Sunday, December 15, 2019

आंतरराष्ट्रीय चहा दिवस 2019

आंतरराष्ट्रीय चहा दिवस 2019
"पप्पा.... आज इंटरनॅशनल चहा डे आहे.लेट्स सेलिब्रेट .....!! आज आपण बाहेर चहा पिवूया..."तिने मोठ्या आवाजात ऑर्डर सोडली आणि पप्पांच्या कपाळावर आठ्या आल्या.
"हे ...कॉलेजला जायला लागल्यापासून बाहेर खाण्याची सवय फारच लागलीय तुला. बापाकडे काही पैश्याचे झाडं नाही आहे ..."त्याने नेहमीचे वाक्य फेकले. इतरांनी नेहमीप्रमाणे ऐकून न ऐकल्यासारखे  केले आणि ताबडतोब तयारी करायला पळाले. 
नाहीतरी अशी संधी फारच क्वचित मिळत असे .हीचा बाप तसे पैसे जपून वापरणारा. नशीब मुली हुशार म्हणून एकीला मेरिटवर इंजिनियरिंगला ऍडमिशन मिळाले होते तर मोठीने हुषारीवरच मॅनेजमेंट केले होते . आईतर ते देतील त्या पैशात घर चालवीत होती.
 बापाचे मत बदलू नये म्हणून सर्व पटापट तयार झाले . पण आज तो मूडमध्ये आलेला होता.कधी नव्हे ते त्याने चौपाटीवर सगळ्यांना भेळपुरी दिली जबरदस्तीने पाणीपुरीही खाऊ घातली.मग काही वेळ बसून परत निघाले.
"पप्पा चहा राहिलाय....." तिने आठवण करून दिली.
"हो माहितीय ...पण आज स्पेशल ठिकाणी चहा देतो..."असे म्हणून तो एका गल्लीतील चहाच्या टपरीजवळ घेऊन गेला. नेहमीप्रमाणे टपरीवर गर्दी होतीच .पण थोडयावेळाने एक टेबल रिकामे झाले आणि याना बसायला जागा मिळाली.
"शी...!!. हे काय पप्पा...?? कुठल्या ठिकाणी आणलात आम्हाला. ही काय चहा पिण्याची जागा आहे का ...."?? ती संतापून म्हणाली.
" अरे पिऊन तर बघा ...नाही आवडला तर दुसरीकडे घेऊ ...छान चहा असतो इथे ...".पप्पा हसत म्हणाले. 
इतक्यात तो हातात फडके घेऊन त्यांच्यासमोर उभा राहिला . साधारण तिच्याच वयाचा होता तो. डोळ्यात न पाहता खाली मान घालून त्याने टेबल पुसले आणि मान खाली घालून विचारले " साहेब काय आणू ...??? 
"अरे चार कटिंग दे मस्त ...स्पेशल .. " त्याने हसत ऑर्डर दिली.
तीही त्याला पाहून शांत झाली.कदाचित आपल्याच वयाचा तरुण म्हणून असेल.काही वेळाने तो वाफळलेले  चार चहाचे ग्लास घेऊन आला .प्रत्येकाच्या पुढ्यात ग्लास ठेवताना त्याची नजर खालीच होती. 
"अजून काही...."?? तो पुन्हा खाली मान घालून पुटपुटला.
त्या तिघीनीही नकारार्थी मान हलवली.चहा संपताच तो ग्लास उचलायला पुढे झाला आणि घाईत बाजूचा पाण्याचा ग्लास तिच्या आईच्या अंगावर सांडला.
"अरे.. अक्कल आहे का ...?? आई संतापून ओरडली . मोठ्या बहिणीने ही तिची रि ओढली.
"अग जाऊ दे ...आज त्यांचा मान आहे.आंतराष्ट्रीय चहा दिवस आहे ना .. .."पप्पा तिच्याकडे पाहत म्हणाले.
 तिची नजर खाली गेली.
" काही नाही झाले रे .. हे घे पैसे .. जा तू ...त्यांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि जायची परवानगी दिली.
" पप्पा उरलेले पैसे ....?? मोठीने विचारले.
" टीप दिली त्याला. तुमच्या मोठ्या हॉटेलात दरवाजा उघडणार्यालाही टीप देतात ना ..?? मग ह्याने तर मेहनत केलीय . त्याला नको टीप ...?? पप्पांनी नजर रोखून विचारले . काही न बोलता त्या उठल्या.
दुसऱ्या दिवशी ती कॉलेजमध्ये  बाईक पार्क करताना तो तिच्या समोर आला . दोघेही एकमेकांना पाहून थांबले . तो तिच्याकडे पाहून कसानुसा हसला आणि पुन्हा मान खाली घालून चालू लागला.
ती त्याच्यासमोर आली.
" कालच्या घटनेबद्दल सॉरी... मला माहित नव्हते तू तिथे काम करतो.."
तो चपापला.
" सॉरी कशाला ....?? असे बऱ्याचवेळा घडते. मला सवय आहे त्याची. चला निघुया लेक्चर सुरू होईल.."आणि पुढे चालू पडला.
संध्याकाळी ती त्याचा विचार करीतच घरी आली . पप्पा आरामात टीव्ही पाहत बसले होते.
तिचा चेहरा पाहूनच ते म्हणाले. "भेटला का तो ...?? सॉरी म्हटलेस का त्याला ..."??? 
तिने आश्चर्यचकित होऊन पप्पांकडे पाहिले.
"तुम्ही ओळखता त्याला ...?? तुम्हाला माहीत होते तो माझ्याच कॉलेजात शिकतोय .तरीही काल तुम्ही मुद्दाम आम्हाला तिथे घेऊन गेलात...."ती चिडून म्हणाली .
"होय.. मला माहित आहे तो तुझ्याच वर्गात शिकतोय . मी बऱ्याचवेळा तिथे जाऊन चहा पितो.मला त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे .आणि हो ...हा तुझा बाप एके काळी त्याच टपरीवर लोकांच्या शिव्या खात चहा पाणी देत टेबल पुसत होता.
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment