Wednesday, September 27, 2017

सातवी माळ

सातवी माळ .....रंग ??
तीन वर्षांपूर्वी ती जगातील सर्वात सुखी स्त्री होती .प्रत्येक सण हौसेने साजरा व्हायचा तिच्याकडे.पण एके दिवशी पतीचा अपघाती मृत्यू झाला आणि सगळे संपले . मुलीच्या भविष्यकाळासाठी जगणे हेच आयुष्याचे ध्येय ठरले.
सणासुदीला सजलेल्या नटलेल्या बायका पाहून जीव तुटायचा तिचा . कपाटतर साड्यानी भरले होते .पण कश्या नेसणार ?? आता नवरात्र उत्सव चालू झालेत.पेपरमध्ये आलेल्या सगळ्या रंगाच्या साड्या कपाटात आहेत .पण लोक काय म्हणतील ? वयात आलेली मुलगी काय म्हणेल ?? तिच्या मनाची घालमेल सुरू होती . सकाळी उठून सर्व तयारी झाली . सवयीने पेपरमध्ये आजचा रंग पहिला . म्हणजे चुकून  त्या रंगाची साडी नेसायला नको . वेगळ्याच रंगाची साडी बाहेर काढून ती आंघोळीला गेली .आंघोळ करून बाहेर येऊन बघते तर साडी गायब होती .असे कसे विचार करीत असतानाच मुलगी आत आली. तिच्या हातात आजच्या रंगाची साडी होती .काही न बोलता तिने तिच्या हाती दिली."आज ही साडी नेसून जा.मी तुझ्या पाठीशी आहे".असे बोलून मागे फिरली .होय ती देवीच आहे .

© श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment