Friday, July 7, 2017

भाडेकरू

काहीश्या संभ्रमित अवस्थेत मी विक्रमच्या घरात शिरलो.मला पाहून विक्रम खुश झाला.पण रिकाम्या हाताकडे पाहून एक रागीट कटाक्ष टाकून वहिनीला मी आल्याची वर्दी दिली.
"रिकाम्या हाताने कोणाकडे जाऊ नये ",त्याने अक्कल पाजळली .
मी लक्ष दिले नाही.माझा चेहरा पाहून विक्रम समजला. "भाऊ काय झाले ?चमत्कार झाल्यासारखा का चेहरा झालाय "??
"विक्रम तुझ्या मजल्यावर एक नवी मुलगी आलीय का??  तसा विक्रम चमकला .किचनमध्ये पाहून हळूच म्हणाला", पाहिलीस का तिला .?? मस्त आयटम आहे ना ?? अजून दोन आहेत . एकापेक्षा एक टकाटक आणि हातावर टाळी दिली .
"झाले का तुझे सुरू ?? मी चिडूनच बोललो.
"अरे हल्लीच आल्या.तिघी दामलेच्या फ्लॅटमध्ये . जाम भारी आहेत त्या . त्यांचे वागणे बघूनच बिल्डिंग मधले सर्व दबून असतात".
  इतक्यात नाना आत शिरले . बहुतेक मला पाहूनच चहाची सोय झाली असे वाटले त्यांना . नाना विक्रमचे शेजारी . निवृत्त त्यामुळे रिकामेच . आमचे चेहरे पाहूनच त्यांना कळले कोणता विषय चालू आहे .विक्रमने मुकाटपणे आत जाऊन",एक चहा वाढव ग"अशी ऑर्डर सोडली.
"भाऊ आहो काय पोरी आहेत त्या . मगाशी पानाच्या टपरीवर गेलो तेव्हा त्यातली एक बया सिगारेट घेत होती . ती सिगारेट पाहूनच मी माझी छोटा गोल्डफ्लेकची ऑर्डर कॅन्सल केली .आणि झोकात सिगारेट पेटवून अशी नजर मारली......अरे घाम फुटला मला"ते ऐकून आम्ही दोघे जोरात हसलो.
" खरेच रे भाऊ, परवा माझ्याबरोबर लिफ्टमध्ये होती पण मी अंग चोरून उभा होतो . अरे तिचा रुबाब पाहून मी जनरल मॅनेजर आहे हे विसरून गेलो.विक्रम चेहरा वाकडा करीत म्हणाला.
"तसाही विकी,तू जनरल मॅनेजर वाटत नाहीस.नवरात्रीला देवीचे विसर्जन करताना थ्रीफोर्थ घालून जो नागीण डान्स करतोस त्यावरून मुळीच वाटत नाही."असे बोलून नानाना टाळी दिली.
"पण भाऊ हे प्रकरण जरा गंभीर आहे आणि त्यासाठीच मी इथे आलोय ",नाना गंभीरपणे म्हणाले. "अरे इथे या मुली राहातायत .परक्या गावातून इथे नोकरी करायला घरापासून दूर आल्या म्हणून आपलेपणाने राहायला दिले . काही दिवस ठीक होत्या.कोणाच्या अध्यातमध्यात नाहीत . आपण बरे आपले काम बरे अश्या. पण हळू हळू त्यांची राहण्याची पद्धत बदलली . रात्री बेरात्री बाहेर जाणे . सोसायटी गेटवर उभे राहून सिगारेट पिणे चालू झाले . सोडायला आलेल्या मित्रांबरोबर नको नको ते चाळे करणे सुरू झाले . कधी कधी त्यांच्या मैत्रिणी येतात दारूच्या बाटल्या घेऊन आणि रात्रभर म्युझिक लावून नाचत बसतात . त्या दिवशी कंटाळून माझी सून त्यांना सांगायला गेली तर तिच्याच अंगावर धावून आल्या ,अंगावरच्या कापड्यांचीही शुद्ध नव्हती त्यांना .काय करायचे यांचे .काल तर एक पुरुष रात्रभर घरी होता त्यांच्या . विचारायला जाण्याचीही भीती वाटते .मी दामले काकांना निरोप दिला ते येऊन बोलले तर त्यांनाही जुमानले नाही त्यांनी . भाडे दिले आहे पूर्ण मग गप बसाअशी उत्तरे मिळाली.ते तरी काय करणार.काहीच ताळतंत्र राहिला नाही याना.
"ठीक आहे ".मी विचार करू लागलो" नाना तुम्ही आधी मीटिंग घेऊन भाडेकरूसाठी नियमावली बनवा.त्याची प्रत पोलीस स्टेशन ला द्या . आणि भाड्याने फ्लॅट देण्याची पूर्तता त्या नियमानुसारच करा म्हणजे पोलीस त्यांना समजावतील .आहो तरुण पोर आहेत ती .कोणी मनाने वाईट नसते .शिवाय उच्चशिक्षित ,मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असतात . घरापासून लांब असतात म्हणून मोकळे वागतात त्यात तरुणपणाचा जोश . उगाच पोलीस स्टेशन आणि तक्रारींमुळे त्यांची कारकीर्द वाया जायची . तसे नाना म्हणाले", ते ठीक आहे भाऊ पण तरीही नाही ऐकले तर ??
" तर !!! ...मी विचार करून म्हणालो ",मग विक्रमवर सोडा ते . काय विकी बरोबर ना ???
तसाविक्रमही हसून म्हणाला ",हो मी बघतोच काय करायचे . तसेही बॉक्सिंग प्रॅक्टिस बरेच दिवस झाली नाहीच ",ते लक्षात येताच नाना जोर जोरात हसू लागले.

(C) श्री.किरण बोरकर .

No comments:

Post a Comment