Sunday, February 9, 2020

चॉकलेट डे

चॉकलेट डे
कंपनीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्याला डायबेटीस असल्याचे निदान झाले आणि त्याचा मूडच गेला. च्यायला...... बापाचा डायबेटीस शेवटी आलाच आपल्यावर ...तो मनात चरफडला. 
खरे तर फार वय नव्हते त्याचे .मुलगा अजून सात वर्षाचा होता .पण ह्याचे गोड खाण्यावर कंट्रोल नाही. आज ना उद्या होणारच होते ते लवकर झाले इतकेच... 
आता घरी कसे सांगायचे....?? याच टेन्शनमध्ये दिवस जाणार होता.वेलेन्टाइन डे चा सप्ताह सुरू झाला होता.आज चॉकलेट डे....तीही हौसेने त्याच्याकडून मिळणाऱ्या चॉकलेटची वाट पाहत असणार होती.
संध्याकाळी सुटताना बॉसने प्रत्येकाला एक छानसे चॉकलेट देऊन हॅपी चॉकलेट डे म्हणत विश केले . ह्याने ते चॉकलेट मुकाटपणे खिश्यात टाकले आणि घरी निघाला .
"अरे देवा ... !! ती हातातील रिपोर्ट पाहत ओरडली.  काल थोडे डोके धरले होते म्हणून बीपी चेक करायला गेली आणि डॉक्टरांनी बीपी बरोबर शुगरही टेस्ट केली . रिपोर्ट तिला शुगर असल्याचे स्पष्टपणे सांगत होता. 
सासर्यांचे डायबेटीस परंपरेनुसार आपल्यातही आले का ...?? असा विचार हिच्या मनात आला.
आता हे सतत गोड खातात.…. कितीतरी वेळा ओरडली असेन ...पण त्यांचे डायबिटीस आपल्या गळ्यात पडेल असे वाटले नव्हते आणि आजच चॉकलेट डे यावा .हे किती प्रेमाने चॉकलेट घेऊन येतात .भले ते इकलेर किंवा मेलडी का असेना पण त्यामागे ही प्रेमच असते ना .....?? ती त्याचा विचार मनात येताच मोहरली . निदान आज तरी बोलायला नको.याबद्दल नंतर बोलू असा विचार करतच घरी निघाली . रस्त्यात तिला जुनी मैत्रीण भेटली . दहावीच्या बॅचची ... दोघीनी एकमेकींना रस्त्यातच मिठी मारली . कोपऱ्यात जाऊन छान गप्पा मारल्या निघता निघता मैत्रिणीने तिच्या हातात छान चॉकलेट दिले . हॅपी चॉकलेट डे डियर.…  असे म्हणून गालावर ओठ टेकवून निघून ही गेली . हीने ते चॉकलेट पर्समध्ये टाकले आणि निघाली .
तो रोजच्या वेळेनुसार घरात शिरला तेव्हा तीही नुकतीच घरी आली होती . दोघांनी हसून एकमेकांकडे पाहिले आणि त्याच क्षणी दोघांनाही जाणीव झाली काहीतरी बिघडलय . एकमेकांच्या डोळ्यातील काळजी स्पष्टपणे दोघांनाही दिसत होती .
इतक्यात छोटा धावत येऊन त्याच्या कुशीत शिरला . त्याने आनंदाने त्याला कवटाळले आणि खिश्यातून चॉकलेट काढून त्याला दिले . बाबांच्या हातात एकच चॉकलेट पाहून तो चक्रावला . तिने ही आश्चर्यचकित होत त्याच्याकडे पाहिले तर त्याने हसून मान उडवली.
तसे हिने ही पर्समधून चॉकलेट काढीत छोट्याच्या हाती दिले . आज आईकडूनही चॉकलेट मिळताच तो आनंदला. 
"हॅपी चॉकलेट डे बेटा ....दोघेही एकदम म्हणाले . "आज दोन दोन चॉकलेट ..मस्त धमाल .. मी यातले एक आजोबांना देतो ..."असे ओरडत छोटा बेडरूमच्या दिशेने धावला.
"अरे नको ...त्यांना डायबेटीस आहे .."दोघेही एकदम ओरडले आणि चमकून एकमेकांकडे पाहिले .
छोटू ओरडत आजोबांच्या खोलीत शिरला तेव्हा ते पुस्तक वाचत बसले होते.त्याने हळूच त्यांच्यापुढे मूठ उघडली . मूठीतील चॉकलेट पाहताच आजोबांचे डोळे चकाकले.
"पण तुम्हाला डायबेटीस आहे... असे आई पप्पा म्हणतात .. "छोटू त्यांच्या कानात कुजबुजला.
" असू दे रे ....नाहीतरी आता किती वर्षे उरलीत..??. ज्या वेळी डायबेटीस आहे कळले तेंव्हापासून तुझ्या बापाकडे पाहत सगळी पथ्यपाणी पाळले . आज तो बाप झालाय .... आतातरी जगू दे मला मस्त मनासारखे ..."असे म्हणत ते चॉकलेट त्यांनी तोंडात टाकले.
"पण मी तुला या चॉकलेटपेक्षाही भारी गोड गोष्ट देतो...."मग त्यांनी हळूच त्याच्या गालावर ओठ टेकविले." बघ ..ही सर्वात गोड गोष्ट आहे. आपल्या प्रेमाच्या माणसालाच देता येते आणि याची किंमत करता येत नाही .."छोटुने आजोबांच्या गळ्यात हात टाकले आणि त्यांच्या गालावर ओठ टेकवून छान पप्पी दिली . मग शांतपणे त्यांच्या मांडीवर बसून चॉकलेट खाऊ लागला .
 बेडरूमच्या दाराआडून ते दोघेही आजोबा नातवाचा हा खेळ पाहत होते . त्यांचे बोलणे ऐकून दोघांनी एकमेकांकडे पाहिले .त्याच्या डोळ्यातील ते भाव बघताच ती मोहरली."अजिबात नाही ह... तीने डोळे वटारले ..आणि किचनमध्ये धावत गेली .तसा तो ही तिच्या मागे पळाला.
किचनच्या ओट्यापाशी ती पाठमोरी उभी होती . त्याने तिला आपल्याकडे फिरवले . गालावर लाजेची लाली पाहून तो वेडावून गेला . अलगद तिच्या ओठावर ओठ टेकवून  कुजबुजला "हॅप्पी चॉकलेट डे ...."
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment