Friday, September 8, 2017

इको फ्रेंडली

चौपाटीवर कचरा साफ करणाऱ्या निहारच्या मित्रांना पाहून अजय चमकला.तो वडिलांचे पिंड समुद्राला अर्पण करायला आला होता.चौपाटीवर बरीच कॉलेजची मुले गणपती विसर्जनानंतर झालेला कचरा साफ करण्यात गुंतली होती. न राहवून त्याने निहारच्या एका मित्राला हाक मारली .त्यांना बघताच तो धावत आला.
"काका निहार कुठेय ?? आला नाही तो साफसफाई करायला ?? आहो प्रोजेक्ट आहे हा .मार्क असतात.
ते ऐकून अजय आश्चर्यचकित झाला .प्रोजेक्ट असून हा  घरी कसा राहिला ??
"विचारतो घरी जाऊन "असे म्हणून तो निघाला .घरी निहार शांतपणे ड्रॉईग काढत बसला होता .
"काय रे ?? तुझे मित्र चौपाटी साफ करायला गेलेत आणि तू इथे बसला आहेस ?? प्रोजेक्ट आहे ना तो ?? उगाच मार्क्स कमी होतील .त्याने प्रश्नाची तोफ झाडली.
"नाही गेलो .मला पटत नाही"  तो शांतपणे उत्तराला.
"काय झाले साहेब ?? काय पटत नाही ?? अर्चनाने बाहेर येऊन विचारले .
"हेच ..! ज्या चूका आपण करतो त्याच निस्तरायला आपण जायचे ?मुळात माहीत असूनही चूक करायच्या का ?? निहारच्या या प्रश्नावर दोघेही गोंधळात पडले .
"काय म्हणायचे ते स्पष्ट बोल"अजय तिरसटला.
"पपा ..गणपतीचे विसर्जन दरवर्षी होते आणि दरवर्षी चौपाटी साफ करावी लागते .पण हे सर्व का घडते ?मुर्त्या वाहून का येतात ?.त्या विरघळत का नाहीत ?आपला गणपती पाण्यात विरघळला पाहिजे हा विचार का नाही करीत कोणी?? माफ करा आपण ही त्यातलेच .आपल्या बजेटमध्ये बसेल अशी मूर्ती आपण आणतो. पण ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळते का याचा विचार करतो का ?? बरे त्या बजेटमध्ये छोटी मूर्ती घ्यायला सांगितली की तुमच्या प्रथा ,परंपरा आड येतात .मूर्तीची उंची आता कमी करता येणार नाही .आज मी चौपाटी साफ करायला गेलो असतो आणि आपलीच मूर्ती माझ्या पायाखाली आली असती तर ?? इथे चौपाटी साफ करणार्यात किती मुले अशी आहेत ज्यांच्या घरच्या मुर्त्या पूर्ण पाण्यात विरगळल्या असतील?.आधी आपण आपल्यापासून सुरवात करायची आणि मग बाहेरचे पहायचे असे विचारवंत बोलतात .मी तुम्हाला मागच्या दोन वर्षापासून सांगतोय इको फ्रेंडली गणपती आणू .डेकोरेशन साधेच करू.. पण ते प्रदूषणमुक्त असेल .थर्माकोल ,प्लास्टिकचा वापर नाही करायचा .पण तुम्ही ते बजेटमध्ये बसत नाही म्हणून करत नाहीत .इतरजण काय म्हणतील ,याचा विचार करता .विसर्जनानंतर सर्व समुद्रात टाकून देता.ते प्लॅस्टिक ,थर्माकोल नष्ट होते का ?? आणि वर दुसऱ्या दिवशी मीच ते साफ करायला जातो .प्रत्येकाने पर्यावरणाचा विचार केला आणि पहिली सुरवात आपल्या घरापासून केली  तर चौपाटी स्वछ करायची गरजच भासणार नाही . शेवटी गणपतीची पूजा श्रद्धेने करणे महत्वाचे .चांगले चकचकीत डेकोरेशन ,उंच सुंदर मूर्ती महत्वाचे नाही .मला मार्क मिळाले नाही तरी चालतील पण मनाला पटत नाही ते काम मी करणार नाही .
निहारचे स्पष्टीकरण ऐकून अजय स्तब्ध झाला.त्याने वळून अर्चनाकडे पाहिले .तिनेही मान डोलावली.
"खरे आहे तुझे .जर असे सण घरातील सर्वांच्या मनाप्रमाणे साजरे होत नसतील तर त्यात बदल केले पाहिजे .आपण पुढच्या वर्षी नक्कीच विचार करू आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करू .निहारला मिठीत घेऊन अजय म्हणाला.
©श्री.किरण बोरकर

No comments:

Post a Comment