Tuesday, September 5, 2017

अरविंद सुर्वे उर्फ अव्या

अरविंद सुर्वे उर्फ अव्या
कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अरविंद सुर्वे आपल्या कुटुंबासह बसला होता .आज तो कुटुंबासह कोकणातील आपल्या छोट्याशा गावी गणपतीसाठी निघाला होता .त्याची पत्नी शांतपणे पुस्तक वाचीत बसली होती तर मुले गप्पा मारीत होती.
दरवर्षी तो गणपतीसाठी सहकुटुंब भारतात जात होता .तसे त्याने आपल्या भावाला वचनच दिले होते .मुलांकडे बघता बघता तो भूतकाळात हरवून गेला.
कोकणातील एक छोट्या गावात त्याचा जन्म झाला .एकूण पाच भाऊ . आईवडील लहान असतानाच गेले .तेव्हा मोठ्या भावावर सगळी जबाबदारी  आली . हा दुसरा मागे तीन भाऊ .त्यामुळे जगण्यासाठी वाटेल ते करायची वृत्ती अंगात भिनली . मोठ्या भावाचे तत्वनिष्ठ वागणे ह्याला पटायचे नाही त्यामुळे याने  पैसे कमावण्याचा स्वतः चा मार्ग निवडला .फुकट कोणतेही काम करायचे नाही . प्रत्येक कामाची काहीतरी किंमत असतेच हेच तत्व पक्के करून आयुष्य जगू लागला .सुदामदादा आणि याने पाठच्या भावांची काळजी घेतली .पण आपली मते त्यांच्यावर लादली नाही .पुढे याने स्वतःचा छोटा उद्योग चालू केला  आणि संधी मिळताच कॅनडाला निघून आला .नागरिकत्व मिळविण्यासाठी लग्न केले .बायकोच्या मदतीने तिथेही छोटासा उद्योग चालू केला .मेहनतीवर आणि हुषारीवर हळूहळू वर चढत गेला .जमेल तसे गावी मदत करीत राहिला .नामदेव मुळातच हुशार त्यामुळे त्याच्यावर जास्त मेहनत घेतली त्याने .शंकरलाही आय टी आय चे शिक्षण घेऊ दिले .विन्या तर मुंबईला गेला.त्याला शिक्षणापेक्षा ऍक्टिग मध्ये जास्त रस त्यातच त्याला करियर करायचे होते . असो आता सगळे मार्गाला लागलेत.
कॅनडाला निघताना सुदामदादाचे भरलेले डोळे अजून डोळ्यासमोरून जात नाहीत .पण गणपतीत नक्की येईन असे वाचन देऊन तो निघाला आजगायत तो ते वाचन पाळीत आहे .त्याची कॅनेडियन पत्नी ऍना खूप हौशी आहे .मराठी सण खूप हौसेने साजरे करते .गणपतीचे दहा दिवस कोकणात राहून साजरे करते .पहिली काही वर्षे तिला भारतात राहण्याचा त्रास झाला .मग ह्याने जमेल तसे घर सजवायला सुरवात केली .आज कोकणच्या घरात सर्व सुख सुविधा आहेत.सर्व भाऊ आपापल्या परीने घरासाठी काहीतरी करीत असतात .मुले लहान असताना गणपतीसाठी तयार असायची पण मोठी झाली  तशी किटकीट करू लागली .मग एक दिवस त्यांना बाप काय चीज आहे दाखवून दिले .तेव्हा कुठे नरम पडली .च्यायला कोकणातल्या माणसाला मूर्ख समजतात की काय ही !!!. वाईट इतकेच वाटते की इथे कोणाशी मालवणीत बोलता येत नाही .पण भावाशी  बोलताना ही हौस भागवून घेतो .
यावर्षी नामदेवला सांगायचे इथे यायला .देवाने चांगली बुद्धी दिलीय त्याचा वापर इथे चांगला होईल .पण तोही देश सोडून यायला मागत नाही .शंकर ही तसाच राहिला .निदान या वर्षी तरी विन्याच्या लग्नाचे पक्के करू . इतक्यात विमानाची घोषणा झाली आणि अरविंद भानावर आला . समोर पाहिले तर ऍना त्याच्याकडे पाहत होती . तिच्या नजरेतले प्रेम पाहून सुखावला आणि मुलांच्या खांद्यावर हात टाकून विमानाकडे निघाला .
©श्री .किरण बोरकर

No comments:

Post a Comment