Tuesday, July 11, 2017

गेट टूगेदर

आज सकाळी उठल्यावर तिचा मूड बघून त्याला आनंद झाला . छान गुणगुणत तिची तयारी चालली होती .काल तिच्या शाळेतील मैत्रिणींचे गेट टूगेदर होते आणि ह्याने आग्रह करून तिला पाठविले होते .तशी ती शाळेत प्रसिद्ध कधीच नव्हती.त्यामुळे आधी नाहीच जाणार म्हणून बोलत होती.पण त्याच्या आग्रहापुढे काहीच चालले नाही . त्याचा नाराज चेहरा ती कधीच बघू शकत नव्हती .रात्री घरी आली तेव्हा तो झोपून गेला होता.
"काय मॅडम" ?? आज खुश दिसतायत "?? त्याने अंथरुणातूनच विचारले .तशी ती वळली आणि गोड हसत त्याला थँक्स म्हणाली.
"कशासाठी" ??त्यानं  गोंधळून विचारले.
" कालची माझी संध्याकाळ अविस्मरणीय केल्याबद्दल".तिने त्याचा हात हाती घेऊन उत्तर दिले. "अरे वा!!..काय काय मजा केली  काल "??त्याने कौतुकाने विचारले.
"आहो पंधराजणीजमलो होतो.काहीजणींना तर मी ओळखलेच नाही . किती बदल झाला आहे त्यांच्या चेहऱ्यात आणि राहणीमानात .बऱ्याच जणी स्वतःच्या गाडीतून आल्या होत्या दोघींचा तर शोफर होता . श्रीमंती तर ओसंडून वाहत होती चेहऱ्यावरून .मला बघून सर्व खुश झाल्या.म्हणतात तुझ्या चेहऱ्यात काही बदल नाही आहे तसाच आहे निरागस .कसेतरीच झाले मला"ती त्या विश्वात जाऊन बोलत होती.
तो क्षणात गंभीर झाला."सॉरी मी तुला नाही पाठवायला पाहिजे होते तिथे ??
त्याचा चेहरा पाहून ती हळहळली.खांद्यावर हात ठेवून म्हणाली",असे का म्हणतोस"? .उलट तिथे जाण्याने माझा आत्मविश्वासअजून वाढला.अरे सर्व जणी आपले वैभव दाखविण्यासाठी आलेल्या . पैश्याच्या नादात आपला मूळ स्वभावच विसरून गेल्या होत्या त्या .ती रश्मी आपटे ,एके काळची ब्यूटीक्वीन आज चारही बाजूने सुटलीय .म्हणते घरातून बाहेर पडत नाही .सर्व काही जागेवर येते .आणि माझ्याकडून पुस्तके घेऊन जाणारी जया तर आता बघायलाही तयार नाही . आज त्यामुळे बदललेली मने तरी दिसली . खूप गप्पा मारल्या आम्ही त्या सर्वांकडे एक गोष्ट समान होती तो म्हणजे भरपूर पैसा न संपणारा वेळ .मध्येच कधीतरी दिसणारा नवरा  आणि वर्षातून एक पिकनिक .आणि माझ्याकडे सर्व विरुद्ध होते .पैश्याची चणचण आहे. तोच चेहरा तोच शरीराचा आकार आकार,सतत आजूबाजूला वावरणारा नवरा ,पटकन संपणारा दिवस ,आणि आजूबाजूला कधीही मदतीला तयार असणारी भरपूर माणसे .मी अजूनही नातेवाईकांना ,मैत्रिणींना प्रत्यक्ष भेटते ऐकून खूपच आश्चर्य वाटले त्यांना "असे म्हणून खो खो हसू लागली .
तिचा तो निरागस चेहरा पाहुन त्याच्या छातीत कळ उठली ."मी तुला फार काही देऊ शकत नाही ".तो मान खाली घालुन म्हणाला.
"अरे वेड्या असे का म्हणतोस.हेच तर तू देतोस ज्याची माझ्या मैत्रिणी आपल्या नवऱ्याकडून आतुरतेने वाट पाहतायत .पैसे कमावण्याच्या नादात ते ह्या गोष्टी विसरूनच गेल्यात बघ .आणि माझ्यासारखी कोण पहिली की त्यांना असूया वाटते .आज खरे तर मी त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे . माझी माणसे मला फुलासारखी जपतात यापेक्षा दुसरे सुख नाही .तिच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळून गेल्याच भास झाला .लटके रागावून त्याला म्हणाली ",चला उठायचे नाही का ?? की माझ्या सुंदर चेहऱ्याकडे बघतच दिवस भरणार आहेस ???

@ किरण बोरकर

No comments:

Post a Comment