Sunday, December 22, 2019

मालिका आणि सोहळे

मालिका आणि सोहळे
संतोष दिघेला दारात उभे राहिलेले पाहून माझे वाईट दिवस चालू झाले याची खात्री पटली.हे भोग असतात.....आणि ते याच जन्मात भोगावे लागतात.... असे सौ. नेहमी म्हणते.पण ती सहानुभूतीने  म्हणते की उपहासाने..... हे अजून मला कळले नाही.
त्यातच  तिने आज कांदाभज्या केल्या होत्या. महाग झालेल्या वस्तूच नेमक्या आमच्याकडे कश्या वापरल्या जातात हे मला न सुटलेले अजून एक कोडे. अर्थात अजून कोणतेही कोडे मला सुटलेले नाही .सोने महाग होते तेव्हा ही नेमकी सोन्याची खरेदी करते. त्यातही  तिने नेमक्या सहा कांदाभजी बनविल्या.तीन तिला तीन मला.समान हक्काची ती कट्टर पुरस्कर्ती आहे. 
आता याने दारात उभे राहून....."भाऊ..." म्हणून बोंब मारली तेव्हा एक भजी खाऊन झाली होती. पण त्याची हाक ऐकताच उरलेल्या दोन्ही भज्या तोंडात कोंबायचा प्रयत्न केला पण जमले नाही . शेवटी एक भजी डिशमध्ये राहिलीच .
"अरे वा भाऊ ... तू तर श्रीमंत माणूस आहे .. हसत हसत त्याने ती भजी तोंडात टाकली  आणि स्वयंपाकघरातून एक भांडे पडल्याचा आवाज आला . पण ह्याने तिकडे लक्ष न देता माझ्या शेजारीच बैठक मारली .
"कामाचे बोल दिघ्या ....." मी पटकन मुद्द्याला हात घातला.
"किती रे घाई करशील ...?? कामासाठीच आलोय.उगाच फालतू गप्पा मारायला मला वेळ नाही" तो कपाळावर आठ्या आणीत म्हणाला 
"सोड रे .....तू किती बिझी ते माहितीय मला .. चौपाटीवर त्या भिंतीला चिकटून बसणाऱ्या जोडप्यांचे निरीक्षण करण्यात खूप वेळ जातो तुझा .."मी छद्मीपणे हसत म्हणालो.
"ठीक आहे .... तो आत पाहत  डोळे मोठे करून म्हणाला ."मला सांग.... सोसायटीत कोणी सिरीयस बाई आहे का सध्या ...?? म्हातारी ..वय झालेली ...?? तो हळूच माझ्या कानाजवळ येत म्हणाला 
मी चमकलो... 
"नवीन सिरीयल आलीय का तुझ्याकडे ..??
 संतोष दिघे बऱ्याच मराठी मालिकांचे लिखाण करतो असे मी ऐकून होतो . कधी त्याचे नाव कोणत्याही सिरियलमध्ये दिसले नाही हा भाग वेगळा.... पण तो लिहीत असतो हे मान्य होते आम्हाला....
"अरे नाही रे ... जुनीच सिरीयल आहे.त्यातूनच नवीन कथानक काढून ती वाढवायची आहे .. संतोष सहज म्हणाला . 
"म्हणून सिरीयस असलेली म्हातारी बाई .....?? मी आश्चर्याने विचारले .
"हो रे ....आता एका सिरीयलमध्ये नायक नायिकेचे लग्न होणार आहे त्यात बरेच भाग झाले आता लग्नावर तीनचार भाग होतील मग हनिमूनवर दहा बारा त्यानंतर सिरीयल गुंडाळावी लागेल पण मध्येच एखादा ट्विस्ट असावा असे निर्मात्याचे म्हणणे . जेणेकरून लग्न लांबेल आणि सिरीयलचा टीआरपी ही कायम राहील ..
"किती दिवस लांबेल लग्न ...."?? मी विचारले .
"अरे वर्षभर लांबले तरी चालेल.शंभर एक भाग होतील असा ट्विस्ट हवा ..."संतोष सहज म्हणाला .
"त्यासाठी तुला सिरीयस म्हातारी का पाहिजे ..."?? मी विचारले 
"अरे त्या म्हातारीला नायिकेची आई म्हणून आणायचे . मग ती तिची सेवा करणार ..काळजी घेणार .. संतोषकडे उत्तर तयार असतात .
"पण त्या नायिकेला आई नाही आहे ना...?? फक्त भाऊच आहे ...?? सौ अचानक आतून येत म्हणाली . 
तिच्या हातात चहा आणि एक कांदा भजी पाहून मला भीती वाटू लागली .
 "आहे .....आई जिवंत आहे  हे तिला आज कळले . त्या वर चार पाच भाग आरामात जातील .नंतर ती तिची सेवा करेल . तिला भेटायला नातेवाईक येतील खलनायिका येतील ,तुम्ही दोघेसुद्धा येऊ शकता.ती दोन वेळा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईल.मग तिथे नायिकेवर भलते सलते आरोप होतील . त्यात दहा बारा भाग जातील. नायिकेला ही आपली आई  आहे हे सिद्ध करण्यासाठी धावपळ ....पुरावे गोळा करण्यासाठी फिरणे... यात पुन्हा पंधरा वीस भाग जातील. मध्येच हिरोबरोबर कॉफीशॉप मध्ये बसून भविष्याच्या चिंता ...स्वप्न पाहणे आश्वासन देणे तू किती काळजी घेतोस अश्या गप्पा . त्यात तीन चार एपिसोड जातील...."संतोष सहज डोळ्यासमोर घडल्यासारखे म्हणत होता .
