Friday, September 29, 2017

नववी माळ

नववी माळ ..... रंग ??
सकाळी उठून ती तयार झाली .आजच्या रंगाची साडी आणि मॅचिंग सर्व आधीच काढून ठेवले होते .स्वतःचे पटापट आवरून  साडी नेसून तयार झाली . नेहमीप्रमाणे सासूबाईंच्या वेगळा नाश्ता ,मुलांचा वेगळा ,नवऱ्याचा डबा तयार करून ती सासूबाईंना भरवायला गेली . गेले सहा महिने सासूबाई अंथरूणावरच पडून होत्या .त्यांना भरवून औषध देऊन त्यांची सर्व तयारी करून ती  इतर कामाकडे वळली. सर्वांचे कपडे धुणे ,पाणी भरणे यात वेळ गेला .मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतली.मध्ये मध्ये येणारे फोन तिलाच घ्यावे लागत होते .
दुपारी जेवण झाल्यावर तिने सासूबाईंना जेवण भरविले . सासूने नजरेनेच तिच्याकडे पाहून छान दिसतेस अशी खूण केली . तशी ती लाजली . अश्या अवस्थेतही सासूचे आपल्यावर लक्ष आहे हे पाहून ती सुखावली.दुपारी विजेचे बिल भरून आली .येता येता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करीतच आली  .मुलाने आज वेगळ्या डिशची फर्माईश केली होती .त्याचे मित्र घरी येणार होते .तर नवरा परस्पर बाहेर पार्टीला जाणार होता  .मुलाचे मित्र घरी येणार म्हणून घर आवरायला घेतले . सकाळी सर्वांनी जाताना घरात पसारा करून ठेवला होता तो अजून आवरला नव्हताच.
बघता बघता संध्याकाळ झाली .सासूबाई सारख्या बेल वाजवत होत्या . त्यांच्या नाश्त्याची औषधाची वेळ झाली होती .बरेच दिवस हिचे गुढगे दुखत आहे .रोज डॉक्टरकडे जाईन म्हणते पण वेळच मिळत नाही . काहींना काही कामे निघातातच .पण तिलाही हल्ली स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता ?.सासूबाईना पुन्हा भरवून औषधे देऊन ती संध्याकाळच्या जेवणाकडे वळली .जेवण करता करता अचानक आठवले उद्या कोणता रंग आहे ??. पेपर बघायलाही वेळ नव्हता म्हणून मैत्रिणीला फोन करून उद्याचा रंग विचारून घेतला .
"अरे देवा ....!! या रंगाची साडीच नाही माझ्याकडे आणि ड्रेसही नाही . तिचा चेहरा पडला .आता स्वयंपाकाकडे  लक्ष लागेना . कसेबसे  स्वयंपाक  आटपला. आता बाहेर जाऊन ही काही फायदा नाही . लवकरच दुकाने बंद होतील .थोड्याच वेळाने मुलाचे मित्र आले आणि हसत खेळत गप्पा मारीत जेऊनही गेले.
सासूबाईंना भरविताना हिच्या डोक्यात उद्याचेच विचार चालू होते . सासूबाईंनी खुणेनेच विचारले काय झाले ??? हिने भडाभडा आपली तळमळ तिच्यासमोर मांडली .त्याही स्थितीत सासू हसली . खुणेने आपल्या कपाटाकडे बोट दाखविले आणि उशीखालच्या चाव्या नजरेने खुणावल्या . तिने चकित होत कपाट उघडले .आतमध्ये काही साड्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या होत्या .अर्थात हेही काम तिचेच होते म्हणा.. .त्यामध्ये उद्याच्या रंगाची साडी होती आणि मॅचिंग ब्लाउज ही .ते पाहूनच हीचा  चेहरा खुलला . आज रात्री हाताने टाके मारून ब्लाउज व्यवस्थित करता येईल .तिने साडी बाहेर काढून लहान मुलीसारखे सासूबाईंकडे बघितले .तिच्या नजरेतील आनंद पाहून सासूबाईंच्या डोळ्यातुन अश्रू ओघळले . होय त्या दोघीही देवी आहेत.

© श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment