Tuesday, December 31, 2019

त्यांचे ही थर्टीफस्ट....२

त्यांचे ही थर्टीफस्ट ....२
" आज जायचे का बाहेर ....??  31 डिसेंबर साजरे करायला ...?. नवीन वर्षाचे स्वागत बाहेरच करू .."तिच्या हातात गोळ्या ठेवत  ते म्हणाले.
"तुमचे आपले काहीतरीच ..... ती गोळ्या तोंडात टाकीत पाण्याचा घोट घेत म्हणाली ."आता हे काय वय आहे का आपले...?? अर्धी लाकडे स्मशानात गेली आपली . त्यात मी ही अशी आजारी . त्यापेक्षा तुम्हीच घरी बाटली आणून प्या.. हवी तेव्हडी .. .." तिने हसत हसत बॉम्ब टाकला.
"गेले ग ते दिवस...आता नाही होत.." तो जुन्या आठवणीत रमत म्हणाला.
"का ....?? आता माझी अडचण होतेय ..?? तिने डोळे मिचकावत विचारले.
" काहीतरी बोलू नकोस. कसली अडचण ....?? आपण दोघेच एकमेकांसाठी .."तो डोळे वटारत म्हणाला .
"हो.. हो.. माहितीय.. तरुणपणी कधी उचलून घेतले नाही  म्हणून आता उचलून फिरवावे लागतेय..."डोळ्यातील पाणी पुसत ती  म्हणाली.
"अरे ते कधी कधीच ..तुझ्या मुलाने चांगल्या मेड ठेवल्या आहेत तुझ्यासाठी.परदेशी राहत असला तरी लक्ष आहे आपल्याकडे . चोवीस तास आपल्यासाठी माणसे ठेवली आहेत त्याने..."तो हसत हसत म्हणाला .
"हो ना...किती लक्ष आहे त्याचे आपल्याकडे .. दर पंधरा दिवसांनी डॉक्टर काय ...?? औषधे वेळच्यावेळी दारात . पूर्वी मी हिंडत फिरत होते तेव्हा दर सहा महिन्यांनी एखाद्या टूरमधून फिरायला पाठवायचा...". ती आठवणीत हरवून गेली .
"आणि बेडवर पडल्यावर चोविस तास बाईही उशाला ठेवली ....."त्याने डोळे मिचकवले .
"तुमचे आपले काहीतरीच.... गेले चार दिवस ती बाई आली नाही . तुम्हालाच करावे लागतेय माझे .." ती चिडून म्हणाली . 
"मग असे कुठे लिहिलंय का ...?? नवऱ्याने आजारी बायकोची सेवा करू नये म्हणून... तो चिडून म्हणाला 
"मान्य.... पण काल उचलताना कंबर दुखली ते जाणवले हो मला .." तिच्या नजरेत काळजी होती .
"ते सोड... चल आज पार्टी करू . बऱ्याच दिवसांनी वाईन आणलीय मी . फ्रीजमध्ये ठेवलीय . थांब आणतो..." असे बोलून तो आत गेला . थोड्या वेळाने थंडगार वाईनचे दोन ग्लास घेऊन आला .  
"नववर्ष आपल्या आयुष्यात सुख समाधान घेऊन येवो....". असे म्हणत त्याने तिच्या हातात ग्लास देऊन चियर्स केले.तिनेही हसून दाद दिली आणि भला मोठा घोट घेतला . एकमेकांकडे पाहत हसत त्यांनी ग्लास रिकामे केले .
थोड्याच वेळात ती गाढ झोपी गेली .त्याने शांतपणे उठून तिची नाडी पहिली.ती मेलीय असे वाटतच नव्हते. खिन्नपणे हसत त्याने खिशातून एक पुडी काढून त्यातील पावडर ग्लासात रिकामी केली . ग्लास वाईनने पूर्ण भरला.मग खिशातून मोबाईल काढून त्यातील मेसेज मोठ्याने वाचू लागला.
"आज सकाळीच कॅनडा येथे हायवेवर झालेल्या अपघातात तुमच्या मुलाचे दुःखद निधन झाले आहे . शव ताब्यात घेण्यासाठी लवकरच तुम्हाला बोलाविण्यात येईल"
.खिन्नपणे तिच्या शवाकडे पाहत त्याने चियर्स केले आणि एका दमात ग्लास रिकामा केला.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment