Tuesday, June 6, 2023

एक वटपौर्णिमा

एक वटपौर्णिमा 
नेहमीच गजबजाट असलेल्या त्या भल्यामोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आज शांतता दिसत होती.ऑफिसमध्ये कोणीही नसले तरी मुख्य कॅबिनमध्ये दोन माणसे हजर होती..त्यातील एकाच्या चेहऱ्यावर प्रचंड वैताग दिसत होता तर दुसरा मात्र त्याच्याकडे छद्मीपणे हसत होता.
" तुला हसायला काय जाते चित्रगुप्ता , ही अशी परंपरागत वेशभूषा करून मलाच पृथ्वीवर जायचे आहे ना ? आपले खांद्यावरचे उपरणे सांभाळत आणि डोक्यावरचा मुकुट एका हाताने व्यवस्थित ठेवायची कसरत करीत ती उंच काळी आणि उग्र चेहऱ्याची व्यक्ती चिडून बोलली.
 त्या दोन व्यक्ती कोण हे आमच्या चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच.त्यातील एक होती चिन्मय त्रंबक गुप्त अर्थात चित्रगुप्त आणि दुसरे त्याचे साहेब यशवंत मनोहर राज अर्थात यमराज .
आज वटपौर्णिमा असल्यामुळे त्यांच्यासाठी तो खासच दिवस होता . आजच्या दिवशीच यमराजांना पारंपरिक वेशभूषा करून पृथ्वीवर जावे लागत असे.
" तुम्ही हजारो वर्षांपूर्वी केलेल्या त्या एका चुकीची शिक्षा इतकी वर्षे भोगावी लागेल याची कल्पना नव्हती मला" मान खाली घालुन पण तिरक्या नजरेने यमराजांकडे पाहत चित्रगुप्त छद्मीपणे म्हणाले.
" बघ ना , मला काय माहित भावनेच्या भरात दिलेल्या वचनाचे इतके गंभीर परिणाम होतील. बरे सध्याच्या परिस्थितीनुसार वेशभूषा करून जाईन असा अर्ज दरवर्षी देतो पण तोही फेटाळला जातो. पारंपारिक कपडे घालूनच जा अशीच वरून ऑर्डर येते .नाही रे जमत यात मला " यमराज रडकुंडीला येऊन म्हणाले.
इतक्यात बाहेर कोणीतरी मोठ्याने हंबरले.लॅपटॉपवरील स्क्रिनकडे पाहत चित्रगुप्त ओरडले "महाराज तुमचे  पारंपारिक वाहन बाहेर तुमची आठवण काढतोय ". बाहेर उभ्या असलेल्या रेड्याकडे पाहत त्यांनी आपल्या बुलेटची चावी चित्रगुप्ताकडे फेकली आणि दोरीचा फास हातात घेतला .
"खबरदार माझ्या बुलेटला हात लावशील तर "? असे  रागानेच बोलून बाहेर पडले.
इथे चित्रनगरीत एका सेटवर खूपच गडबड दिसत होती.एक माणूस सारखा हातातील घड्याळाकडे पाहत सतत मोबाईलवर बोलत होता.त्या सेटवर आज वटपौर्णिमेचे शूटिंग चालू होते. मराठी चित्रपट नाटक आणि सिरीयलमधील  प्रसिद्ध अभिनेत्री चित्रलेखा मॅडम सेटवर हजर होत्या.
चित्रलेखा मॅडम म्हणजे भारतीय स्त्रीचा आदर्श नमुना असे म्हटले जात होते.आदर्श माता आदर्श सून आदर्श मुलगी अश्या वेगवेगळ्या भूमिका तिने केल्या होत्या .अन्याय सहन करणारी ,कधीही कपट कारस्थान न करता सत्याच्या मार्गाने लढा देणारी, सर्वानी कितीही पापे केली तरी माफ करणारी  स्त्री अशी तिची प्रतिमा होती.
" काय झाले सर ? शूटिंग का खोळंबली आहे " तिने डायरेक्टरला त्रासून विचारले.
