Friday, September 15, 2017

वाढदिवस

मध्यरात्री बारा वाजता तिला फोनवर वाढदिवसाच्या शुभेच्छाचा मेसेज आला.ती नेहमीप्रमाणे स्वतःशीच हसली .त्या हसण्यामागे एक वेदना होती .गेली तीन वर्षे रात्री बारा वाजता त्याचा मेसेज येतो.
तिला तीन वर्षांपूर्वी काळ आठवला .खूप छान दिवस होते ते .तशी ती सुखवस्तू कुटुंबातून आलेली. हा गरीब पण मेहनती .स्वभावाने प्रेमळ .वडील नको नको म्हणत असतानाही हिने लग्न केले .म्हणतात ना प्रेम आंधळे असते .माझ्या प्रेमाने संसार सुखाचा करू असे मोठे संवाद बोलत ही त्याच्या घरी आली.वर्ष दोन वर्षात परिस्थिती काही बदलली नाही आणि हिच्या जुन्या सवयी उफाळून येऊ लागल्या .दुकानातील उंची वस्तू ,रस्स्यावर पळणाऱ्या आलिशान गाड्या ,चांगल्या हॉटेलमधील जेवण हवेहवेसे वाटू लागले .कधी कधी बोलून दाखवायची पण हा सोयीने दुर्लक्ष करायचा .तिच्या वाढदिवसाला नेहमीप्रमाणे पूर्ण दिवस तो तिच्याबरोबर राहिला.तिला भेट दिलेला साधा ड्रेस खुलून दिसत होता. तो नेहमीप्रमाणे जीन्स आणि सध्या टी शर्टवर होता .केसातील मोगऱ्याच्या गजऱ्याने तिच्या सौंदर्याला वेगळीच झळाळी आली होती.हातातील शेंगदाणे एकमेकांना भरवीत त्या दिवसाचा प्रत्येक क्षण उपभोगला त्यांनी .संध्याकाळी  समुद्राच्या कट्ट्यावर बसून समोरच्या सप्ततारांकित हॉटेलकडे पाहून ती म्हणाली",  आपण इथे कधी येणार जेवायला ? त्याच क्षणी तो स्तब्ध झाला.डोळ्यात एक निश्चय पहिला तिने .काही न बोलता ते घरी परतले.
काही दिवस असेच गेले आणि एक दिवस त्याने नोकरीसाठी परदेशी जाण्याचे जाहीर केले .तिला तो धक्काच होता .पण पुढील सुखी आणि सोनेरी भविष्यकाळ पाहून तिने स्वीकारले .त्यानंतर दर महिन्यात तिला वेगवेगळ्या गिफ्ट मिळू लागल्या .वर्षातून पाच सहा दिवसासाठी तो तीन वेळा यायचा .दरवेळी तिच्यासाठी काहीतरी सरप्राईज असायचे .लवकरच एक आलिशान फ्लॅट बुक झाला . पुढच्यावेळी गाडी घ्यायची ठरले .सगळे मिळत होते फक्त सहवास नव्हता .ती त्याच्या सहवासासाठी झुरू लागली.
आजही त्याच्या मेसेज आला आणि तिला त्याची कमी जास्त जाणवली .पुन्हा सकाळी त्याचे गिफ्ट आले .यावेळी ही उंची ड्रेस किंवा तसेच काहीतरी असेल या अपेक्षेने तिने उघडले तर आता चक्क साधा ड्रेस होता .असे ड्रेस तीन वर्षांपूर्वी ती वापरात होती .त्यात एक चिट्ठी होती .हा ड्रेस घालून नेहमीच्या ठिकाणी ये.ती मोहरली .शेवटी तो आलाच... नेहमीप्रमाणे सरप्राईज घेऊन.
लवकर तयार होऊन ती नेहमीच्या ठिकाणी आली .थोड्याच वेळाने समोरच्या बस मधून तो उतरला नेहमीप्रमाणे मळलेली जीन्स आणि टी शर्ट घालून .त्याला पाहून ती अश्रू रोखू शकली नाही .लोकांची तमा न बाळगता भर रस्त्यात मिठी मारून मनाचा बांध मोकळा केला .त्याने हळूच पिशवीतून मोगऱ्याचा गजरा काढून तिच्या समोर धरला .काही न बोलता तिने पाठ वळवली .मोठ्याने हसत त्याने विचारले अजूनही स्वतःला माळता येत नाही का ? तिने लटक्या रागाने त्याच्याकडे पाहिले.मग त्याने खिशातून शेंगदाण्याची पुडी काढून दोन शेंगदाणे तिच्या तोंडात भरविले .ती मोहरून गेली .नेहमीप्रमाणे त्यांनी तो दिवस साजरा केला .संध्याकाळी ते परत त्या सप्ततारांकित हॉटेल समोरच्या कट्ट्यावर  बसले .पण यावेळी तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते .त्यानेच विचारले चल जेवायला जायचे ना ?? तशी ती उठली त्याने हात धरून त्या हॉटेलमध्ये एन्ट्री केली .यावेळी त्याच्या वागण्यात एक आत्मविश्वास दिसत होता .वेटरच्या वेगळ्या नजरेकडे दुर्लक्ष करीत ते रिकाम्या टेबलवर बसले .आणि झोकात जेवणाची ऑर्डर दिली .पण आज तिला जाणवले तिच्यासाठी काय महत्त्वाचे आहे .
© श्री .किरण बोरकर

No comments:

Post a Comment