Monday, February 3, 2020

ते क्षण

ते क्षण 
सर्विस रोडवरून त्याने जोरदार टर्न मारून बाईक मेन रोडवर आणली. मेनरोडचा सिग्नल सुटायला चार सेकंद बाकी होते . पण तिकडे लक्ष न देता त्याने बाईक पुढे पिटाळली. बाजूच्याच रोडवरून सिग्नल पडेल म्हणून भरधाव वेगाने पुढे येणाऱ्या मोटारला त्याची बाईक आदळली . एक मोठा धडाका झाला .बाईक वरून तो उंच उडाला.मागून येणाऱ्या बसखाली गेला.  अजून चार सेकंद थांबला असता तर .....?? 
समोरच्या ट्रॅकवर येणाऱ्या ट्रेनकडे पाहत तो ब्रिजवरून धावत होता. एका हाताने प्रवासी बॅग सांभाळत दुसऱ्या हाताने पोराचा हात खेचत मागून धावत येणाऱ्या बायकोवर खेकसत होता."चल धाव लवकर ....ही बघ ट्रेन आलीय ... पकडूया...." ती कमरेवरच्या मुलाला सांभाळत त्याच्यामागे भराभर चालत होती .चालता चालता त्याला म्हणाली" आहो ..सोडून द्या ही ट्रेन.. मागून दुसरी येतेय ..ती बघा दिसतेय..."तोपर्यंत तो ट्रेनजवळ पोचलाही होता.समोरच्या गर्दीत धक्का मारत त्याने मुलाला आत ढकलले आणि स्वतः दरवाजात उभा राहून पत्नीला हाक मारू लागला.नवरा ट्रेनमध्ये चढलेला पाहून ती धावत ट्रेनकडे निघाली . इतक्यात ट्रेन चालू झाली . काहीच न सुचून तीने चालता डबा पकडायचा प्रयत्न केला आणि तोल जाऊन खाली पडली .त्यांनी मागची ट्रेन पकडली असती तर ....?? 
रात्रीची वेळ...,हायवेवर तसा अंधारच होता.त्याने भरधाव वेगात गाडी सोडली होती.एका हाताने सिगारेटचे कश चालूच होतेच.ह्याच स्पीडने गेलो तर रात्रीचे जेवण बायको आणि मुलीसोबत घेऊ असा अंदाज बांधला होता त्याने.अचानक समोर ठेवलेला मोबाईल वाजू लागला.घरूनच फोन होता .स्वतःशी हसत त्याने सिगारेट तोंडात ठेवून मोबाईल उचलला . तोंडात सिगारेट ....खांदा आणि कानाच्यामध्ये फोन ठेवून स्टेरिंगवर कंट्रोल करीत त्याने हॅलो केले.तितक्यात तोंडातली सिगारेट मांडीवर पडली . घाईघाईत तो सिगारेट उचलायला गेला . स्टेरिंगवरचा ताबा सुटला आणि गाडी बाजूच्या उतारावरून खाली उतरत गेली. दोन मिनिटे मोबाईल उचलला नसतात तर....?? 
 समुद्राच्या किनाऱ्यावरील खडकांवर ती दोघे एकमेकांचे फोटो काढीत होते . आतापर्यंत भरपूर फोटो सेशन झाले होते .दोघांच्याही हातात लेटेस्ट मोबाइल होते. आजचा पूर्ण दिवस त्यांचा होता . वेगवेगळ्या पोज मधील अनेक फोटो आणि सेल्फी काढून झाले होते . पण तिची हौस काही भागत नव्हती . "अग चल आता.... भरतीची वेळ झालीय . अजून किती फोटो काढशील ...? तो कौतुकाने  म्हणाला."बस दोन मिनिटे ... एक शेवटचा सेल्फी काढू या .."असे म्हणत ती उंच खडकावर त्याला घेऊन गेली.त्याच्या  गळ्यात हात टाकून तिने मोबाईल समोर धरला .यौ...!! म्हणत क्लीक करणार इतक्यात मागून आलेली जोरदार लाट त्यांच्या अंगावरून गेली..तो सेल्फी त्यांनी काढला नसता तर ....??
© श्री. किरण कृष्णा बोरकर 

No comments:

Post a Comment