" काही नाही रेडा आणि यम यायचा आहे " डायरेक्टर हसून म्हणाला . इतक्यात मगाशी मोबाईलवर बोलणारा माणूस आपल्या सोबत यम आणि रेड्याला घेऊन आलाच.
" अरे वा डायरेक्ट मेकअप करूनच आणला की " डायरेक्टर कौतुकाने त्याच्याकडे पाहत म्हणाला आणि हा खरा रेडा आहे .बघ हो ते प्राणीमित्र इथे आले तर तुलाच सेटवरून बाहेर फेकून देईन "डायरेक्टर धमकीच्या आवाजात म्हणाला .
" चला मॅडम शूटिंगला सुरवात करू ,काय रे तुला माहीत आहे का सीन" ? त्याने यमराजकडे पाहत विचारले.
"मला सर्व माहीत आहे ".एक रागीट नजर टाकून यमराज उत्तरले .
"आयला.! पूर्ण भूमिकेत शिरूनच आलेला दिसतोय .चला सुरवात करू "डायरेक्ट  सेटवर जात म्हणाला.
रात्री नऊ वाजता चित्रलेखा आपल्या आलिशान रो हाऊसमध्ये शिरली तेव्हा पूर्ण थकून गेली होती.यावेळी  नवऱ्याचे प्राण यमाकडे मागतानाच्या सीनचे जरा जास्तच रिटेक झाले होते. तो कलाकार जास्तच यमराजाच्या भूमिकेत शिरला होता असे तिला वाटले.
त्याने तिच्याकडून अनेक प्रकारात मनधरणी करून घेतली होती.एकदातर ती चिडून त्याच्या अंगावर धावूनही गेली होती. 
अंगावरचे कपडे फेकून देतच ती बाथरूममध्ये शिरली .मस्तपैकी शॉवर घेऊन ती बाहेर पडली आणि जोरात किंचाळली. समोर तो उभा होता .तिचा नवरा ..हातात कॉफीचा फेसाळता मग घेऊन.ती कॉफी तिच्या आवडीची होती पण समोरच्याचा क्रूर चेहरा ती विसरू शकत नव्हती .
पण हा इथे कसा ? आणि इतकी वर्षे तो कुठे होता ? जगाच्या दृष्टीने तो दोन वर्षांपूर्वीच गायब झाला होता.तो परदेशात बिझनेससाठी गेलाय असेच सर्व समजून होते आणि काही न कळवता तो आज हजर झाला होता .
ती धावतच रो हाऊसच्या मागच्या बाजूला गेली . हातात फावडे घेऊन तेथील वडाच्या झाडाखाली खणू लागली .पण तिथे काहीच नव्हते.
" काही सापडणार नाही तुला "मागून आवाज आला .तिने दचकून वळून पाहिले तेव्हा तो रेड्यावर बसून तिच्याकडे पाहत होता .हातातील दोरीचा फास तो सतत गरगर फिरवीत होता .
" पण का "? तिने रडत विचारले 
"का ?? अग किती खोटी कामे करशील अजून.अन्याय सहन करणारी आदर्श स्त्री. हजारो वर्षांपूर्वीची स्त्रियांची इमेज कधी बदलणार तुम्ही. का सतत स्त्री सासू नवरा नणंद यांचा जाच सहन करणारी दाखवता. तुमच्या अश्या कामांमुळेच स्त्रीची प्रतिमा दुबळीच राहिली आहे. प्रत्यक्ष आयुष्यात तू नवऱ्याचा छळ सहन केला नाहीस आणि त्याचा खून केलास .त्याला इथेच पुरलेस आणि तो परदेशी गेलाय अशी बातमी पसरवलीस .याचीच शिक्षा म्हणून आज तुझ्या नवऱ्याला जिवंत केलेय मी .आता बघू प्रत्यक्ष आयुष्यात आदर्श स्त्री म्हणून कसा अभिनय करतेस ती "असे म्हणून यमराज गायब झाले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment