Saturday, September 30, 2017

मुंबईकर

आता उद्यापासून परत मुंबईकर धावायला लागतील....
आणि.. सगळीकडे बातमी येईल.
बघा मुंबईकरांचे स्पिरिट....घंटा स्पिरिट !!! च्यायला... आम्हाला काय मज्जा येतेय धावत रेल्वे स्टेशन गाठायला?? .आहो ..त्या झोपलेल्या मुलांची पप्पीही घेता येत नाही.... .ती घेत बसलो तर पाच चाळीस सुटेल आणि नंतर पंधरा मिनिटे गाडी नाही . ...ती मिळाली की कंपनीची बस चुकणार मग ऑटोला पंचवीस रुपये म्हणजे पोरांची पप्पी पंचवीस रुपयाला पडली....नको !!!!..चौथी सीट मिळाली तरी चालेल पण ट्रेन चुकायला नको.
च्यायला पाच दिवस झाले तो रेल्वे ब्रिज बंद आहे .म्हणजे अजून धावले पाहिजे तरच प्लॅटफॉर्मवर वेळेवर पोचू ..
ओहो... सॉरी मॅडम चुकून धक्का लागला.डोळे वटारून नका हो पाहू ...खरे तर तुमच्यापेक्षाही सुंदर बायको आहे घरी पण घाईघाईत लागतो धक्का .... माफ करा. पण जाऊद्या ...हो ती बघा ट्रेन आलीय.
अरे देवा .....कितीही गर्दी ब्रिजवर .कमी व्हायची वाट बघत बसलो तर तीन ट्रेन सोडव्या लागतील ,म्हणजे लेट मार्क झालाच आणि साहेबांच्या शिव्या ...वर बोनसच . आमच्या साहेबांनी सगळेच ऑनलाइन केलेय .अंगठा दाबून हजेरी लावा ,त्यामुळे उशिराच अंगठा लागला की आपोआप पैसे कट ....पगारातून.
आमच्या विभागातील नगरसेवक ,आमदार, खासदारांना या ब्रिजवरून चालायला लावले पाहिजे एकदा .म्हणजे कळेल त्यांचा लाडका मतदार कसा प्रवास करतोय .
जाऊ दे बोलून काय उपयोग??...आता या गर्दीत तर घुसले पाहिजे नाहीतर डायरेक्ट हाफडेला जावे लागेल.
साला ....लोकांनापण मानले पाहिजे .माहितीय ह्या गर्दीत अडकलो तर जीवही जाईल पण तरीही घुसतात.मीही कोण वेगळा नाही म्हणा ...पोटासाठी हे ही करावे लागते.चला रोजच्यासारखे देवाचे नाव घ्या आणि घुसा या गर्दीत .
ओ.. मामा... जरा हळू .धक्के आता लागणारच इथे . तुमच्याकडे दुसरा काही पर्याय आहे का ???? ताई व्हा तुम्ही पुढे ,तुम्हालाच घाई आहे आम्ही तर फिरायलाच आलोय इथे .अरे!! अरे !!अरे!!.. हे कांय ती माणसे का धावतायत इथे तिथे देवा हे सर्व इथेच येतात ,आली अंगावर सर्व वादळासारखी ....नको नको ...माझी बॅग गेली खाली.आहो बायकोने सकाळी चार वाजता उठून डबा बनवून दिला आहे हो . कॅन्टीनचे खाणे झेपत नाही त्रास होतो तुम्हाला असे सारखे बोलत असते .आई ग!!..कोणीतरी हातावरच पाय ठेवला ...कोणी तोंडावर..नको नको.... सगळेच अंगावरून धावत जातायत . मीच का हो सापडलो यात.माझी काय चुकी आहे ??. दरवर्षी नेमाने इन्कम टॅक्स कापून घेतात . पास संपायच्या आधीच दुसरा पास काढतो . ट्रेन लेट झाली तरी काही बोलत नाही . ट्रॅकवर पाणी साचले तरी स्टेशनवर बसून राहतो . अजून काय करायला हवे मी ??? 
मग आज मीच का ???? मुलांची पप्पी घेत राहिलो असतो तर आज ही वेळ आली नसती हो ........

© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment