Thursday, September 28, 2017

आठवी माळ

आठवी माळ .....रंग ?????
"अरे ...!! हे काय "?? "तू पण रंगाच्या चक्रात अडकलीस का ".?? आजच्या रंगाचा ड्रेस घालून आलेल्या मधूकडे पाहत मी कौतुकाने म्हटले .
आमची मधू म्हणजे टॉमबॉय .हे असले साड्या नेसणे .ड्रेस घालणे तिला फार आवडत नव्हते . तशीही ती परदेशातच राहत होती .आता नवरात्रीला इथे आली होती.
"मी काय बाई नाही का "?? माझ्या पाठीवर थाप मारून लटक्या रागाने बोलली."खरे तर तुमच्यासोबत राहून राहून मी माझे बाईपण विसरूनच गेले होते .आणि नंतर परदेशात गेले .तिथे कुठेरे हे सर्व करायला मिळते .इथे संधी मिळतेय तर करून घेऊ हौसमौज " मधुचं हसत हसत रिप्लाय मिळाला .
इतक्यात बाजूच्या बिल्डिंगमधले अण्णा गेल्याची बातमी आली . म्हातारा म्हातारी दोघेच राहत होते .मुले बाहेरच असायची . चोवीस तास एक माणूस मदतीला ठेवला होता .आम्ही सर्व तेथे पोचलो .मधूही चांगलेच ओळखत होती त्यांना .तिथे गेल्यावर तीही आमच्याबरोबर कामाला लागली .नवरात्र आणि बऱ्याच घरी घट बसविले असल्यामुळे पुढे यायला फारसे कोणी तयार नव्हते . लांबच्या एक पुतण्याला सर्व काही करायचे अधिकार मुलांनी देऊन ठेवले होते . तोही हजर झाला.
सर्व तयारी झाली आता खांदा कोण देणार ??? आपल्या नात्यातला नाही म्हणून कोण पुढे यायला तयार नव्हते .शेवटी  कसेबसे  तीन नातेवाईक  तयार झाले .कोणी पुढे आला नाही तर मी जाईन असे मनात ठरविले .इतक्यात मधू अनपेक्षितपणे पुढे झाली.
"मी देते खांदा ?? असे तिने म्हणताच आम्ही हादरलोच .
"हे बघ भाऊ कोण खांदादेते हे आता महत्वाचे  नाही तर यांचे अंत्यसंस्कार होणे महत्वाचे आहे . माझ्या वडिलांच्या वेळीही अंत्यसंस्कार करायला तुम्ही मला पाठिंबा दिलात तसाच पाठिंबा द्या .काही दिवसांनी मी परत जाईन पण जाता जाता या परिस्थितीत अण्णा साठी काही करू शकले नाही ही चुटपुट नको"
मी अभिमानाने माझ्या मैत्रिणीकडे पाहिले . होय ती देवीच आहे .

© श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment