Friday, September 1, 2017

पाऊस

दुपारी पावसाचा जोर वाढला तेव्हाच अमित चौगुले समजून गेला आज काही खरे नाही आपले .त्यात ट्रेन बंद झाल्याची खबर आली आणि आजचा मुक्काम फॅक्टरीतच असे पक्के करून टाकले.ताबडतोब घरी फोन करून कळवूनही टाकले.
हळू हळू पावसाचा जोर वाढू लागला . त्याने आणि त्याच्या टीमने जमेल तेव्हडे प्रयत्न केले कमीत कमी नुकसान होऊ देण्याचे. पण जेव्हा रस्त्यावरील पाणी वेगाने आत शिरू लागले तेव्हा त्याचा नाइलाज झाला . गूपचूप केबिनमध्ये येऊन पावसाला शिव्या घालत बसला .त्यात वीज गेली आणि जनरेटर चालू करावा लागला . डिझेल ही कमी होते .बाहेर पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता .रस्त्यावर गुढगाभार पाण्यात लोक चालत होते . आज बाहेरच पडायचे नाही असे त्याने पक्के केले . रात्रभर वीज येणार नाही असे त्याला कळविण्यात आले आणि डिझेल ही पुरणार नाही म्हणून त्याने जनरेटर बंद करण्याचा निर्णय घेतला.
रात्रभर काळोखात बसण्यापेक्षा पाऊस कमी झालाय ट्रेन चालू होतील या आशेवर रात्री नऊ वाजता तो  बाहेर पडला .रस्त्यावर सगळीकडे गर्दी दिसत होती . बसेस फुल्ल होऊन धावत होत्या तर एकही रिक्षा रिकामी दिसत नव्हती .रस्त्यात काही ठिकाणी दुकानदार चहा आणि बिस्किटंचा वाटप करीत होते .अमितने पटकन चहा आणि बिस्किटे घेतली आणि खात खात स्टेशनला आला .रेल्वे स्टेशन तर गर्दीने फुलून गेले होते .गाड्या चालू होण्याची शक्यता दिसत नव्हती .प्लॅटफॉर्मवर ही काही सामाजिक कार्यकर्ते लोकांना चहा आणि बिस्कीट वाटत होते .अमित शांतपणे एक कोपऱ्यात उभा होता .बारा वाजून गेले तरीही गाड्या सुरू झाल्या नाहीत हे पाहून त्याचा धीर संपला .स्टेशनच्या बाजूला असलेल्या बस डेपोत तो निघाला .रस्त्यात त्याला एक बस दिसली ती थांबावी म्हणून त्याने हात दाखविला पण ती न थांबता निघून गेली .डेपोमध्ये ही एक बस रिकामी होती पण ड्राइवर आणि कंडक्टर दोघांनीही पब्लिकने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता बस रिकामी घेऊन गेले .दुसऱ्या बसच्या ड्रायव्हरने प्रवाशांना उलट उत्तरे दिली .शेवटी अमित आणि त्याचा सहकारी त्याच बसने हायवेला आले . तिथून त्यांनी रिक्शा केली .रिक्शा चालकाने मागितले तेव्हडे भाडे न वाद घालता दिले.
आता घर काही अंतरावरच होते पण तिथे जायला एकही टॅक्सी तयार नव्हती.बसही नव्हत्या .रात्रीचे दीड वाजले होते .रस्त्यावर गर्दी वाढत होती .आता हळू हळू पुढे चालत जायचे दोघांनी ठरविले .काही अंतर कापताच ट्राफिक जाम दिसून आले .रस्त्यावर ठिकठिकाणी काहीजण पुलाव ,पाणी ,चहा ,दूध वाटप करीत होते .रस्यावरून जाणाऱ्या प्रवाश्यांना मार्गदर्शन करीत होते . साली ही मुंबई झोपत नाही हे खरेच आहे .आणि अडीअडचणीला तर हे जातभेद ,धर्म विसरून एकमेकांना मदत करतात .
अमित त्याच्या मित्रांबरोबर गुढग्याभर पाण्यातून चालत निघाला.एके ठिकाणी नवरा बायको प्रवाश्यांना कॅडबरी चॉकलेट वाटीत होते .अमितने एक चॉकलेट घेऊन खिश्यात टाकले . आपण काहीतरी चांगले करतोय याचा आनंद त्या जोडप्याच्या चेहऱ्यावर दिसत होता .हळू हळू त्याचे घर जवळ आले .दहा मिनिटात घरी पोचणार होता तो .तितक्यात विरुद्ध दिशेने ऍक्टिवावरून जाणार एक तरुण त्यांच्या जवळ थांबला .त्याने कुठे राहता याची चौकशी करून गाडी वळवली . त्या दोघांनाही त्याने त्यांच्या घरापर्यंत पोचवले . अमित दरवाजा उघडून घरात शिरला तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment