Tuesday, December 31, 2019

त्यांचेही थर्टीफस्ट...३

त्यांचेही थर्टीफस्ट...३
" ए सुनबाई.... मला जाऊ दे आत. मी नंबर लावलाय..." बाथरूममध्ये घाईघाईने शिरणाऱ्या तिला पाहत सासूबाई म्हणाल्या.
"आहो सासूबाई.... आज लवकर जायचे आहे हो .. वर्षाचा शेवटचा दिवस आहे खूप कामे असतील आज" सुनबाई अजीजीने म्हणाली .
"हो का ....!! मग लवकर उठायचे  आणि मलाही साहेबांनी लवकर बोलावले आहे . त्यांच्याकडे ही थर्टीफस्ट आहे ...."सासूबाई ठसक्यात म्हणाल्या.
"हे बघा.... आजच्या दिवशी तरी तुमच्याशी भांडायची इच्छा नाही माझी .जा तुम्ही ....पण लवकर आटपा. पाहिजे तर तुमची इथली कामे मी करते ..." सून म्हणाली 
"काही गरज नाही..... .तुझ्या हातून काही करून घेण्याची वेळ नाही आली अजून .माझ्या मुलाला खाल्लास ते पुरे ....ती चिडून म्हणाली. 
"आणि तुम्ही काय तुमच्या नवऱ्याची पूजा केली का ....??? त्याने तर कंटाळून जीव दिला..."  सूनही काही कमी नव्हती.
"तर... तर... संधी मिळाली की तोंड सुटते तुझे . सासूचा जरा मान नाही ठेवत ...."सासूने थोडी माघार घेतली.
"सासूही त्या लायकीची हवी ....."अस बोलून सून पुढच्या तयारीला लागली. 
तर वाचकहो ... हे काही आजचे नाही गेली अनेक वर्षे हे भांडण रोज चालू आहे. सासू सून दोघीही विधवा . एका छोट्याश्या खोलीत त्यांचे आयुष्य असेच चालले आहे . सुनेच्या सासऱ्याने आयुष्याशी हार मानून आत्महत्या केली. तर सासूच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. हिला पळवून आणलेली.. म्हणून सासूचा राग.
 सून ही काही कमी नव्हती . दोघेही आपापली कामे करायच्या . एका छोट्या खोलीत राहून वेगळा संसार . आतापर्यंत भावाभावात वेगळी चूल मांडलेली पाहत होतो पण इथे तर सासू सुनेत वेगळी चूल होती.
असो .... सासू एका श्रीमंतांच्या घरी काम करीत होती तर सून एका छोट्या ऑफिसात साफसफाईचे काम . आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून दोघींच्या कामावर गडबड . दोघीही कामावर जाताच झाले गेले विसरून कामात बुडून गेल्या . दोन्ही ठिकाणी पार्टीची धूमधमाल चालू होती .  बघता बघता संध्याकाळ कधी झाली ते कळलेच नाही .
संध्याकाळी दोघीही उशिराच घरी आल्या . आल्या आल्याचं सासूने गॅस पेटवून भात ठेवायला घेतला . 
"काय सासूबाई आजही उपाशी ....??  हे भोग असतात पूर्वाश्रमीचे भोगावेच लागतात ...." सून कुत्सितपणे म्हणाली .
  "तू जेवलीस ना पोटभर.....पूर्वी नक्कीच पुण्य केले असशील ......" सासूने उलट प्रहार केला .
सून हळूच उठली आपल्या पर्समधून प्लास्टिकचा डबा काढून तिच्या हातात दिला . उघडून पाहिले तर त्यात चिकन बिर्याणी होती . 
"तुम्हाला आवडते ना....म्हणून आठवणीने तुमच्यासाठी आणली. खाऊन घ्या पोटभर . माझे झालेय तिथे..."
भारावलेल्या हातानी तिने तो डबा घेतला आणि काही न बोलता कोपऱ्यात बसून शांतपणे जेवू लागली . 
"अग  जाऊया ना पार्कात ...?? शेजारची तरुणी सुनबाईला विचारायला आली .
"हो .. चल तयारी करू ...असे म्हणत सुनबाई तयारीला लागली .
ते ऐकून सासूबाई हळूच उठली .आपल्या बॅगेतून एक छानसा नवीन डिझाइनचा गाऊन काढून सुनेच्या हाती दिला.
" साहेबांनी जेवण दिले नाही ग... पण मालकीणबाईने आपल्या मुलीचा गाऊन तुझ्यासाठी दिला .अग.. नवीनच आहे हा. ख्रिसमसच्या दिवशी वापरला फक्त . तू त्या दिवशी फोनवर कोणाला तरी सांगत होतीस ना एक डिझाईनर गाऊन घ्यायची इच्छा आहे .म्हणून तुझ्यासाठी मागून आणला.हा घालून जा आज .."सासू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाली .
काही न बोलता सुनेने गाऊन हातात घेतला . दोघींचे डोळे भरून आले होते.
"हॅपी न्यू इयर आई ...."ती म्हणाली.
"आई नको ग .. नाहीतर आपले भांडणच संपून जाईल. त्याच एका गोष्टीवर संसाराचा हा गाडा हाकतोय आपण . आजची रात्र मजा कर . उद्या आहेच की आपण भांडायला .. हॅप्पी न्यू इयर ...
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment