Monday, September 18, 2017

हॅकर

दिलीप माझा बालपणापासूनचा मित्र.खूप मजा करायचो आम्ही.त्याला पहिल्यापासून दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसायची आवड .प्रत्येकाचा इतिहास ,भूगोल खाणून काढण्याची सवय.मोठे झाल्यावर त्याने कॉम्पुटर क्षेत्र निवडले . अर्धे जग फिरून आला .कधी भेटल्यावर त्याच्या क्षेत्रातील गमती जमती सांगायचा .कधी कधी तो पोलिसांसाठी हॅकर म्हणूनही मदत करायचा .
काल तो अचानक रस्त्यात भेटला . "भाऊ चल घरी.मस्त गप्पा मारू".असे म्हणत हात पकडून घरी घेऊन गेला.त्याचे घर म्हणजे एक प्रकारची सिक्युरिटी केबिन  होती . दोन मोठे स्क्रिन ,लॅपटॉप ,बऱ्याच केबलची गुंडाळी.
"बस.. असे म्हणत फ्रीजमधून टिन काढला."तुझे काम जोरात चाललेले दिसतेय "?? मी सर्वत्र नजर फिरवून म्हटले.
"अरे हीच आवड आहे माझी .चल ...बोल तुला कोणाच्या आयुष्यात डोकावयाचे आहे ?? कोणाच्या अकाउंट मध्ये किती रक्कम आहे ती बघायची आहे .?? तुझ्या कंपनीच्या कामगारांचा पगार बघायचा आहे का ?? बोल बोल"?? तो पाठीवर थाप मारून म्हणाला.
"ह्या ....!! हे सर्व शक्य असते का?? पासवर्ड लागतो त्याला.काहीतरी बोलू नकोस",मी चिडूनच म्हटले.
" अरे ...!! सर्व शक्य असते भाऊ.आम्हा हॅकर लोकांचे हेच काम असते दिवसभर . आणि तुम्ही लोकच आम्हाला संधी देतात ते सर्व शोधायची ".तो हसून म्हणाला.
"कसे बुवा "?? मी प्रश्न केला.
"ऐक मग....साधी गोष्ट घे ,तुम्ही लोक फेसबुक अकाउंट उघडता.त्यात तुमची पर्सनल माहिती भरता पण सेटिंग मध्ये जाऊन सिक्युरिटी सेटिंग करीत नाही .मग तुमचे मित्र जॉईन होतात .त्यानंतर हौसेने तुम्ही स्वतःचे पर्सनल फोटो टाकता.आज मी कुठे आहे .कोणता चित्रपट पाहतोय .कोणाबरोबर पाहतोय हे ही पोस्ट करता .आम्ही लोक तुमच्यावर लक्ष ठेवतो.तुमच्या प्रोफाइल वरून तुमच्या घरी कोण आहेत .कितीजण आहेत याची माहिती काढतो..तुमच्या गाडीच्या नंबर प्लेट वरून तुम्ही कुठे रहाता याचा शोध घेतो .तुमच्या कंमेंट करण्याच्या पद्धतीवरून तुमचा स्वभाव ओळखतो .तुमची आर्थिक स्थितीही लक्षात येते .आणि कधीतरी तुम्ही चुकून कोणालातरी कंमेंट मधून आपली पर्सनल माहिती ही देत असता .त्यामध्ये बँक अकाउंट कुठे आहे .पुढचे प्लांनिंग काय आहे .ते सर्व तुमच्या नकळत सांगत असता सर्वाना.आता हेच बघ ना...विक्रम कुटुंबासमवेत पुढच्या शनिवारी गडकरींला गाण्यांच्या प्रोग्रॅमला जाणार आहे .म्हणजे कमीतकमी पाच तास त्याचे घर रिकामे असेल . काही लोक या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात".दिलीप गंभीरपणे म्हणाला .
"अरे बापरे....!! हे असेही असते का" ?? मी हादरून विचारले.
"केवळ  फेसबुक नाही भाऊ .तर तुझे क्रेडिट, डेबिट कार्ड वापरलेस तर तू कुठून काय खरेदी केले ते ही कळेल मला .हल्ली बऱ्याच सोशल साईट निघाल्या आहेत .कोणत्या साईटवर तुझा फोटो अपलोड करू बोल ??? 
"तो कसा ?? आता मला ही इंटरेस्ट वाटू लागला.
" अरे तुझे फोटो फेसबुक वरून डाउनलोड करतो आणि त्या साईटवर टाकतो .खूप सोपे आहे ते"
"म्हणजे आता खाजगी काही राहिले नाहीच का"?? मी हताश होऊन  विचारले .
"नाही भाऊ...! पण ते कंट्रोल करणे आपल्या हाती आहे .आपली माहीती कमीत कमी लोकांना मिळेल याची काळजी घ्यावी.ऑनलाइन बँकिंग शक्यतो एकाच बँकेतून करावी.त्यात जरुरीपूर्तीच रक्कम ठेवावी .पासवर्ड बदलत रहावा .आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करू नये .कोणत्याही वादग्रस्त गोष्टीत सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करू नये.हे गूगल भाऊ खूप चौकस बुद्धीचे आहेत .ते तुमचा सर्व डाटा स्वतःकडे जपून ठेवतात ,आणि तुम्हाला वेगवेगळी आमिष दाखवीत राहतात . उदारणार्थ तूला चित्रपट.संगीत याची आवड आहे तर ते त्याच प्रकारच्या वेगवेगळ्या साईट तुझ्या समोर आणतील आणि तुला त्यात गुंतवून ठेवतील .
"अरे देवा ....!!! मी अचंबित होऊन उद्गारलो.",बरे झाले हे सर्व सांगितलेस अरे सर्वच जण नेट  वापरतात आणि सोपे आहे येता जाता टाइमपास होतो म्हणून  मीही वापरतो .पण असे ही असते हे आज कळले मला.
भाऊ तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला पाहिजे तसा आपण करू शकतो.चांगली माणसे याचा चांगल्यासाठी वापर करतात पण वाईट वृत्तीची माणसे याच्या स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करतात.शेवटी हे सर्व आपणच निर्माण केले आहे त्यामुळे ते कसे वापरावे हे आपल्यालाच कळले पाहिजे .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment