Tuesday, September 26, 2017

सहावी माळ

सहावी माळ ....रंग ???
हॉस्पिटलमध्ये आजच्या रंगाचा ड्रेस घालून शिरताना तिला कसेतरीच वाटत होते .पण एक निरस वृत्तीची डॉक्टर हा शिक्का तिला पुसून काढायचा होता . आपले काम प्रामाणिकपणे करणारी डॉक्टर म्हणून तिचा नावलौकिक होता.सतत कामाच्या गडबडीत असल्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष झाले होते .पण हल्ली नवरात्रात रोज रोज ठराविक रंगाचे कपडे घालून वावरणाऱ्या बायका पाहुन तिलाही आपण करावे असे वाटू लागले .मग त्या ड्रेसच्या रंगाचे मॅचिंग असे सगळेच घालावे लागले.
हॉस्पिटलमध्ये शिरताच स्टाफच्या आश्चर्य युक्त नजरा पाहून ती लाजून गेली .आज संपूर्ण हॉस्पिटलमध्ये हिचीच चर्चा होणार हे निश्चित. केबिनमध्ये बसून कॉफीचा पहिला घुटका घेतला आणि इमर्जन्सी आली . तशीच ती पळाली.
चार नंबर वार्डमधील पेशंटला अचानक प्रसूतीवेदना चालू झाल्या.असे कसे अचानक घडले ?? कुठे चुकलो आपण दिवस मोजायला ?? ती धावता धावता विचार करीत होती . घाईघाईने पेशंटकडे आली आणि पेशंटनेही त्याच रंगाचा गाऊन घातलेला पाहून त्यापरिस्थितही तिला हसू आले . पेशंट ही समजून गेली .पोटातल्या कळा दाबून ती म्हणाली "डॉक्टर तुम्ही सुद्धा "?? आणि गोड हसली. तिच्या हास्यानेच नवीन ऊर्जा निर्माण झाली . ताबडतोब ऑपरेशन थिएटर मध्ये घेतले .केस किचकट आहे हे तिच्या लक्षात आले .काहीही करून दोन्ही जीवाला वाचवायचे हाच निर्धार करून ती कामाला लागली . तीन तासांच्या अथक प्रयत्नाने पेशंट प्रसूत झाली . मुलगी झाली हो .....ती भान न राहवून ऑपरेशन थिएटर मध्येच ओरडली .बरोबरीचा स्टाफ ही आनंदाने तिच्याकडे पाहू लागला.
थोड्यावेळाने पेशंटच्या हाती आजच्या रंगाच्या मऊशार गोधडीत गुंडाळलेले तिचे बाळ देताना काहीतरी वेगळेच काही वाटत होते .होय ती देवीच आहे .

© श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment