Monday, February 10, 2020

आमचा व्हॅलेंटाईन डे

आमचा व्हॅलेंटाईन डे
मला अचानक समोर आलेले पाहून बंड्या चपापला.हातातील वस्तू मागे लपविण्याचा प्रयत्न करू लागला.
मी नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो होतो.पण बंड्याला पाहून हाक मारली " अरे काय लपवतोय मागे .....?? बघू.. बघू... ?? 
बंड्याने लाजून हातातील पॅकेट पुढे केले.गुलाबी रंगाच्या पेपरमध्ये एक चौकोनी बॉक्स होती. हळूच मान खाली घालून म्हणाला "गिफ्ट आहे मैत्रिणीसाठी.. व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय ना... "?? मी हसून मान डोलावली "वा छान...!! आणि त्यात लाजयचे काय एव्हडे .मित्र तशी मैत्रीण ...."आणि पुढे निघालो . 
बंड्या माझ्यासोबत चालू लागला " भाऊ ...तुम्ही कधी साजरा केलाय का व्हॅलेंटाइन डे ...?? 
मी हसलो " का रे .....??  अरे बाबा ....एकेकाळी मीही तरुण होतो .खूप मजा केली तेव्हा ...."
"आता नाही करत का....??? आता वाहिनीवर प्रेम कमी झाले का....??  बंड्याने हसून विचारले.
"  बंड्या ....ज्याचे आपल्या माणसावर प्रेम असते त्यांच्यासाठी रोजच व्हॅलेंटाईन डे असतो.तिच्यावरच प्रेम दाखवायला कोणत्याही डे ची गरज नसते...."
  "तसे नाही हो ....त्या निमित्ताने वहिनीसाठी गिफ्ट घ्याल तुम्ही..." बंड्या हसून म्हणाला.
 " हे बघ बंड्या .....मला ज्या दिवशी एखादी गोष्ट आवडते आणि ती बायकोला आवडेल असे वाटते त्यावेळी कोणताही विचार न करता मी ती गोष्ट घेतो तेव्हा पैश्याची काळजी करीत नाही .घरी आल्यावर गिफ्ट घेताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जगातील सर्वात सुखी माणूस असल्यासारखे वाटते" मी थोडा भावूक होऊन बोललो ..."बंड्या तुला खरे सांगू का...?? तिचा घरातील  रोजचा वावरच मला रोज  व्हॅलेंटाईन डे असल्यासारखे वाटते.तीची सकाळी उठून माझ्यासाठी....मुलासाठी केलेली धावपळ सुखावते माझ्या मनाला .. तुला एक सांगू लग्नानंतर ऑफिसमध्ये सारखेसारखे येणारे फोन घेऊन कंटाळायचो मी .हातातली कामे सोडून तिच्याशी सारखे बोलणे पटायचे नाही.एक दिवस चिडलो मी ...सारखे सारखे फोन का करतेस ...??? तेव्हा चेहरा पडून म्हणाली" तुमचा फोनवरचा आवाज ऐकून खूप बरे वाटते मला.तो आवाज ऐकण्यासाठीच फोन करते मी .खूप लाज वाटली स्वतः ची. पहिल्या व्हॅलेन्टाईन  डे ला म्हटले चल बाहेर जाऊ फिरायला ..तेव्हा म्हणाली प्रेमाचा दिवस आहे मग तो आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांबरोबर साजरा करू आणि सर्वाना घरी बोलावून गोडाचे जेवण दिले.दुसर्या दिवशी आम्ही फिरायला गेलो तेव्हा म्हणाली बघा आपल्या आयुष्यात दोन व्हॅलेन्टाईन डे आले.बंड्या प्रेमाचे हे फक्त एका दिवसाचे प्रदर्शन करणे पटत नाही आता.तुलाही माझ्या वयाचा होशील तेव्हा असेच काहीसे वाटेल .जेव्हढे प्रेम रोज कराल तेव्हडे ते वाढते. कधी बरे वाटत नसेल तेव्हा जवळच्यांच्या डोळ्यात बघ ..त्यात जी काळजी दिसेल तुझ्याबद्दल... ते प्रेम.तू रात्री दोन वाजता घरी येतोस तेव्हा दादा घरात चिंतेने येरझारा घालत असतात आणि तुला बघून गप  झोपून जातात  ते प्रेम ....आई जेवून आलास का विचारते तो खरा व्हॅलेंटाईन  डे ....." बंड्या भारावून गेला . 
"भाऊ ....तुम्ही कधीच तुमच्या भावना कोणाजवळ व्यक्त केल्या नाहीत .वहिनी तर तुम्हाला दगड म्हणते .खरेच तुम्ही तसे आहात का हो ...?? आमच्याशी बोलतानाही तुमचा स्वर कठीण असतो ..." बंड्या चाचरत म्हणाला .
" अरे वेड्या... घरातील कर्ता म्हणून काही वेळा कठोर व्हावे लागतेच.याचा अर्थ माझे कोणावर प्रेम नाही असे होत नाही .फक्त ते व्यक्त करता येत नाही .मी वेळेवर घरी आलो नाही कि तुझ्या वहिनीचा चेहरा बघ कसा होतो .मी काही तिच्यासाठी ..मुलासाठी घेऊन येतो तेव्हा पळत पळत तुम्हाला दाखवायला घेऊन येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ....अरे असे हजार व्हॅलेंटाईन डे ओवाळून टाकतो त्यांच्यावर..मी आठवणीत गुंग होऊन म्हणालो.
 "खरेच भाऊ ...तुम्ही ग्रेट आहात .हे सर्व माझ्या लक्षातच कधी आले नाही .आज मैत्रिणीला भेटायचे कॅन्सल करतो आणि घरच्या सर्वाना बाहेर घेऊन जातो जेवायला .ती मनीहि बरेच दिवस मागे लागलीय बाहेर जाऊ जेवायला म्हणून. ति ही खुश होईल. मैत्रिणीला उद्या भेटेन .तशी ही उद्या  गर्दी कमी असेल पार्कात.आरामात गप्पा मारत येतील ..."असे बोलून धावतच घरी गेला.
© श्री . किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment