Tuesday, June 20, 2023

क्लिओ

क्लिओ
साल 1987 जर्मनी दोन भागात विभागला गेला होता.पूर्व जर्मनी जे अजूनही कम्युनिस्ट राजवटीत होते तर दुसरीकडे पश्चिम जर्मनी ज्यात आधुनिकरणाचे वारे वाहत होते. या दोन्हीच्यामध्ये बर्लिनची सुप्रसिद्ध भिंत होती.
क्लिओ पूर्व जर्मनीतील सिक्रेट सर्व्हिस एजंट. तिचे आजोबा गुप्तचर खात्याचे प्रमुख आहेत.ती हुशार मारेकरी आहे.पूर्व जर्मनीच्या शत्रूंना मारणे हे तिचे काम.
आता तिला पश्चिम जर्मनीत जाऊन एका शत्रूला ठार मारायचे आहे.सुरवातीलाच ती बर्लिनच्या भिंतीखालच्या भुयारातून पश्चिम जर्मनीत दाखल होते.तेथे ती वेशभूषा बदलून एका बारमध्ये दाखल होते आणि टार्गेटला टॉयलेटमध्ये नेऊन मारते.खरे तर तिचे काम इथेच समाप्त होते. पण  एक पोलीस अधिकारी तिला पाहतो आणि नंतर तो टॉयलेटमध्ये खून झालेली व्यक्तीही पाहतो .तो आपल्या वरिष्ठांना ही बातमी देतो.
इथे पूर्व जर्मनीत क्लिओला अटक होते.तिच्यावर पूर्व जर्मनीतील काही गुपिते पश्चिम जर्मनीला विकल्याचा आरोप होतो .तिचे आरोप सिद्धही होतात आणि तिला कारावास होतो .
पुढे 1990 साली बर्लिनची भिंत पाडली जाते आणि दोन्ही देश एक होतात.याचाच फायदा क्लिओला मिळतो आणि तिची सुटका होते. 
पण आपल्या अटकेमागे मागे कोणाचा हात आहे याचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करते.पण आता पूर्व जर्मनीतील सिक्रेट सर्व्हिस बंद झाली आहे.तिच्या अटके मागे हात असलेले कित्येक अधिकारी गायब झाले आहेत. 
आता क्लिओ त्या सर्वांच्या मागावर आहे जे या प्रकरणात आहेत.त्यात तिचे आजोबाही प्रमुख संशयित आहे.या प्रकरणाचा माग घेताना तिला आपल्या टार्गेटकडे एक लाल सुटकेस होती आणि त्या सुटकेसमध्येच सर्व पुरावे आहेत ही नवीन माहिती कळते. ती त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने सुटकेस शोधायचा प्रयत्न करते.
आठ भागाची ही मालिका आपल्याला इतकी गुंतवून ठेवते की पूर्ण पाहिल्याशिवाय आपण उठूच शकत नाही.यातील प्रमुख नायिका क्लिओ ही अतिशय हसतमुख ,अजिबात टेन्शन न घेणारी आणि सहज समोरच्याला ठार करणारी आहे. मालिका हलकी फुलकी दिसत असली तरी भरपूर हाणामारी आणि रोमांचक थ्रिलर आहे.
 मूळ जर्मन भाषेतील मालिका नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

No comments:

Post a Comment