"अरे मग तुला का सिरीयस म्हातारी प्रत्यक्षात बघायची  आहे ...?? तशी ही विलास चव्हाणची आई सिरीयस आहे गेले तीन दिवस ... रोज नातेवाईक बघून जातायत तिला ... चल जाऊ तिला बघायला..." मी उठत म्हणालो .
"अरे भाऊ.... बघायला जायची काहीही गरज नाही . तीन दिवस झाले ती सिरीयस आहे असे तू म्हणतोस.. म्हणजे गेले बहात्तर तास तिच्या घरचे टेन्शनमध्ये आहेत . बघ विचार कर ..किती एपिसोड झाले .अरे आपल्याला तिच्या मरणाचा सोहळा करायचा आहे .  आणि त्याचीच माहिती घ्यायला तुझ्याकडे आलोय .." संतोष हातावर टाळी देत म्हणाला .
"काय....??? मरणाचा सोहळा ... दिघ्या वेडा झालास का तू ....??  मी संतापून म्हणालो . सौनेही रागाने त्याच्या हातातून कप खेचून घेतला पण नंतर त्यात अर्धा चहा शिल्लक असलेला पाहून परत दिला.
"हे तुमचे मित्र ....."?? रागाने माझ्याकडे पाहत ती धुसफूसली 
"का ....?? का ...?? लग्नाचे सोहळे होतात .. लग्नाच्या तयारीवर हवे तितके एपिसोड बनतात मग मरणावर का नाही .... निदान पन्नास भाग तरी झाले पाहिजे...."कपातील चहा एक घोटात गिळत संतोष म्हणाला .
"भाऊ विचार कर .....तू बघतोयस रोज कोणीतरी तिला भेटायला येतात .मग एकत्र बसून म्हातारीचे गुणगान गातात . तिच्या तरुणपणीची चर्चा करतात . तिची चांगली वाईट कामे आठवतात. विचार कर भाऊ..... तिचा पूर्ण भूतकाळ आठवला जातो . उद्या ती मरताना तिच्याजवळ कोण असेल ..  तिला पाणी कोण कोण पाजेल . तिची अंत्ययात्रा कशी निघेल यावर लक्ष ठेव . तिच्या मृत्यूनंतर  वाद होतील का ..?? अग्नी कोण देईल..खांदा कोण देईल...तिच्या प्रॉपर्टीचे काय ...??  यावरून वाद होतील का...??  यावर लक्ष ठेव .. अरे प्रत्येक गोष्टीवर पाच सहा भाग बनवू आपण .. नाही त्या नायक नायिकेचे लग्न पुढच्या वर्षात केले तर नाव नाही लावणार दिघ्यांचे..'.संतोष आवेशात म्हणाला .. 
"तसेही या दिघ्यानी काय दिवे लावलेत ...."?? मी मनात म्हणालो .
"पण मरणावर पन्नास एपिसोड म्हणजे जास्त वाटत नाही का ...?? मी खालच्या आवाजात विचारले 
" पन्नास कमीच आहेत नुसत्या रडण्यावर चार एपिसोड करतो बघ . तुला ती  फेसम सिरीयल माहीत नाही का ..सासू सुनेची .. ज्या दिवशी नायिका गरोदर आहे असे कळते त्याच दिवशी आमच्या विशालच्या बायकोचाही रिपोर्ट आला .
 हा विशाल म्हणजे संतोषचा लहान भाऊ 
"बरे मग .... मी उत्सुकता दाखवली 
 विशालची बायको दुसऱ्या दिवशी गपचूप कामावर गेली पण त्या सिरीयलमध्ये तीन एपिसोड हीच गोष्ट चालू होती  आणि  विशालचा मुलगा नर्सरीत गेला त्याच दिवशी त्या नायिकेला मूल झालं....विचार कर बाळांतपणावर किती एपिसोड गेले आणि मी कोणाच्या मृत्यूवर पन्नास एपिसोड लिहू नये ...?? चेहऱ्यावर आगतिकता आणून संतोष म्हणाला.
"मग मी नक्की काय करावे ...."?? मी मुद्द्यावर आलो .
"खरे तर मी काही दिवस इथे राहून म्हातारीकडे लक्ष ठेवावे  असा विचार करत होतो..." संतोष असे म्हणताच आतून तीन चार भांडी जोरात पडली आणि माझा चेहरा पाहून तो पटकन म्हणाला .."पण मला बरीच कामे आहेत तेव्हा  रोज तूच मला फोनवरून  प्रत्येक गोष्ट सांग.... त्यावरून एपिसोड लिहायची जबाबदारी माझी.
संतोषला घरात ठेवून घेण्यापेक्षा हे काम कितीतरी सोपे होते . शेवटी कोणत्याही कारणाने का होईना एका मोठ्या सिरियलच्या कामात माझा अप्रत्यक्षपणे सहभाग झाला होता . नव्हे.... तर संतोष दिघेने त्याच्या मर्जीनुसार करून घेतला होता . 
आता फक्त म्हातारीच्या घरात काय घडतंय याकडे लक्ष ठेवायचे होते.
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment