Thursday, December 26, 2019

वासुदेव

वासुदेव 
त्या अनाथाश्रमात ख्रिसमस निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून सुपरस्टार विनयकुमारला आमंत्रित करण्यात आले होते. खरे तर विनयकुमारचे नाव ऐकून बऱ्याचजणांच्या भुवया  आश्चर्याने उंचावल्या होत्या.कारण विनयकुमार आणि समाजकार्य यांचा संबंध असेल हे बर्याचजणाना मान्य नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची क्रेझ हळू हळू कमी होत चालली होती.आता तो आपल्या कुटुंबसमावेतच जास्त वेळ घालवीत होता.कदाचित त्यामुळेच त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावले असेल.
त्याने आपल्या कुटुंबासह प्रवेश केला तेव्हा एका हॉलमध्ये सर्व मुले शांतपणे बसून होती.संचालकांनी कार्यक्रमास सुरुवात केली.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम चालू होते.मध्येच संचालकांनी त्याला सांताक्लोज बनायची विनंती केली. त्यानेही हसत ती स्वीकारली आणि काही क्षणात तो सांताक्लोज बनून हजर झाला. आपल्या अंगभूत अभिनयाच्या जोरावर त्याने सांताक्लोज जिवंत केला . खांद्यावरच्या पोतडीतून अनेक गिफ्ट्स काढून मुलांना वाटल्या .मुलांनीही सांताक्लोजबरोबर भरपूर गंमत केली .शेवटी समारोपाचे भाषण सुरू झाले . संचालकांनी विनयकुमारचे आभार मानले आणि मुलांना  उद्देशून म्हणाले "सांताक्लोज सारखे अनेकजण या जगात आहेत.सांताक्लोज प्रत्येक धर्मात आहे फक्त त्याची रूपे वेगवेगळी आहेत . त्या त्या धर्माच्या रितिरिवाजनुसार परंपरेनुसार आणि संस्कृतीनुसार तो वागतो .आपल्याकडे ही एक सांताक्लोज रोज येतो.."सगळी मुले शांत झाली..मग कुठेय...?? कोण..?? असा एकदम गल्ला झाला . सगळे आमंत्रिक प्रेक्षक अचंब्याने पाहू लागले.
" होय.... फक्त त्याची वेशभूषा चेहरा वेगळा असतो . आपण त्याला वासुदेव म्हणतो .आजही तो आश्रमाच्या दारात ठेवलेल्या दोन डब्यात गहू आणि तांदूळ ठेवून जातो . भले ते आपल्यासाठी फार कमी असतील पण त्याची देण्याची वृत्ती आहे तिला आपण सलाम केले पाहिजे....सर्वांनी त्या वासुदेवासाठी टाळ्या वाजवा.प्रेक्षकात टाळ्यांचा कडकडाट झाला. विनयकुमारने ही खुल्या मनाने दाद दिली . आजचा दिवस त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरला होता .
भल्या पहाटे तो नेहमीप्रमाणे अलगद उठला . इतरांची झोपमोड होऊ नये याची काळजी घेत स्वतःचे आवरून बाहेर पडला . रस्त्यावरच्या एका बंद दुकानाआड त्याने कपडे बदलले .काही क्षणातच मेकअप करून वासुदेव बनून बाहेर पडला . ठरल्याप्रमाणे त्याने एक दिशा पकडली आणि गाणे गात गल्लीबोळातून फिरू लागला . उंच सोसायटीमध्ये तो कधीच जात नसे पण चाळीमध्ये आणि बैठ्या झोपडपट्टीमधून फिरत असे . शाळेत जाणारी लहान मुले कुतूहलाने त्याच्याकडे पाहत.. काही त्याला हात लावून पाहित ...तर काही प्रश्न विचारीत.बर्याचजणी त्याची पूजा करत आणि त्याच्या झोळीत एक वाटी तांदूळ किंवा गहू टाकीत. गहू आणि तांदूळ या दोनच गोष्टी तो घेत होता. पैसे आणि शिळ्या अन्नाला तो पाया पडून नकार देत असे.त्याच्या मुखातून शुद्ध आणि स्पष्ट भाषेतील ओव्या ऐकून सगळेच खुश होत.शेवटी मिळालेली भिक्षा ठरलेल्या अनाथाश्रमच्या दरवाज्याजवळ ठेवून तो घरी परतला.घरी अजूनही शांतता होती .पत्नी नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. त्याला पाहतच ती हसली.आज घाई करू नका .आताच डायरेक्टरचा फोन आला होता आजचे शेड्युल दोन तास पुढे गेले आहे त्यामुळे आरामात शूटिंगला  या ... आणि हसत हसत विनयकुमारच्या मिठीत शिरली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment