Friday, February 21, 2020

भीतीचीही सवय होते

भीतीचीही सवय होते
( नारायण धारप यांच्या चेटकीण या कादंबरीत एक वाक्य आहे .. भीतीचीही सवय होते ..त्यावरून सुचलेली ही छोटी लघुकथा )
नटराजच्या दारातच विष्णू आम्हाला भेटला .महिन्यातून एकदा शेट्टीच्या नटराजला भेट द्यायची हा आमचा शिरस्ता.आम्ही आत घुसायला आणि विष्णू बाहेर पडायला एकच गाठ पडली.
"काय विष्णूभाऊ....!! झाली का .….."?? विक्रमने अंगठा ओठाजवळ नेऊन विचारले.
 अर्थात त्याला पाहून विष्णूच्या कपाळावर आठ्या पडल्याच. तरीही तोंडातून होकार निघून गेला.
"आता डायरेक्ट नाईटला का ..."?? मी विचारले.
विष्णू सरकारी हॉस्पिटलमध्ये कामाला होता आणि ड्युटीही शवागृहात होती . त्यामुळे रात्रभर त्या प्रेतांच्या सानिध्यात राहावे लागायचे.त्या एकांतात प्रेतांबरोबर कसे राहत असेल...?? असा प्रश्न नेहमीच पडायचा.पण त्याचे ही उत्तर विक्रमने एकदा शोधून काढले. 
त्या दिवशी नटराजमध्ये विक्रम त्याच्यासमोरच जाऊन बसला आणि त्याच्याच पैशाने एक पेग पियाला.बहुतेक त्यामुळेच विष्णू विक्रमकडे रागाने बघत होता.
"विष्णू ...तुला भीती वाटत नाही का त्या प्रेतांसोबत राहायची....."?? मी विचारले.
"भीतीची ही सवय होते भाऊ ...." त्याने थंड आवाजात उत्तर दिले आणि पुढे निघाला.आम्ही खांदे उडवून आत शिरलो.
इकडे विष्णूची स्वारी बऱ्यापैकी रंगात आली.सवयीप्रमाणे त्याने दुसऱ्या पाळीतील कामगारांकडून चार्ज घेतला आणि नेहमीप्रमाणे शवागृहात चक्कर मारली.त्या थंड वातावरणात प्रेतांच्या सभोवती फिरताना अंगावर शहारे येत होते . तरी  बरे प्रत्येक बॉडी पायापासून डोक्यापर्यंत पांढऱ्या कपड्यात गुंडाळली होती .  तिथे एक भयाण शांतता जाणवत होती . मध्येच खट्ट असा आवाज आला तरी विष्णू दचकत होता . शेवटी तो बाहेर येऊन त्याच्या नेहमीच्या खुर्चीत बसला.
बसल्यावर त्याने खिश्यातून तंबाखूची पिशवी काढली आणि मस्त बार बनवायला सुरवात केली . मनासारखा बार मळून होताच तो दाढेखाली धरणार इतक्यात पाठीमागून आवाज आला.
 " काय विष्णू शेठ ....एकटेच खाणार का .." ?? विष्णू दचकून मागे वळला. समोर अंत्या पवार उभा होता . डोक्यावर पट्टी.. हाताला बँडेज.. बहुदा फ्रॅक्चर असावे .
"च्यायला अंत्या तू ...??हे काय ..?? कुठे पडलास ..?? विष्णूने आश्चर्यचकित होऊन प्रश्नांची फैर झाडली.
"अरे घरी जात होतो.रस्त्यात ऑइल सांडले होते तिथून बाईक घसरली ,चांगले दहा फूट घसरत गेलो . तिथेच बेशुद्ध पडलो.आता जाग आली बघ.बघतो तर आपलेच हॉस्पिटल . आता झोप येत नव्हती . विचार केला तू तर रात्रपाळीत असतोस तुझ्याशीच गप्पा मारू.....म्हणून आलो..." तंबाखूचा बार त्याच्याकडून घेत अंत्या म्हणाला.
"बरे झाले आलास ....मलाही कंटाळा येतो बघ असे बसून . इथे कोण येणार आहे सहज  आणि मी ही फार वेळ जागा राहत नाही .काय आहे इथे चोरी करण्यासारखे ....?? मुडदे ....??  आता गप्पा मारू आणि मग तू जा आरामात झोपायला .." विष्णू खुशीत म्हणाला .
" विष्णू ..तुला इथे भीती नाही वाटत .."?? अंत्या हळूच म्हणाला .
" कोणाची ..?? मुडदयांची...?? की भुताची ..?? विष्णूने सहज विचारले .
" दोघांची ही ....."अंत्याने हसून विचारले .
"वाटायची .... पण आता भीतीचीही सवय झालीय . आता  काहीच वाटत नाही.... तुझ्यासारखे बरेचजण झोप येत नाही म्हणून गप्पा मारून जातात...."थंड आवाजात  विष्णू म्हणाला.
"बरे... घरी कोणाला कळविले आहेस की नाही ..'?? विष्णूने आठवण झाल्यासारखे विचारले .
"माहीत नाही रे ... आता शुद्धीवर आलो तेव्हा सगळे झोपून होते .कोणाला उठवले नाही मी.तुझीच आठवण झाली म्हणून तुला भेटायला आलो तसेही घरच्यांना सवय आहे माझी वेळीअवेळी घरी येण्याची ...."अगदी सहज स्वरात अंत्या म्हणाला .
" ठीक आहे... तू आराम कर सकाळी मी कळवीन घरच्यांना ...." विष्णू जांभई देत म्हणाला .
"ओके ...असे म्हणून अंत्या निघून गेला . थोड्या वेळाने विष्णू तिथेच घोरू लागला .
सकाळी सहा वाजता विष्णू उठला त्याने सवयीप्रमाणे शवागृहात राउंड मारली . सफेद कापडात गुंडाळलेली प्रेते मोजली मग बाहेर येऊन एक फोन लावला.
"बंड्या अंत्या पवार गेला ...?? रोड आक्सिडंटमध्ये . मी त्याचे सर्व पेपर बनवतो बॉडी घेऊन जाऊ .भाऊला सांग त्याच्या घरी कळवायला..तू आणि विक्रम या बॉडी न्यायला .असे बोलून फोन ठेवला.
असे कित्येकजण माझ्याशी रात्रभर येऊन बोलतात . पण मला कळते ते कोण आहेत ..पहिल्यांदा भीती वाटायची पण आता भीतीचीही सवय झालीय.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment