Thursday, September 21, 2017

माऊली

शनिवारी वातावरणच छान होते .अश्यावेळी विक्रम गाडी घेऊन घरी आला.
"भाऊ ..! चल जरा गावी चक्कर मारून येऊ.या पावसाने घराची काय वाट लावलीय ते बघून येऊ.च्यायला.!! दरवर्षी नवीन खर्च असतो घराला". विक्रम वैतागून म्हणाला.
मीही ताबडतोब तयार झालो.मस्तपैकी किशोरकुमार ऐकत आम्ही दोघे निघालो .पनवेलच्या पुढे आम्हाला एक बस पास झाली .त्या बसच्या एका खिडकीतून लहान मुलाने आमच्याकडे पाहून हात हलविला आणि गोड हसला .त्याच्या  निरागस हास्याने आम्हालाही हसविले .मग चालू झालाआमचा पाठलाग .कधी ती बस पुढे तर कधी आमची कार .हा खेळ फक्त आमच्या तिघातच चालू होता.मध्येच त्या मुलाच्या आईने काय चाललंय म्हणून मान काढून बाहेर बघितले .आमचा खेळ लक्षात येताच तीही हसली. मी मोबाइलवरून त्या मुलाचे फोटो काढले.मनात म्हटले किती छान आयुष्य आहे याचे .कसलेच दडपण नाही ,जबाबदारी नाही .आईवडिलांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकून चालायचे.
मध्येच एक धाब्यावर चहासाठी आम्ही कार थांबवली .तेव्हा ती बस फार पुढे निघून गेली .थोडावेळ आराम करून पोटपूजा करून आम्ही निघालो .काही अंतर जाताच आम्हाला एक वळणावर खूप गर्दी दिसून आली .मूळच्या स्वभावानुसार विक्रमने लगेच स्वतःची गाडी एक कोपऱ्यात लावली आणि धावत गर्दीच्या ठिकाणी निघाला .मीही आरामात त्याच्या मागे गेलो .जवळ जावून पाहिले तर आमच्या पुढे गेलेली बस उलटी झाली होती .गाडीतून आक्रोश चालू होता .विक्रम तर कधीच बसजवळ पोचला होता .त्याने मदतकार्य चालूही केले होते . याबाबतीत फारच ऍक्टिव्ह होता तो.मीही पुढे जाऊन जखमींना मदत करू लागलो.
इतक्यात एक स्त्रीच्या किंकाळ्या ऐकू आला "माझा मुलगा कुठे आहे ??माझा सोनू कुठे गेला ?? पाहिले तर त्या मुलाची आई मोठमोठ्याने आक्रोश करीत होती .आम्हा दोघांनाही धडकी भरली .एकाच शंकेने आम्ही  एकमेकांकडे पाहिले .पटकन विक्रमने निर्णय घेतला", भाऊ तू तिथे बघ.मी इथे खाली उतरतो.एका क्षणात आम्ही दूर झालो आनि त्या छोट्याला शोधू लागलो.शोधताना सारखा त्याचा हसरा आम्हाला पाहून हात हलविणारा चेहरा नजरेसमोर येत होता .त्याची आई तर धाय मोकलून रडत होती.
अचानक लोकांचा गलका कानी आला.सापडला....!! सापडला...!! पाहतो तर काय..? विक्रम त्याला उचलून आणत होता . त्याचा चेहरा पाहून माझ्या छातीत धस्स झाले .विक्रमच्या हातात त्याला निपचित पडलेले पाहून त्या माऊलीची अवस्था अजून बिकट झाली .विक्रमच्या हातातून त्याला खेचून घेऊन ति त्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करू लागली .आम्हाला क्षणभर काही सुचेना .विक्रमने त्याला शुद्धीवर आणायचे प्रयत्न चालू केले .तिचे रडणे आता वाढू लागले.सगळे संपले की काय ?? अचानक त्या मुलाने खोकत खोकत डोळे उघडले .त्याच क्षणी त्याच्या आईचे रडणे थांबले .धक्का बसल्यागत तिने त्याच्याकडे पाहिले .आणि पुन्हा एकदा मोठ्याने हंबरठा फोडत तिने त्याला कुशीत गेले.यावेळीही अश्रू तेच होते फक्त भावना बदलल्या होत्या.दुःखाची जागा आनंदाने घेतली होती .एक क्षणात सर्व वातावरण बदलले होते.
मी खिशातून मोबाइल काढला आणि त्या क्षणाचे चित्रीकरण करू लागलो .तितक्यात विक्रमने माझ्या हातून मोबाईल काढून घेतला.
"नको भाऊ.. त्या माऊलीचे चेहऱ्यावरील भाव कॅमेरात कैद करू नकोस .ते डोळ्यात साठव .ते अनुभव .अरे भाग्यवान आहोत आपण म्हणून जगातील सर्वात आनंदी स्त्री बघतोय आज.आपण कल्पनाच करू शकत नाही.. ती काय अनुभवतेय आज.आपण तिचा हा आनंद जगजाहीर करू शकत नाही".
मी हसून मान डोलावली आणि हळूच विक्रमच्या डोळ्यातील अश्रू पुसले."THIS IS THE LIFE " असे म्हणत विक्रमने माझ्या खांद्यावर हात टाकला आणि कारच्या दिशेने वळला .
© श्री. किरण बोरकर

No comments:

Post a Comment