्यावर ऑफिस आणि कामाच्या गोष्टीच बोलणार".
"म्हणजे तुला नोकरी करणारी नको का ? पण मुलगी शिकलेली असेल तर ती नोकरी करणारच" .मी हसून बोललो.
"तसे नाही भाऊ पण नोकरी करणारी मोठ्या पदावर असेल तर आमचे घरही ऑफिस किंवा खानावळ होणार . संध्याकाळी यायचे जेवायचे ,ऑफिस मध्ये काय घडले ते बोलायचे आणि झोपून जायचे". राहुल हसत म्हणाला.
"अरे तसे तू मुलींना सांगायचे ना . फक्त नकार का देतोस"मी थोड्या कडकपणे विचारले.
"का करणे देऊन त्यांच्या मनात न्यूनगंड तयार करू .मला त्या मुलीचे बोलणे उर्मट वाटते म्हणून मी नकार दिला तर ती मुलगी तेच मनात घेऊन बसेल.एक मुलगी मला बुटकी वाटते म्हणून नकार दिला तर ती तेच मनात ठेवून राहील .मी तर आधीच सांगतो मला ही नकाराची करणे देऊ नका . उद्या कोणी मी दारू पितो म्हणून नकार दिला तर मला आणि इतरांना वाटेल हा पक्का बेवडा आहे .नकार देण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असतात .याचा अर्थ त्याव्यक्ती लग्नाच्या लायक नसतात असे नाही".
"मग बाळा तुला मुलगी तरी कशी पाहिजे ?सौ चा उपहास आम्हाला जाणवला तसा राहुल हसला.
"आते,मला संसार करणारी मुलगी पाहिजे .मी बाहेर असताना घर सांभाळणारी .घरात येणाऱ्या पैश्याचे योग्य नियोजन करणारी .माझ्या अनुपस्थितीत योग्य निर्णय घेणारी . मी अश्या मुली पाहिल्यात की ज्यांना बँकेत जात येत नाही . आजारी पडला तर नवरा घरी आल्यावर त्याला घेऊन डॉक्टरकडे जातात.सगळीकडे नवराच पाहिजे तर त्यांची जबाबदारी काय ?? नाहीतर त्यांनी नोकरी करावी मी घरात बसून घराची जबाबदारी संभाळतो .मला पैसे देणारी मुलगी नकोय तर सर्व बाबतीत आधार देणारी मुलगी बायको म्हणून हवी आहे .भेटतो त्यामुलींच्या वेगवेगळ्या अपेक्षा पण घराबद्दल ,कुटुंबाबद्दल बोलत नाहीत .एकीने मला आश्चर्याने विचारले" कार नाही का तुझ्याकडे ?? आता सांगा घराच्या बाहेर फोन केल्यावर पाहीजेती ती कार उभी राहत असेल तर मी का घेऊ कार ?? मुंबईच्या ट्राफिकमध्ये स्वतः गाडी चालवण्यापेक्षा मागे बसून आवडते पुस्तक वाचत जाणे नेहमी चांगले नाही का ?? शिवाय पार्किंगच्या कटकटीतून सुटका .पण असा विचार कोण करीतच नाही.असे बोलून शांतपणे समोरचे बिस्कीट उचलून तोंडात टाकले .कुठेतरी मलाही त्याचे पटत होते म्हणून मी फक्त हताशपणे सौ.कडे पहात बसलो.

@ किरण बोरकर

No comments:

Post a Comment